"व्यवसायातल्या मिळकतीला वैयक्तिक गुंतवणूकीची जोड द्या.'- शिवानी दाणी, संचालक, मनी बी इन्स्टिट्यूट प्रा. लि.

daniसर्वसाधारणपणे ज्या वयात मुले पदवी संपादन करण्याकडे लक्ष केंद्रीत करतात त्या वयात शिवानी दाणी यांनी शिक्षणाबरोबरच अग्रणी संस्थांमधून अध्‍यापन सुरू केले. "Investment Marketing' आणि "Market Analysis'या विषयांवर त्यांचं प्रभूत्व आहे. फायनान्स क्षेत्रातील अनेक परीक्षांमध्य़े त्यांनी उत्तम गुण प्राप्त केले आहेत. सेबीच्या "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्यूरिटीज मॅनेजमेंट' (NISM) मधल्या सर्वात तरूण अध्यापक होण्याचा मान त्यांना मिळाला आहे तसेच Debt Market, Derivatives अशा विषयांमध्ये Ph.D करणार्‍या विद्यार्थ्यांनादेखील त्या मार्गदर्शन करतात.

BSEच्या प्रशिक्षक म्हणून राज्यभरात त्यांनी गुंतवणूक साक्षरता या विषयात आजवर 3000हून जास्त गुंतवणूकदारांसाठी कार्यक्रम केले आहेत. तसेच म्युचुअल फंड्स आणि फायनान्शियल प्लानिंग या विषयासंदर्भात 5000 हून अधिक विद्यार्थी, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे विविध वर्तमानपत्रांमधून त्यांनी 200 हून अधिक लेख लिहिले आहेत. वार्षिक अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशीच त्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणारे पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रराक्रमही त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. शिवानी दाणी यांनी तरूण वयात आर्थिक साक्षरता या क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी त्यांना मॅक्सेल अवॉर्ड फॉर इमर्जिंग एक्सलन्स या सन्मानाने गौरवण्यात आले आहे. "महाराष्ट्राचे उद्योगविश्व'च्या वाचकांसाठी चित्रा वाघ यांनी त्यांच्याशी केलेली बातचित.

आर्थिक साक्षरता या क्षेत्राकडे आपण कशा वळलात?

कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतानाच आर्थिक क्षेत्राविषयीच्या आकर्षणापोटी मी आशुतोष वाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली "मनी बी इंस्टिट्युट'मधून फायनान्स या विषयातील छोटेमोठे कोर्सेस करण्यास सुरुवात केली. शिकत असतानाच इंस्टिट्युटच्या अंतर्गत कामकाजातही मी थोडंफार लक्ष देऊ लागले. इथे फायनान्स या विषयातील विविध सर्टिफिकेट कोर्सेसबरोबरच गुंतवणूक मार्गदर्शन केले जाते तसेच सर्व प्रकारची गुंतवणूक सेवा पुरवली जाते. या विषयामध्ये मला रस वाटू लागला. त्यामुळे मायक्रो इकॉनॉमिक अॅनालिसिस, गुंतवणूकदारांच्या तक्रारी सोडवणे, आर्थिक सल्ला देणे अशा गोष्टींमध्येही मी सहभाग घेत असे. शाळा-कॉलेजपासून विविध वक्तृत्त्व स्पर्धांमध्ये भाग घेण्याची मला सवय होतीच. पुढे मग याच विषयावर विद्यार्थी, व्यावसायिक, अभ्यासक यांच्यासाठी व्याख्याने देण्याची संधीही मिळत गेली तसेच आघाडीचया वर्तमानपत्रांमधूनही अनेक लेख लिहू लागले. स्टॉक एक्चेंजमधील चढ उतार, म्युचुअल फंडातली गुंतवणूक, डेरिव्हेटिव्हज, कमॉडिटी मार्केट अशा विषयांबद्दल लोकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करावे, थोडक्यात सामान्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे हा यामागील मुख्य उद्देश होता. "मनी बी इन्स्टिट्यूट'ची संचालक या नात्याने आम्ही नागपूरमध्ये अनेक उपक्रम राबवतो. ज्यामध्ये प्रधानमंत्री

कौशल्यविकास योजनेअंतर्गत आम्ही फायनान्स क्षेत्रात तरूणांना प्रशिक्षण देत आहोत.

गेल्या वर्षी नागपूरमध्ये आर्थिक घोटाळ्यांमध्ये अनेक सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान झाले होते. गुंतवणूकीबद्दल सामान्यांच्या मनात धास्तीच होती. तत्कालिन भाजपा महाराष्ट्राध्यक्ष मा. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेप्रमाणे लोकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी आम्ही "India Booms.. Sensex Zooms’ हा कार्यक्रम केला. अर्थक्षेत्रातील अनेक तज्ज्ञांना यावेळी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला 800 ते 1000 लोकांची विक्रमी उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे कागदी शेअर्सची डिमॅट स्वरूपात नोंद करण्यासाठी CDSL च्या मदतीने एक अभिनव उपक्रम राबविला गेला. 5-6 रजिस्ट्रार्सकरवी तिथल्या तिथे सुमारे 2 कोटी रुपयांचे शेअर्स डिमॅट स्वरूपात नोंदवले गेले. सुमारे 300 लोकांनी या उपक्रमाचा फायदा घेतला.

अर्थसंकल्पाच्या दिवशीच त्यावरील विश्लेषणात्मक पुस्तिका आपण प्रसिद्ध केलीत. ही किमया आपण कशी साध्य केलीत?

गेल्या चार वर्षांपासून आम्ही अर्थसंकल्पावर विश्लेषणात्मक पुस्तक प्रसिद्ध करत आहोत. 2013 ला माझ्या टिमने अर्थसंकल्प जाहीर झालेल्या दिवशीच पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरवले. दुपारपासून आकडेवारी मिळवणे, विश्लेषण तयार करणे इथपासून प्रिटिंगसाठी प्लेट्स तयार करण्यापर्यंत सर्वांनी मिळून मेहनत घेऊन रात्री साडेआठपर्यंत आम्ही सुमारे 300 प्रती प्रकाशित करण्याचा विक्रम केला. या सुमारे 40 पानी पुस्तिकेसाठी मा.देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावना लिहिली. दर वर्षी अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या दिवशी संध्याकाळी आम्ही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत. खरं तर अशा रुक्ष विषयासाठी लोक येणे कठीण वाटते पण आम्ही हा कार्यक्रम 100 रुपयांचे तिकिट लावून करतो आणि त्याला लोक इतकी गर्दी करतात की काहींची बसण्याची सोय स्टेजवर करावी लागते. या वर्षी तर 28 फेब्रुवारीचा दिवस असूनही नागपूरमध्ये भरपूर पाऊस पडला पण आमच्या कार्यक्रमासाठी लोक छत्र्या घेऊन आले होते.

MSME एक्स्चेंज बद्दल आपण लघुउद्योजकांना काय सांगाल?

भांडवली बाजारातून पैसा उचलण्यासाठी MSME एक्स्चेंज हा लघुउद्योजकांसाठी एक उत्तम पर्याय आज उपलब्ध आहे. जास्तीत जास्त मात्र आज या विषयी मुंबई पुण्यासारख्या शहरी भागाबाहेर म्हणावी तशी जागृती झालेली दिसत नाही. छोट्या शहरांमध्ये, ग्रामीण भागांमधील लघुउद्योजकांना याची जास्तीत जास्त माहिती होणे गरजेचे आहे. MSME एक्स्चेंजला मिळणार्‍या प्रतिसादात वाढ होत आहे. त्यादृष्टीने सेबीतर्फे प्रयत्न होतही आहेत पण स्टॉक एक्चेंजच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी करणे ही संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचायला अजून अवकाश आहे.

MSME क्षेत्रात आर्थिक नियोजनाचे महत्त्व काय आहे? आर्थिक सल्लागार म्हणून लघुउद्योजकांना आपण काय सांगाल?

कुठल्याही उद्योजकाला आर्थिक व्यवहाराचे काटेकोर ज्ञान असणे हे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा असे चित्र दिसते की त्याला व्यवसायाचे, त्यातील व्यवहाराचे पूर्ण ज्ञान आहे मात्र स्वत:चे आर्थिक व्यवहार मात्र तो बघत नाही. त्यासाठी बरेचदा बाहेरचा एखादा माणूस नेमला जातो. लहानसहान गोष्टींसाठी दुसर्‍यावर अवलंबून राहिले जाते. प्रत्येक उद्योजकाला आपली बॅलन्सशीट ही वाचता यायलाच हवी. कर्जाचं, व्याजाचं, टॅक्सचं गणित समजायलाच हवं. जोपर्यंत ह्या बाबींचा अभ्यास होत नाही तोपर्यंत व्यवसायाचा विकास होऊ शकत नाही. उद्योगाला सुरूवात केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच गुंतवणूकीचं महत्त्व ओळखणं आवश्यक आहे कारण योग्य गुंतवणूकीमुळे भविष्य सुरक्षित ठेवता येते. लघुउद्योगातून निर्माण होणार्‍या कॅश फ्लोला गुंतवणूकीच्या परताव्याचा आधार असणे गरजेचे आहे. व्यवसायाच्या परताव्याइतका परतावा गुंतवणूकीतून मिळवण्याचा प्रयत्न उद्योजकाने करायला हवा. कुठल्याही व्यवसायात स्थैर्य मिळण्यासाठी साधारणपणे वीस वर्षं प्रयत्न करणे गरजेचे असते. याकाळात व्यवसायातल्या मिळकतीला वैयक्तिक गुंतवणूकीची जोड मिळाली तर धंद्यातील आर्थिक अडचणी पेलणे शक्य होते.

धन्यवाद! आपल्या पुढील कारकिर्दीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division