एअर अॅम्बुलन्स सेवा ही आजच्या काळाची गरज आहे.

- मंदार भारदे (संचालक, मॅब एव्हिएशन)

mandar bhardeविमानसेवा म्हटलं की त्याकडे श्रीमंतांची चैन अशाच दृष्टीने पाहिलं जातं. मात्र या सेवेला आरोग्यसेवेशी जोडून "मॅब एव्हिएशन' तर्फे एअर अॅ्म्ब्युलन्स ची सुविधा पुरवली जाते. या अनोख्या व्यवसायाविषयी या कंपनीचे संचालक मंदार भारदे यांच्याशी बातचित केली आहे चित्रा वाघ यांनी...

आपल्या व्यवसायाचे स्वरूप काय आहे आणि याकडे आपण कसे वळलात?

मी मुळचा नाशिकचा. मधमवर्गीय कुटुंबात वाढलेला. त्या काळात मी शॉर्टफिल्म्स आणि डॉकुमेंटरीज तयार करत असे. एकदा पंढरीच्या वारीचे शुटिंग करण्याचे होते. बजेटही बऱ्यापैकी होते. त्यामुळे अथांग पसरलेल्या वारीचे वरून शुटींग करण्यासाठी हेलिकॉप्टर वापरण्याचे ठरले. मात्र अनेक प्रयत्न करूनदेखील त्याची सोय करणे आणि परवानग्या काढणे जमले नाही. तेव्हा एक मात्र झाले, या हेलिकॉप्टर भाड्याने वापरण्याच्या व्यवसायाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. अनेक ठिकाणी चौकशी केली. मुंबईच्या पवनहंस विमानतळावर अशा प्रकारची सुविधा उपलब्ध असल्याचे समजले. त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तिथे गेलो. मात्र नक्की कुणाला भेटायचे आहे ते माहित नाही, तिथे काम करणाऱ्या कुणाचे नाव माहित नाही असं असल्याने दारातूनच परत फिरावं लागलं. असं एकदोनदा नाही तर तब्बल आठ वेळा झालं. माझा राजकारणातील काहीजणांशी थोडाफार संबंध होता त्यामुळे एकदा एका मंत्रीमहोदयांच्या ताफ्यासमवेत आतमध्ये गेलो.

पुढे जगभरात मोठ्या प्रमाणात आणि भारतात अत्यल्प प्रमाणात चालणाऱ्या या एव्हिएशन क्षेत्राविषयी मिळेल तिथून माहिती गोळा करणं सुरु झालं. ज्यांच्या मालकीची हेलिकॉप्टर्स किंवा खाजगी विमानं आहेत अशांबरोबर भाडेपट्टी करारावर काम सुरु झालं. आणि "मॅब एव्हिएशन'च्या कामाला सुरुवात झाली. या विमानांची देखभाल, पार्किंग व्यवस्था, पायलट्स, इंजिनिअर्स इ. कर्मचारी वर्ग असं संपूर्ण व्यवस्थापन सुरू झालं. कंपन्यांचे मोठे अधिकारी, राजकारणी, सिनेकलावंत अशा अनेकांकडून चार्टर्ड विमानसेवेसाठी वर्षभर मागणी असते. मात्र आता आम्ही तातडीच्या आरोग्यसुविधांसाठी ही सेवा वापरण्यावर लक्ष केंदीत केलं आहे.

एअर अॅम्बुलन्स सेवा सुरू करावी असं का वाटलं?

काही वर्षांपूर्वी उत्तराखंडात ढगफुटीने हा:हाकार माजवला. अशा संकटाच्या आणि अटितटीच्या परिस्थितीत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आपल्याकडे एअर अॅ्म्ब्युलन्स ची सोय नसणं ही घटना फार लाजिरवाणी आहे. त्याच घटनेने या क्षेत्राची गरज माझ्या लक्षात आली.

आरोग्यसेवेची वाढती गरज आणि वेळेच्या बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन आम्ही आता एअर अॅम्बुलन्स सर्विसेस या क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. नुकतीच आम्हाला एव्हिएशनची परवानगी मिळाली. आता आमच्याकडे आमचा स्वत:चा विमानांचा ताफा असेल. त्यादृष्टीने इतर कामे मार्गी लावणं आता चालु आहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असेल तसंच नियमांमध्ये, कायद्यांमध्येही काही बदल करावे लागतील.

वैद्यकशास्त्रात प्रचंड वेगाने प्रगती होत आहे. अवयव प्रत्यारोपण हे त्यापैकीच एक. सुदैवाने अवयव दानाच्या बाबतीतही समाजात जागृती दिसून येत आहे. एका शहरातील व्यक्तीचा अवयव दुसऱ्या शहरातील रुग्णापर्यंत कमीत कमी वेळात पोहोचवणं हे केवळ सुसज्ज एअर अॅ्म्ब्युलन्स मुळेच शक्य होतं. अशा प्रकारची अनेक कामं आम्ही नियमितपणे करत आहोत. गेल्या एकदोन वर्षात मुंबईत हृदय तसेच अन्य अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी तातडीने विमानसेवा उपलब्ध होणे, अवयव रुग्णांपर्यंत वेळेत पोहोचणे आदी प्रश्न ऐरणीवर आले होते. त्यामुळे केवळ अत्यवस्थ रुग्णांकरिता व अवयव वाहतुकीसाठी संपूर्णपणे समर्पित अशा हवाई अॅहम्ब्युलन्स सेवेची गरज अधोरेखित झाली होती. हे क्षेत्र आपल्यासाठी नवीन असल्याने याक्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी अजूनही लोकांची तेवढी तयारी नाही. शासकीय पातळीवरदेखील ही जाणीव तितकीशी रुजलेली नाही. मात्र परिस्थिती हळुहळु बदलत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर या प्रस्तावास त्यांनी तातडीने प्रतिसाद दिला. मॅब एव्हिएशनतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या या देशातील पहिल्यावहिल्या एअर अॅम्बुलन्स प्रकल्पाची घोषणा गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या "मेक इन इंडिया’च्या भव्य प्रदर्शनात करण्यात आली.

mandar bharde 1वैद्यकीय सेवेसाठी हवाई वाहतुकीला कितपत मागणी आहे?

रुग्णांना कमीतकमी वेळात आवश्यक उपचारांचा लाभ घेता यावा यासाठी दिवसेंदिवस ह्या सेवेची मागणी वाढत आहे आणि सोयींची उपलब्धता मात्र अत्यल्प आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर आमच्या कॉल सेंटरवर येणाऱ्या १० पैकी ९ जणांना आम्हाला नाईलाजाने नकार द्यावा लागतो. मोठ्या शहरांमध्ये 1000 कोटींची गुंतवणुक करून हॉस्पिटल उभं राहतं पण 10-12 कोटी गुंतवून एअर अमब्युलन्सची सोय मात्र केली जात नाही.

10-15 वर्षांपूर्वी मोबाइल वापरणे हे श्रीमंतांपुरते मर्यादित होते. इनकमिंग कॉलसाठीसुद्धा भरपूर पैसे मोजावे लागत पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. हीच शक्यता विमानसेवेच्या क्षेत्रात येऊ शकते.

आज कित्येकजण असे आहेत की ज्यांना केवळ व्यवसायापुरतं मुंबईमध्ये यावंस वाटतं पण इथे राहण्यावाचून इलाज नसतो. भविष्यात जर उत्तम दर्जाची विमानसेवा उपलब्ध झाली तर मुंबईपासून 200-250 किमी.वर स्थायिक होऊन फक्त कामापुरतं रोज मुंबईत येणं लोक पसंत करतील.

जागतिक पातळीवर यशस्वी ठरलेले कुठलाही तयार फॉर्म्युला आपल्याकडे चालत नाहीत. भारतातील परिस्थितीनुसार त्यात आपल्याला बदल करावेच लागतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडचे 90टक्क्याहून अधिक लोक अमावस्येला पेशंटला हलवत नाहीत. कोणाला पटो अथवा न पटो, पण ह्या गोष्टी आपल्याला ध्यानात घ्याव्याच लागतात.

एव्हिएशन क्षेत्रात व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल?

आज भारताला जर १०० विमानांची गरज आहे तर आपल्याकडे केवळ ५ उपलब्ध आहेत. त्यामुळे या क्षेत्रात संधी भरपूर आहेत आणि अनेकांनी या व्यवसायात येण्याची गरज आहे. पण मेहनतीची तयारी हवी. जिंवत अवयव किंवा अत्यवस्थ रुग्ण इथून तिथे हलवणे या गोष्टी आधी प्लानिंग करून ठरवता येत नाहीत. परिस्थिती कायमच आणीबाणीची असते त्यामुळे या व्यवसायात काम करायचे असेल तर मेहनत घेण्याची तयारी तर हवीच पण कामासाठी कायम तत्पर असणेदेखील आवश्यक आहे. मात्र या कामातून मिळणारे समाधान फार वेगळ्या प्रकारचे आहे.

एक अनुभव सांगतो. मुंबईतल्या हॉस्पिटलमधील एका 14 वर्षांच्या मुलाच्या हृदयाचे ऑपरेशन होते. त्याच्यासाठी सूरतमधून हृदय आणले गेले. ऑपरेशन झाल्यावर ठाण्याला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये मी त्याला भेटायला गेलो. जो मुलगा काहीही करण्याच्या परिस्थितीत नव्हता तो ICUमध्ये चक्क चालत होता. ते दृश्य पाहून मी खरोखर सुन्न झालो. अनेकदा बरे झालेले पेशंट कृतज्ञतेने फोन करतात. असे अनुभव आले की प्रकर्षाने वाटतं की हा व्यवसाय चांगला आहेच पण खूप वेगळे समाधान देणारादेखील आहे.

आपल्या आगामी योजनांबद्दल काय सांगाल?

पुढल्या महिन्यात आमच्याकडे 3 नवीन एअरक्राफ्ट्स दाखल होत आहेत ज्यामध्ये पेशंटवर उपचार चालू ठेवतच त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवणं शक्य होईल. प्रवासादरम्यान त्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर्सना प्रशिक्षण देण्याचे काम सध्या चालू आहे.

सध्या एक विमानतळ ते दुसरे विमानतळ अशा स्वरूपाची सेवा आम्ही देत आहोत पण भविष्यात याचा फायदा रस्त्यावरील अपघाताच्या ठिकाणाहून जखमी माणसांना तातडीने हलवण्यासाठी व्हावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. "हवाई रुग्णवाहतूक' या क्षेत्रावरच लक्ष केंदीत करण्याचे आम्ही ठरवले आहे आणि त्यासाठी पुढच्या दहा वर्षांत ६०० कोटीची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division