'व्यवस्थापन म्हणजेच व्यवसाय!'

- सुरेखा शिंदे, संचालिका 'अॅक्सिस अॅग्रो'

surekha shinde axis agroमेथी थेपले, पुरणपोळ्या, पनीर पराठे, पंजाबी सामोसे अशा भारतातील चविष्ट खाद्यपदार्थांची परदेशातील वाढती मागणी ओळखून गेल्या १३-१४ वर्षांपासून 'रेडी टू इट' खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या 'अॅक्सिस अॅग्रो'च्या संचालिका सुरेखा शिंदे यांच्याशी चित्रा वाघ यांनी केलेली बातचित...

आपण फुड प्रोसेसिंगच्या व्यवसायाकडे कशा वळलात?

माझं माहेर बारामती जिल्ह्यातल्या माळेगावमधल्या सधन शेतकरी कुटुंबातलं. आम्ही सात भावंड. सर्वजण पुण्याला शिकलो. मी लेबर वेलफेअर या विषयात MSW ची पदवी घेऊन बजाज ऑटोमध्ये नोकरीला लागले. तिथे कामगारांसाठी अनेक उपक्रमांच्या आयोजनात माझा पुढाकार असे. कामगारांच्या बायकांसाठी किंवा त्यांच्या वस्तीतील इतर महिलांसाठी काहितरी उद्योग सुरु करावा असे मनात येत असे. माझ्या यजमानांची, सुनिल शिंदे यांची फुड पॅकेजिंगची फॅक्टरी होती. त्यांच्याबरोबर एकदा मी जेजुरीच्या "Temptation Foods’ या कंपनीला भेट दिली. तिथे मोठ्या प्रमाणावर तयार खाद्यपदार्थ बनवण्यात येत होते. ते पाहून माझ्या मनात त्या व्यवसायाविषयी आकर्षण निर्माण झाले.

माझं ऑफिस पिंपरी चिंचवड परिसरात होतं. तिथे अनेक कंपन्या आहेत साहजिकच तयार जेवणाला मोठया प्रमाणावर मागणी होती. या कंपन्यांच्या कॅंटिनला चपात्या करून पाठवण्याचा व्यवसाय सुरू करावा असं मी ठरवलं. त्यासाठी एक बंगला भाड्याने घेतला. पहिली ऑर्डर मिळाली ती १५० चपात्यांची. बजाज, कॅडबरी, सेंचुरी एन्का, हिंदुस्तान अॅटिबायोटिक्स अशा अनेक कंपन्यांमधून भराभर ऑर्डर्स मिळत गेल्या. दोन वर्षात आम्ही दररोज १०,००० चपात्यांपर्यंत हा व्यवसाय वाढवला. या व्यवसायात मी टेंडर भरण्यापासून ते मालाचा दर्जा टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टी शिकले. स्वत: व्यवसाय करायचा आणि तो वाढवायचा याची मला उपजतच आवड होती. हा चपात्यांचा प्रोजेक्ट करायला घेतला तेव्हा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी माझी नोकरी चालू होती. सेंटरचे काम तीन शिफ्टमध्ये चालत असे. सकाळी ५.३० वाजता सेंटर सुरु होत असे. कामावर देखरेख करायला मी ३ सुपरवायझर्स नेमले आणि सकाळ संध्याकाळ मी स्वत: तिथे हजर राहात असे. दर गुरुवारी मालाची खरेदी करायला मी जात असे.त्यावेळी गिरणीवाले, टेम्पोवाले, मालाची चढ उतार करणारे अशा अनेक माणसांशी माझा संबध येत असे. मी माझ्या व्यवसायामध्ये कित्येक प्रामाणिक आणि मेहनती माणसं जोडली. जवळपास ९०% लोकांकडून चांगलेच अनुभव मिळत गेले. जे १०% चांगले नव्हते त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी कायम उत्तम व्यवसाय करण्याचं आणि तो वाढवण्याचं उद्दिष्टच डोळ्यासमोर ठेवलं. १० वर्षं हा व्यवसाय केल्यावर मी माझ्या जाऊबाई आणि इतर काही उद्योगिनींच्या हाती हा तयार व्यवसाय सोपवला आणि मग फ्रोझन फुड्सकडे वळले.

’रेडी टू इट’ खाद्यपदार्थ एक्पोर्ट करण्याच्या व्यवसायासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे होते?

एक्स्पोर्टचा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन गोष्टी माझ्या गाठीशी होत्या. १. अनुभव २. जागा आणि ३. भांडवल उभे करण्याची ताकद. या बळावर २००० मध्ये मी मेथी पराठे तयार करून फ्रोझन स्वरूपात एक्स्पोर्ट करायला सुरुवात केली. प्रत्यक्ष हा व्यवसाय सुरु करण्याआधी यासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान, मशिनरी, बाजारपेठ या सगळ्याचा आम्ही सखोल अभ्यास केला. माझे यजमान इंजिनिअर असल्याने नवनवीन तंत्रज्ञान, आवश्यक मशिनरी, त्यांचा मेंटेनन्स, वापरण्याची कौशल्ये या बाबी तेच सांभाळतात. ऑर्डर घेणे आणि त्या एक्झिक्युट करणे ही माझी जबाबदारी असते. आता माझा मुलगा कौस्तुभ एमबीए करून आमच्या व्यवसायातच लक्ष घालत आहे. ऑनलाईन बिझिनेस, बॅकेचे व्यवहार वगैरे तोच सांभाळत आहे. आमचे संपूर्ण कुटुंब यात एकत्र आल्यानेच हा व्यवसाय टिकवणे आणि वाढवणे शक्य आहे.

परदेशात जेव्हा माल पाठवला जातो तेव्हा प्लांटची रचना, माल कसा तयार केला जात आहे, स्वच्छतेचे नियम, दर्जाविषयक अटी, कच्च्या मालावरील प्रक्रिया, प्रत्येक तयार पदार्थाचे वजन, पॅकिंग, लेबलिंग अशा अनेक गोष्टींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. यासाठी परदेशातूनही पाहणी करण्यासाठी लोक येतात. आता आम्ही UK,Australia, Newzealand,Gulf countries अशा अनेक ठिकाणी ३२ प्रकारचे खाद्यपदार्थ निर्यात करतो. यामध्ये आठ प्रकारचे पराठे, तीन प्रकारच्या कचोऱ्या, अळुवडी, सामोसे, स्प्रिंग रोल्स, चिरलेल्या भाज्या यांचा समावेश आहे. यात कुठलयाही प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्हज वापरले जात नाहित. पदार्थ तयार झाले की ज्या रुममध्ये पॅकिंग केले जाते तिथपासून तापमानाची काळजी घेतली जाते. पॅकिंग केलेला माल -40 डिग्री तापमानाला साठवला जातो. तयार केलेला माल २ वर्षे टिकतो. यासाठी लागणारी मशिनरींच्या किमती प्रचंड असतात आणि त्याचा मेंटेनन्सही चोख ठेवायला लागतो.

आपल्या व्यवसायाचे सध्याचे स्वरुप काय आहे?

सुरुवातीला आम्ही चिंचवडच्या ५००० स्वे.फुट जागेत काम करत असू पण त्यामुळे मोठ्या ऑर्डर्स घेण्यावर बंधने यायला लागली. मग तळेगावला 7.5 एकराची मोठी जागा घेऊन २०१२ पासून आम्ही या नवीन जागेत व्यवसाय हलवला. ६० मेट्रीक टन स्टोअरेज आणि ५०० किलोचा ब्लास्ट फ्रिज च्या जागी आता १५०० मेट्रीक टनाचे स्टोअरेज आणि २००० किलोचा ब्लास्ट फ्रिझर, ३००० स्वे.फुट पॅकिंग रुम, अत्याधुनिक प्रोसेसिंग मशीन्स याच्यामुळे आता मोठ्या ऑर्डर्स घेणे शक्य झाले आहे.

आधी आम्ही इतर मोठमोठ्या ब्रॅंड्ससाठी माल तयार करून देत होतो. आता मात्र आमच्याच ब्रॅंडच्या नावाखाली हा माल निर्यात केला जातो. ऑर्डर आली की तीन महिने आधी माल तयार ठेवला जातो. मात्र आम्ही फ्रोझन फुड्सच्या व्यवसायावरच पूर्णपणे अवलंबून नाही. या मुख्य व्यवसायाच्या जोडीलाच आम्ही फळं आणि भाज्यादेखील UAE, UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, निर्यात करतो. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांचा माल योग्य भावाने खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. बाहेरील देशांमधून आपल्याकडील मालाला चांगली मागणीदेखील आहे. खेड, मावळ, भोर इ.तालुक्यातील शेतकऱ्यांकडून किंवा इतर राज्यांमधूनही आम्ही भाज्यांची घाऊक प्रमाणात खरेदी करतो. दुबई, सौदी अशा देशांमध्ये दर महिन्याला ३०० टन कांदा पाठवतो. सिझनप्रमाणे सुमारे २५०० टन द्राक्षंदेखील थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून निर्यात केली जातात.

आमचा बहुतांश कामगार वर्ग हा कंत्राटी पद्धतीने ठेवलेला आहे. यातील बरीचशी कामं श्रमाची असल्याने पुरुष कामगारांचे प्रमाण अधिक आहे.

या क्षेत्रातील व्यवसाय संधींविषयी काय सांगाल?

जोपर्यंत माणसं जीवंत आहेत तोपर्यंत खाद्यपदार्थांच्या व्यवसायाला मरण नाही. रेडी टू ईट पदार्थांची मागणी तर कायमच वाढणार आहे. नवीन पिढीकडे करिअर, शिक्षण यातून जेवण तयार करण्यासाठी वेळ खूप कमी आहे. त्यामुळे घरच्या चवीचे पराठे, कचोऱ्या यांना खूप मागणी येते. शिवाय यात कुठल्याही प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्हज घातलेले नसल्याने, दर्जाबाबत अत्यंत काटेकोर दक्षता घेतल्याने आरोग्याला अपायकारक असे त्यात काहीच नाही.

नवीन सरकारने अनेक नवीन सुधारणा केल्यात. आम्हाला मिळणारी सबसिडी आता आमच्या बॅंक खात्यावर परस्पर जमा होते. अनेक व्यवहार ऑनलाईन झाल्यामुळे धावपळही खूप कमी झाली आहे. दळणवळणाच्या सोयींबाबत सांगायचं तर त्यात कसलीच अडचण नाही. जवाहरलाल नेहरू पोर्टवरून दररोज २५ टन वजनाच्या २५०० कंटेनरची ने-आण केली जाते. शिपिंग कंपन्यांचं नेटवर्क पण खूप व्यापक आणि चांगलं आहे. फॅक्टरीतून माल उचलण्यापासून ते रेफ्रिजरेटेड कंटेनर्समधून डॉकला नेण्यापर्यंत सर्व काळजी व्यवस्थितपणे घेतली जाते. ऑर्डर घेऊन कच्चा माल बाजारातून उचलण्यापासून तो गरजेप्रमाणे कंटेनरमध्ये भरणे ह्या सगळ्यामध्ये व्यवस्थापन हेच सर्वात महत्त्वाचे ठरते. "Management is the business!’ हेच शेवटी खरं. आज २७ वर्षं मी या व्यवसायात आहे. मीही खूप मोठ्या अपयशांना तोंड दिलं आहे आणि त्याच अनुभवांतून मिळालेल्या शहाणपणावर पुन्हा जिद्दीने उभी राहिले आहे. कुटल्याही परिस्थितीला न डगमगता , निराश न होता खंबीरपणे तोंड दिले. नवीन व्यावसायिकांना यात भरपूर संधी आहेत. पण केवळ पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर हा धंदा यशस्वी होणं कठीण आहे. त्यांनी प्रत्यक्ष कृतीचा अनुभव घेण्यासाठी आधी लहान प्रमाणात व्यवसाय सुरू करून पाहावा. मग बाजारपेठेची मागणी, आपले व्यवस्थापनाचे कौशल्य, आर्थिक जोखीम पेलण्याची ताकद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबियांची साथ या सगळ्याचा सारासार विचार करावा आणि जरूर या व्यवसायात उतरावे.

 

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division