"उद्योगवाढीसाठी वर्क कल्चर हे सर्वात महत्त्वाचं"
- मोहिनी केळकर, एम.डी., ग्राइंड मास्टर मशीन्स प्रा.लि.

IMG 22401984 साली सुरु केलेल्या छोट्या वर्कशॉपपासून आजच्या एक लाख स्वे.फुटाच्या विस्तीर्ण जागेवर पसरलेला, 400 मिलियनची वार्षिक उलाढाल असलेला "ग्राइंड मास्टर मशीन्स प्रा.लि.' चा यशस्वी उद्योग असा प्रेरणादायी प्रवास केला आहे मिलिंद आणि मोहिनी केळकर यांनी. मुंबईतील VJTI या मान्यवर शिक्षणसंस्थेतून प्रॉडक्शन इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यावर या दोघांनी औरंगाबाद येथे स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. या वाटचालीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मोहिनी केळकर यांच्याशी चित्रा वाघ यांनी केलेली ही बातचित.

1. आपल्या व्यवसायाचे स्वरूप काय आहे? याकडे आपण कशा वळलात?

आम्ही गेल्या 30 वर्षांपासून पॉलिशिंग मशीन्स उत्पादनाच्या व्यवसायात आहोत. सुरुवातीच्या काळात आम्ही कुकवेअरसाठी पॉलिशिंग मशिन्स बनवत असू. उदाहरणार्थ एखादा कुकर तयार झाला की प्रत्यक्ष विक्री करताना तो आकर्षक, चमकदार दिसावा म्हणून त्याला पॉलिशिंग केलं जातं. यासाठी लागणारी मशीन्स आम्ही तयार करतो. म्हणजे भांड्यांची निर्मिती करणारी कंपनी हे आमचे ग्राहक. त्यांच्या गरजेनुसार, उत्पादनांनुसार आम्ही मशीन्स बनवत असू. कुकवेअरसाठी आमच्याकडे अनेक प्रकारची ऑटोमॅटिक पॉलिशिंग मशीन्स बनवली जात. याआधी लहान कंपन्यांमध्ये हे काम मॅन्युअली केले जाई तर मोठ्या कंपन्या परदेशातून या कामासाठी मशीन्स आयात करत.

बाजारपेठेचा अभ्यास करताना असंही लक्षात आलं की मेटल फिनिशिंगच्या कामासाठी ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये ऑटोमॅटिक मशीन्सची गरज आहे. 1984 ते 90 या काळात ऑटोमोटिव्ह क्षेत्रात वेगाने विकास होत होता. कुकवेअर इंडस्ट्रीमध्ये त्यांचं उत्पादन आकर्षक दिसणं महत्त्वाचं होतं. मात्र इथे वाहन उत्तम प्रकारे चालण्यासाठी ऑटो पार्टसना ठराविक फिनिशिंग आणणं महत्त्वाचं ठरतं. इथे उच्च प्रतीची अचूकता आणि काटेकोरपणा यावर दर्जा ठरतो. हळूहळू ऑटोमोटिव्ह कंपन्यांच्या गरजेनूसार आम्ही मायक्रो पॉलिशींग मशीन्स सप्लाय करायला लागलो. 96 पासून आम्ही मशीन्स निर्यात करायला सुरुवात केली. यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात स्वत:चं तंत्रज्ञान विकसित केलं तर काही तंत्रज्ञान युरोपियन किंवा अमेरिकन कंपन्यांकडून घेतलं. सध्या आमच्याकडे सुमारे 325 जणांचा कर्मचारी वर्ग आहे.

या व्यवसायात जम बसवण्यासाठी इनोव्हेशन, नाविन्य, कल्पकता याला पर्याय नाही. याच्या जोडीला उत्पादनांचा दर्जामध्ये, प्रक्रियेमध्ये जर सातत्याने सुधारणा होत असेल तर जगभरातून याला भरपूर मागणी आहे. आपल्याकडे हे तंत्रज्ञान विकसित होण्याच्या आधीपासूनच आम्ही या क्षेत्रात असल्यामुळे साहजिकच फायदा झाला. या क्षेत्रात आम्हाला जगभरातून स्पर्धा आहे आणि सध्या जागतिक पातळीवर आम्ही चौथ्या क्रमांकावर आहोत. अर्थात कुठलंही काम उत्तम टिमवर्क आणि कुशल कर्मचारी वर्गाशिवाय शक्य होत नाही.

शांघाय मधील "जनरल मोटर्स' कडून क्रॅंकशाफ्ट्ससाठी मायक्रोफिनिशिंग मशीन्सची मोठी ऑर्डर हा आमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. जनरल मोटर्ससाठी अशा प्रकारचे उत्पादन करणारी "ग्राइंड मास्टर मशीन्स प्रा.लि.' ही पहिलीच भारतीय कंपनी. पुढे मग अनेक कामे मिळत गेली. गेल्याच वर्षी आम्ही चीनमध्ये आमचं ऑफीस सूरू केलं. आपल्याकडे चीनकडून प्रचंड प्रमाणात वस्तू आयात केल्या जातात. या पार्श्वभूमीवर आम्ही चीनमध्ये भारतीय उत्पादने निर्यात करतो याचा मला अभिमान वाटतो. माझा मुलगा समीर याने IIT पवई येथून मेकॅनिकल इंजिनिअरींग शाखेत सर्वप्रथम आल्यावर अमेरिकेत रोबॉटिक्सचे प्रशिक्षण घेतले. तोदेखील गेल्या पाच वर्षांपासून आमच्या बरोबरीने या व्यवसायात कार्यरत आहे.

 MG 5568२. आपण आणि मिलिंद केळकर हे दोघेही एकाच उद्योगात आहात, दोघांनी प्रॉडक्शन इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. मग अशा फॅमिली बिझिनेसमध्ये सर्व कामं एकत्र केली जातात की त्याची काही ठळक विभागणी केली गेली?

फॅमिली बिझनेसमध्ये कामाच्या विभागणीला खूप महत्त्व आहे. सुरवातीच्या काळात मी मशीन डिझाइन्सवर जास्त लक्ष केंद्रीत करत असे. मात्र कालांतराने असं लक्षात आलं की फक्त मशीन्स तयार करणं पुरेसं नाही तर त्याला मार्केटींगची जोड देणं हे उद्योगाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. इथे नुसतं selling skill असून भागत नाही तर technical selling skill आवश्यक आहे कारण त्या उत्पादनाची सगळी तांत्रिक अंगं ज्याला माहित आहेत तोच आपली उत्पादने जास्तीत जास्त कंपन्यांपर्यंत पोहोचवणं, नवीन मार्केट उपलब्ध करणं हे करू शकतो. माझा मार्कॆटिंगकडे कल असल्यामुळे मी सध्या सेल्स डिपार्टमेंट आणि बिझिनेस डेव्हलपमेंट या बाजू सांभाळत आहे. मिलिंद हे प्रॉडक्शन व टेक्नॉलॉजी याची जबाबदारी घेतात. या क्षेत्रात सतत नवीन डिझाइन्सचं काम असतं. हे डिपार्टमेंटदेखील त्यांच्याकडे येतं.

३. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगधंदे हा आर्थिक विकासाचा कणा समजला जातो. महाराष्ट्रात व्यवसाय करताना या क्षेत्राला, विशेषत: औरंगाबादसारख्या ठिकाणी कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? यावर कुठल्या प्रकारची उपाययोजना करण्याची गरज आहे?

सध्या आमचा समावेश मध्यम उद्योगांमध्ये होतो. आमच्यासारख्या अनेक कंपन्यांचा माल मुंबईमार्गे निर्यात होतो. अनेकदा हा सोपस्कार अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ होतो. आम्ही आठवड्याला दोन वेळा निर्यात करतो मात्र ज्यांना यापेक्षा जास्त वेळा माला पाठवावा लागतो अशांसाठी खूप अडचणी येतात. यासाठी port efficiency आणि सोयीसुविधा यात सुधारणा होणे गरजेचे आहे. 

इथल्या उद्योगधंद्यांच्या सोयीसाठी कस्टम क्लिअरन्स आणि इतर कागदपत्रांची पडताळणी स्थानिक पातळीवर व्हावी म्हणून जालना हे dry port म्हणून विकसित होणार आहे. इथे कनेक्टिव्हिटी व इन्फ्रास्ट्रक्चर असावे यासाठी प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. सिंगापूर किंवा इतर ठिकाणी जसा बंदरांचा विकास झाला आहे त्याप्रमाणे आपल्याकडे आधुनिक सोयी आणि तत्पर मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. मेक इन महाराष्ट्र, स्किल इंडिया सारखे महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्याकडील बंदरांच्या विकासाला प्राधान्य द्यावे लागेल.
व्य्वसायवृद्धीसाठी महत्त्वाची समस्या असलीच तर ती वर्क कल्चरची, आपल्या मानसिकतेची आहे. आपण प्रत्येक समस्येसाठी शासनाला जबाबदार ठरवू शकत नाही. अगदी तळागाळातल्या कामगारापासून ते उच्च पदावरील अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये एक प्रकारची उदासिनता आणि निष्क्रीयता दिसते, महत्त्वाकांक्षेचा अभाव दिसतो. त्यामुळे कितीतरी कामं अडून राहतात. पायाभूत सोयीसुविधांच्या प्रश्नाइतकीच ही बाबदेखील गंभीर आहे.

IMG 0678४. स्वत:चा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना तुम्ही काय सांगाल?

सध्याचा काळ हा नवीन उद्योगांसाठी अनुकुल आहे. राष्ट्रीय पातळीवर सरकारतर्फे अनेक प्रोत्साहनपर कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. जागतिक पातळीवर भारतातील गुंतवणूकीबद्दल बोललं जात आहेत. अनेक परदेशी उद्योग इथे येण्यास उत्सुक आहेत तसेच भारतीय उत्पादनांनाही जगभरात वाढती मागणी आहे. या सर्वाचा फायदा उठवण्यासाठी उद्योजकांनी योग्य दिशेने मेहनत करणे आवश्यक आहे. अनेकदा आपल्या लोकांमध्ये देशाभिमान कमी पडतो. विशेषत: तरूण उद्योजकांना ज्या क्षेत्रात व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्याचे योग्य प्रशिक्षण, कौशल्य संपादन करून आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशासाठी केला पाहिजे. झोकून देऊन काम करण्याची तयारी, जिद्द असेल आणि त्याला कौशल्य, पारदर्शी व्यवहाराची जोड असेल तर उद्योजकांना उपलब्ध संधींचा पूर्ण फायदा घेता येईल.
उद्योजकतेची स्वप्नं पाहणाऱ्या अनेकांना आपल्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल अशी आशा करूया. आपल्या पुढील वाटचालीसाठी आणि आगामी योजनांसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !

• अल्प परिचय :
1981 मध्ये मुंबईत VJTI मधून प्रॉडक्शन इंजिनिअरींगची पदवी प्राप्त करणाऱ्या मोजक्या महिलांमध्ये मोहिनी केळकर यांचा समावेश होतो. मिलिंद केळकर यांनी औरंगाबाद येथे शालेय शिक्षण घेतल्यावर मुंबईत VJTI मधून प्रॉडक्शन इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त. त्यानंतर काही वर्षं पुणे येथे टेल्कोमध्ये नोकरी. पुढे 1984 साली या दोघांनी औरंगाबाद येथे मशीन्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी सुरू केली. मिलिंद यांच्या नावावर ग्राइंडिंग आणि फिनिशिंग या क्षेत्रातील 8 पेटंट्स आहेत.

Awards

1. Winner of G.S. Parkhe Industrial Merit Prize awarded by MCCI, Pune in 1988.
2. Winner of the F.I.E. Foundation National Award for outstanding contribution to the field of Machine Tools.
3. Winner of Anand Bhadkamkar-SICOM award in 2000. (First Generation Maharashtrian Woman Entrepreneur)
4. Mrs.Leelavati Mehendaley Women Engineers - Entrepreneurs Prize for the period 1990-91 by The Institution of Engineers (India), Pune Centre.
5. Winner of SME of the year award in the Emerging India Award by ICICI & CNBC, powered by CRISIL.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division