कल्पनेच्या नाण्याच्या दोन बाजू
- डॉ. नरेंद्र जोशी
‘तुझे मनच तुझ्या बंधनाचे कारण आहे आणि तेच तुझ्या मोक्षाचे दार आहे’ असे गेल्या लेखात म्हटले ते खास अर्थाने. (मन एव मनुष्याणां कारण बंधन मोक्षयो: असा काहीसा मूळ श्लोक आहे.) खरंच “मनसे भाग न पाए... तोरा मन दर्पण कहलाए” असे सुंदर काव्य इथे आठवते. या मनाला मुक्त करणे, ‘आजादी’ देणे (!!) याहून महत्त्वाचे आज व्यक्ति व समिष्टीसाठी दुसरे काही नसावे. सृजनास मुक्ती व मुक्तीसाठी सृजन हेच सामाजिक, वैयक्तिक व औद्योगिक दृष्ट्यासुद्धा अतिआवश्यक काम व आव्हान आपल्या सर्वांच्यासमोर आहे असे वाटते.
मनाला बांधणार्या गोष्टी (Thinking Inside box) म्हणजे आपले पूर्वग्रह, भूतकाळ, प्रथा, चिन्हे व त्यांचे प्रस्थापित अर्थ, भीती, लोकलज्जा, आपलीच प्रतिमा, अहंकार, ठाशीव, न बदलणार्या कल्पना, इ. अशावेळी खरंच असे काही मार्ग, अशी काही साधनं आहेत का? सगळेच जण कोणत्यातरी महान पूर्वजांच्या अनेक दशके वा शतके जुन्या विचारांवर, भाषणांवर वेगवेगळे वाद theories, isms आणि वेगेवेगळे पंथ, कंपू जमवून वादविवाद करत आहेत. (उद्योग व अर्थशास्त्राचा अपवाद वगळता) वादातून विसंवाद न होता संवाद व्हावा, तत्त्वबोध व्हावा असे उदीष्ट असावे व त्यासाठी ‘Reverse the sides/ exchange’ हा गेम किंवा tool मस्त आहे.
दोन गटांचा एखाद्या महत्त्वाच्या विषयावर वादविवाद होणे ही तशी जुनी पद्धत. पण बर्याचदा अशा वादातून निष्कर्ष काहीच निघत नाही. कित्येकदा आरडाओरडाच ऐकायला येतो. यावर एक उपाय असा Debate ला असा विषय घ्या की ज्याच्या दोन्ही बाजू तुल्यबळ आहेत. अनेक pros व cons आहेत. अर्ध्या वेळात दोन्ही बाजूंना आपले म्हणणे तावातावाने मांडू द्या. मग करा ‘Reverse the sides’. म्हणजे बाजू exchange करा. म्हणजे for होतील Against आणि Against होतील for. ज्या गोष्टीला इतका वेळ शिव्या घातल्या तिचेच समर्थन करताना होणारी त्रेधातिरपीट पाहून प्रेक्षकच नाही तर खेळणार्यांनाही हसू आवरत नाही हा अनुभव आहे. फुटबॉल व अन्य खेळात side चेंज होते, ज्या गोलपोस्टचे रक्षण केले तोच भेदण्याचे प्रयत्न करावे लागतात. ज्या यष्टी वाचवल्या त्यांच्यावरच नंतर बॉल मारावा लागतो, विचारांच्या जगात हे का असू नये! या पद्धतीत एक फार मोठे तत्त्व आहे.
कुठलीही बाजू पूर्ण खरी किंवा पूर्ण खोटी नसते, आपण आपले पूर्वग्रह, अहंकार व कल्पना सोडून दोन्ही बाजू लढवल्या तर त्यातून नवे काही मंथन होते, नवी रत्ने बाहेर येतात. मनाला बाजू बदलण्याचा सराव देणे फार महत्त्वाचे आहे. There are always three side to any story, ... theirs, yours & the Truth! असे म्हणतात ते खरे आहे. ‘Good Idea & Bad Idea’ हे फार मोठ्या प्रमाणात वापरात येणारे Creativity tool याच तत्त्वाचा विस्तार करत बनवले आहे. एखाद्या गटाला हा अभ्यास द्या. अशी वाक्ये बनवा की जी जोडीने सांगावी लागतील. प्रत्येक जोडीतील पहिले वाक्य Good Idea असेल तर त्या वाक्यातला एखादा शब्द बदलताच किंवा एकदोन शब्द जोडताच किंवा अगदी संदर्भ किंवा विराम बदलताच ती होईल Bad Idea. हे फार मनोरंजक पण बोधप्रद टूल आहे.
उदा.: It is good idea to play police & thief at river bank. It is bad idea to play police & thief at bank.
It is good to take grandfather for catch practice. It is bad idea to use grandfather for a catch practice! इ. या विषयावर animate केलेली अनेक उदाहरणे नेट वर इच्छुकांनी जरूर पहावी याचं अॅपही डाऊनलोड करता येईल. Good & Bad idea मधील फरक फार सूक्ष्म असतो, एकाच कल्पनेतून या दोन्ही बाजून येऊ शकतात या अनेक गोष्टी अतिशय सहजपणे या गेम/ टूलमधून शिकता येतात. product designच्या क्षेत्रात विशेषतः innovative product design चे workshop घेताना याचा वापर करता येतो. गटागटाने नव्या product संकल्पनांवर Brainstorming किंवा विचारमंथन झाल्यावर प्रत्येक गट आपले नवे product कसे अद्वितीय आहे याची एक जाहिरात बनवतो. इतर गट त्याला खोचक प्रश्न विचारून चुका काढतात. मग याच product ला Bad idea म्हणून जाहिरात करण्याची, त्यातल्या चुका सांगण्याची अवघड जबाबदारी त्याच गटावर येते. स्वतःचे productच नव्हे तर नुसत्या कल्पनेवरही माणूस किती फिदा असतो हे तेव्हा कळते. ज्याचा पाच मिनिटांपूर्वी इतका उदोउदो केला त्यालाच नावं ठेवणे फार क्लेशदायक असते. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. पण नंतर हेच प्रशिक्षणार्थी आवर्जून या गेमचे कौतुक करतात. एकाच कल्पनेचा अनेकांगाने विचार व विच्छेदन करणे हे सृजनप्रक्रियेतील महत्त्वाचे अंग आहे हे त्यांच्या लक्षात येते. तटस्थपणे आपल्याच अपत्यावर टीका करणे त्याच्या विकासाला जसे आवश्यक (अपत्य कशाला स्वतःकडे तटस्थपणे पाहणेही आवश्यक) तसे तटस्थपणे आपल्याच लाडक्या कल्पनेकडे पाहणे गरजेचे असते.
एडवर्ड डी बोनोने आपल्या प्रसिद्ध Lateral thinking या प्रणालीत हा विषय प्रभावीपणे मांडला. या विषयावर त्याची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झाली, व्याख्याने, कार्यशाळा इतकेच नव्हे तर इन्स्टिटयूट उभारल्या. Logical thinking च्या विरुद्ध म्हणजे Lateral thinking असे सोप्या शब्दात सांगता येईल. आपल्याला लहानपणापासून, अगदी शाळा कॉलेजमध्येसुद्धा विचारांची एक विशिष्ट पद्धत शिकवली जाते. लॅटरल थिंकिंगची टूल्स, ज्यापैकी काही आत्तापर्यंत सांगितली, त्यामध्ये या प्रस्थापित पद्धती व गृहीतकांनाच शह दिला जातो. उदा. या Lateral thinking मधील काही मूलतत्त्वे अशी:
१. एका समस्येला अनेक उत्तरे असतात व सर्व उत्तरे बरोबर असू शकतात.
२. समस्या सोडवणे महत्त्वाचे, कशी सोडवली ती पद्धत कशीही असो.
३. समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक पायरी बरोबर असणे गरजेचे नाही.
४. अनेक steps किंवा सर्व steps चुकूनही बरोबर उत्तर काढता येते.
५. न सांगितलेल्या व स्वनिर्मित बंधनांमुळेच अनेकदा समस्या सुटत नाहीत.
म्हणजेच Lateral thinking ने समस्या सोडवली की अनेकदा अचंबित होऊन माणसे म्हणतात- ‘छे छे हे कसे शक्य आहे? तुमच्या steps तर साफ चुकीच्या आहेत!’ किंवा ‘अरे! तुम्ही तर नियमच तोडून उत्तर काढलेत!’ किंवा ‘ही फसवणूक आहे! तुम्ही आधी का नाही सांगितलंत की असंही केलं तर चालेल?’ वगैरे वगैरे. पण मग थोड्या वेळाने त्या माणसांच्याच लक्षात येते की आपली तक्रार तशी फोल आहे. आपण स्वतःच स्वतःभोवती अनावश्यक कुंपणे घातली आहेत आणि म्हणून समस्या सोडवताना, काही नवे सृजन करताना आपल्याला असा त्रास होतो. जे म्हणतात की, ‘तुम्ही कुठे सांगितलंत की असं केलं तर चालेल’ त्यांना विचारा ‘मी असं तरी कुठे सांगितलं की असं केलं तर चालणार नाही!’ आणि मग त्यांना जाणवेल की आपण काल्पनिक नियमावली, अपरिवर्तनीय पद्धती व ढाचे आणि अनेक पूर्वश्रेष्ठींच्या सिद्धांतांचा, विचारांचा व समिकरणांचा अंधपणे केलेला सर्वथैव स्वीकार या सगळ्या गोंधळात आपले स्वतःचे मन, त्याच्या मुक्त भरार्या आणि असीम शक्यता यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे.
डी बोनोने यासाठी नदीवर बांधलेल्या Arch bridge म्हणजेच वक्राकार सेतूचे उदाहरण दिलेले आठवते. आर्कची प्रत्येक वीट एकेका दिशेला ठेवावी लागते. कुठलीच वीट नदीच्या दुसर्या तीराकडे जाणार्या बाणाच्या दिशेला नसते. तरी असा वक्राकार सेतू सपाट सेतुपेक्षा जास्त कणखर व सुंदर असतो.
Lateral thinking ही अशी गोष्ट आहे. केवळ Good Idea व Bad idea किंवा Black & white किंवा yes & no यापेक्षा हा मार्ग वेगळा, थोडा विस्कळीत व अगदी विक्षिप्तही वाटू शकेल पण नव्या निर्मितीसाठी तो संजीवनी ठरला आहे.
सृजनशीलता ही प्रत्येकाला जाणवते. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीने विकसित केलेल्या पद्धती व टूल्स वापरली पाहिजेत. मुळात लहानपणी आपण सगळेच तसे असतो. हे सिद्ध झाले आहे की जसे वय वाढत जाते, तसे बहुतेक जणांची सृजनशीलता कमी होते. एक क्रिएटिव्हिटी टेस्ट काही छोट्या मुलांना दिली, त्यांचे स्कोअर्स फार छान होते. तीच टेस्ट मोठ्यांना दिली व स्कोअर्स कमी मिळाले. त्याच छोट्यांना काही वर्षांनी अशी test दिली तर आश्चर्य म्हणजे त्यांचे स्कोअर्सही घसरले होते. अशी टेस्ट काही तज्ज्ञांना, expertsना म्हणजे विविध क्षेत्रात महारथी असणार्यांना दिली तेव्हा आणखी धक्कादायक निष्कर्ष आले. वयानुसार, शिक्षणानुसार व तज्ज्ञतेनुसार जर सृजनशीलता हरवत असेल तर त्या विषयाची गरज अधोरेखित होते यात शंका नाही.