साठ वर्षात केले काय?

MURTY 621x414काही दिवसांपूर्वीच नारायण मूर्ती यांनी भारतातील एका अग्रगण्य संस्थेच्या (IISC) दीक्षांत समारंभात एक खंत व्यक्त केली. भारतात गेल्या अनेक दशकात मूलभूत संशोधन झाले नाही, विद्यार्थी नाविन्यपूर्ण उद्योग करत नाहीत असे काहीसे ते म्हणाले आणि त्यावर चर्चाही खूप झाली.

हे साहजिकच होते. नारायण मूर्ती हे इन्फोसिसचे निर्माते, ज्यांच्यावरून भारतातील उद्योजकतेची परिमाणे बदलली असे प्रभावी व्यक्तिमत्व! कोणतेही घराणे मागे नसताना, सामान्य स्थितीतून केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर, कठोर परिश्रमावर त्यांनी एवढे मोठे साम्राज्य उभारले, पत्नीचे दागिने व काही रोकड या जुजबी भांडवलावर संगणक क्षेत्रात इतिहास घडवणारी कंपनी स्थापली, वाढवली व वाढतच गेली. त्यातही मूल्यांवर आधारित व्यवस्थेने तत्वांशी प्रामाणिक राहूनही नफा मिळवता येतो, भारतीय बुद्धी जगाच्या नकाशावर झेंडे फडकवू शकते हा आत्मविश्वास एका अख्ख्या पिढीत त्यांनी रुजवला.
सुधा मूर्तींनी समाजाभिमुख प्रकल्पातून इन्फोसिस फाऊंडेशनच्या रूपाने आणखीन एक आदर्श उभा केला. अगदी तरुणपणीही सुधा मूर्तींनी जेआरडी टाटांना पत्र लिहून "केवळ मुलगी म्हणून मला टाटाच्या उत्पादन विभागात पर्यवेक्षक म्हणून नेमले जात नाही हा अन्याय आहे', असे कळवले व टाटांनीही तिला उत्तर देऊन ही प्रथा मोडली.
नवीन वाटा शोधणार्‍या, पादाक्रांत करणार्‍या अशा व्यक्ती IIT, IISC मध्येही फार काही सृजन होत नाही असे म्हणतात तेव्हा त्याचे गांभीर्य मोठे असते. साधारणतः IIT, IISC मध्ये भारतातले अग्रगण्य बुद्धिमान तरुण शिकतात, त्यातले बहुतांश IT मध्ये किंवा फायनान्समध्ये जातात. हाच प्रघात गेली दहा पंधरा वर्षे सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये चालू आहे. आता गेली दोन तीन वर्षे हा ट्रेंड  बदलत आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त असे झाल्याने अनेक संगणक पदवीधरांना चांगली नोकरी नाही. कॉलेज IT, Computer बंद करण्याची परवानगी मागत आहेत व सरकारने नवीन कॉलेज उघडायचे असेल तर कोअर कोर्सेस अनिवार्य (जसे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) केले आहेत. याउलट बहुतांश कॉलेजचे प्लेसमेंट आज एकगठ्ठा 50-60 मुले इन्फोसिस, टीसीएस इ. जॉईन करतात या जोरावरच तग धरून आहे. बरं ही अशी गठ्ठ्याने कंपनी जॉईन करणारी मुले त्यांना मिळणार्‍या रुटीन कामाला 1-2 वर्षातच कंटाळतात व MBA व MS ची स्वप्ने पाहात गुमान CAT किंवा GRE च्या तयारीला लागतात. खरंतर इंजिनिअरिंगच्या चवथ्या पाचव्या सेमिस्टरलाच या परीक्षांचे क्लास लावणारे कमी नाहीत. खरं सांगा, या अशा व्यवस्थेत नवसृजन, भन्नाट अविष्कार, त्यावर आधारित उद्योजक यांना जागा कुठे आहे आणि किती?
बरं Body shopping, software coolies असे थोडेसे टोकाचे बिरूद न लावले तरी भारतीय संगणक क्षेत्र मुख्यत: सृजनात्मक अविष्कार, मूळ भारतीय बनावटीची उत्पादने यापासून दूरच राहिले, तात्कालिक नफा व विस्तार यावरच त्यांचा भर राहिला हे म्हणणे अगदीच नाकारता येईल का? त्या ध्येयाने त्यांनी अविश्रांत श्रम केले व आपल्याला अभिमान वाटावा असा इतिहास रचला, भारताच्या जागतिक पटलावरील प्रतिमा व प्रतिभेला संजीवनी दिली हे कोणीच नाकारू नये पण जेव्हा त्या क्रांतीचा एक उद्गाताच असे विधान करतो तेव्हा सामान्य माणूस गोंधळून जातो.
मला आठवतंय जेव्हा IT ची लाट होती व कॅम्पस प्लेसमेंटला आलेले इन्फ़ोसिसचे HR वाले रसभरीत वर्णने करत होते. त्यावेळी एकाने प्रश्न केला होता- सर्व बुद्धिवंतांनी इंजिनिअर व्हावे, व सर्व इंजिनिअर्सनी संगणक क्षेत्रात जावे हे कितपत योग्य आहे? शेवटी समाजात सर्व लागतात, गवंड्यापासून नेत्यापर्यंत! मग ज्या उद्योजकांनी संगणक क्षेत्राची लोभस कवाडे उघडून करोडो तरुणांना त्या क्षेत्राकडे खेचले त्यांचे साम्य तांदूळ, गहू, नाचणी न पिकवता सर्व जमिनीवर ऊस पिकवणार्‍या शेतकर्‍यांशी नाही का? असा त्याचा प्रश्न होता. HR वाले अर्थातच या प्रश्नाला शिताफीने बगल देऊन गेले! ऊस जर कॅशक्रॉप आहे म्हणून पिकवायचा तर मग अफू का पिकवू नये असाही प्रश्न विचारता येईल.
शेतकर्‍याचा व्यक्तिगत लाभ हाच दृष्टीकोन असेल तर ही बाब नजरेआड करता येईल. पण शेतजमीन, तिचे उत्पन्न आणि समाजाची गरज, निसर्गाचे देणे व माणसाने न ओरबाडता त्याचा उपयोग करणे या सर्वात एक सुसंवाद होता. कृषी व्यवसाय हा लाभापेक्षा अन्नदाता व निसर्गरक्षी होता. हे पर्यावरणाचे संतुलन नगदी पिकांचे भरमसाठ उत्पादन घेण्याच्या निखळ व्यवहारी व स्वार्थी विचारसरणीने बिघडवले. हा प्रश्न कदाचित बोचरा वाटेल पण यात कुणालाही दोष देण्याचा हेतू नसून आपल्या सर्वांच्याच आत्मपरीक्षणाचा हेतू आहे.
’Is there one invention, one technology, one idea prodnced by them that has helped make the society & the world a better place?' या शब्दात मूर्तींनी आपली खंत व्यक्त केली. त्यांनी "From Ideas to Inventions: 101 Gifts from MIT to the world' या पुस्तकाचा मुद्दाम उल्लेख केला. MIT च्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी व माजी अध्यापकांनी केलेल्या अनेकानेक अविष्कारांनी जग बदलले. मूर्तींनी या 101 पैकी 10 उदाहरणे दिली. Global positioning system, Bionic prostheses, Microchip, Email, Text-Speech recognition, Cybernatics  ही त्यातीलच काही. आपल्याकडे असे का झाले नाही? झाले ते झाले. यापुढे बदल घडवायचा असेल तर वाचन वाढवा, घरी स्वतःची लायब्ररी बनवा, टीममध्ये काम करा इ. सूचना त्यांनी दिल्या. आपली विचारसरणी बदला, अधिक सृजनात्मक  करा अशीही एक आणि कदाचित सर्वात महत्त्वाची सूचना केली. मानसिकता बदलणे, सृजनशील करणे आणि त्यासाठी शिक्षण देणे ही त्यातील पहिली, मधली व शेवटची पायरी आहे. त्याशिवाय बाकी सर्व "व्यवस्था' आहे. विचार करणे व करत राहणे ही दैनंदिन जीवनातील सर्वात विकसित गोष्ट, पण सृजनात्मक विचार करणे मात्र अतिकठीण आहे. पहा विचार करून!
- डॉ.नरेंद्र जोशी

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division