मॅक्सेल पुरस्कार सोहळा

Maxell group pic

"समृद्धीला गांधीविचारांची व मूल्यांची जोड द्यायला हवी!'- सॅम पित्रोदा

"आपण विलक्षण वेगवान आणि आव्हानात्मक काळातून जात आहोत. अनेक समस्या जगाला भेडसावत आहेत. परंतु अशी कोणतीही समस्या नाही की जी आपल्याला सोडवता येणार नाही. टेक्नॉलॉजी उर्फ तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते. तंत्रज्ञानाने गेल्या ७० वर्षांच्या काळात अफाट प्रगती केली आहे, पण केवळ तंत्रज्ञानावर विसंबून प्रश्न सुटणार नाहीत. जी समृध्दी निर्माण होत आहे व होणार आहे ती जर न्याय्यपध्दतीने समाजात पोचली नाही, विषमता दूर केली नाही तर मात्र अरिष्ट ओढवेल. म्हणूनच समृध्दीला गांधीजींच्या विचारांची व मूल्यांची जोड द्यायला हवी.' असे उद्गार भारतात टेलिकम्युनिकेशनची क्रांती घडविणारे इनोव्हेटर व पॉलिसी मेकर सॅमपित्रोदा यांनी मॅक्सेल पुरस्कार सोहळ्यात काढले. मॅक्सेल म्हणजेच महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्सचा 2017चा पुरस्कारप्रदान सोहळा ५ मे रोजी पुणे येथील यशदा ऑडिटोरियममध्ये दिमाखात संपन्न झाला. "गांधीजींनी सांगितलेल्या नि:स्वार्थ, निर्लोभ, अहिंसा व सत्य या मूल्यांचा केवळ निरर्थक जप करून चालणार नाही. आपल्याला ती मूल्ये आपल्या जीवनशैलीत रुजवायची वेळ आली आहे. जुनाट व जळमटे चढलेल्या संस्था व विचार सोडून द्यायला हवेत. मॅक्सेलने या कार्याला वाहून घेऊन समाजात संवाद आणि संपर्क प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.' असेही मत त्यांनी व्यक्त केले.

मॅक्सेलचे सल्लागार व विश्वस्त, ज्येष्ठ संपादक कुमार केतकर या प्रसंगी म्हणाले, "जगात व देशात एक अस्वस्थता व अनिश्चितता पसरलेली दिसते, त्यामुळे भले भले निराशेच्या गर्तेत जाताना दिसतात. परंतु सॅम पित्रोदायांचे वैशिष्ट्य म्हणजे ते उदंड व दुर्दम्य आशावादी आहेत. आशावादाला उभारी देणे हे मॅक्सेल पुरस्कारांचे एक उद्दिष्ट आहे, म्हणूनच ह्या कार्यक्रमाला सॅम पित्रोदा हे प्रमुख पाहुणे असणे हे या विचारांचे नेमके प्रतिबिंब आहे. 'सॅम पित्रोदा यांनी बजावलेल्या अफाट कामगिरीचा उल्लेख करत कुमार केतकरपुढे म्हणाले, "अत्याधुनिक तंत्रज्ञान देशात आता आहे. ते सर्व भारतात आणण्यासाठी लागणारी तांत्रिक आणि सामाजिक नेपथ्यरचना आणि मानसिकता सॅम पित्रोदा यांनी रुजवली.'

maxell award winnerनॅसकॉमचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापक किरण कर्णिक यांना मॅक्सेलचा जीवनगौरव प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना किरण कर्णिक यांनी विशेष भर दिला तो डेमिक्रसी व डायव्हर्सिटी या प्रणालींवर. "डायव्हर्सिटी म्हणजे सांस्कृतिक विविधता. हेच भारताचे मोठे सामर्थ्य आहे, तसेच लोकशाही ही त्या सांस्कृतिक वैविध्याचे जतन करण्यासाठी अत्यावशक आहे. त्याचप्रमाणे नवनिर्मितीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान आपल्याला विकसित करत रहावे लागेल.' असे मत किरण कर्णिक यांनी व्यक्त केले.

मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापक- विश्वस्त कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार या प्रसंगी म्हणाले, "गेल्या सहा वर्षात सुमारे पन्नास व्यक्ती व संस्था यांना मॅक्सेलने पुरस्काराने गौरवलेले आहे. आता शालेय मुलांपर्यंत उद्यमशीलता पोचावी म्हणून मक्सप्लोअर उपसंस्थाही सुरू केली आहे. 'मॅक्सेलच्या आगामी उपक्रमांविषयी बोलताना "या उपक्रमांमागे वैज्ञानिक आधुनिकता आणि गांधीजींनी रुजवलेली मूल्ये या दोन्हीचा मिलाफ हेच सूत्र असेल.' असे उद्गार त्यांनी काढले. त्याचप्रमाणे उद्योजक अशोक जैन यांना 'एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप', डॉ. अविनाश फडके यांना 'एक्सलन्स इन बिझिनेस लिडरशिप', पुण्याच्या शिवराय टेक्नॉलॉजीज लिमिटेड या आस्थापनाला 'एक्सलन्स इन इनोव्हेशन्स', चेतना पवार यांना 'स्टार्ट अप' आणि समाजासाठी योगदान देणार्या चित्रा मेटे यांना "मॅक्सेल-एक्सलन्स'चा खास पुरस्कार असे पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले.

सोहळ्याला मोठ्या संख्यने निमंत्रित उपस्थित होते.

सॅम पित्रोदा यांच्या "ड्रिमिंग बिग' या गाजलेल्या आत्मचरित्राचे शारदा साठे यांनी केलेल्या "महास्वप्न' या भाषांतरीत पुस्तकाचे या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division