'उद्योजकता ही वृत्ती झाली पाहिजे!'

- डॉ.जयंत अभ्यंकर, संचालक, शारंगधर फार्मा प्रा.लि.

Sharangdharगेल्या 31 वर्षांपासून आयुर्वेदिक औषधनिर्मिती क्षेत्रात कार्यरत असणारी "शारंगधर फार्मा प्रा.लि.' ही एक अग्रगण्य कंपनी. आयुर्वेदाच्या मूळ तत्त्वांना न सोडता आधुनिक काळानुसार त्यात आवश्यक बदल करत गोळ्यांच्या स्वरुपात ही निर्मिती केली जाते. या क्षेत्राविषयी आणि "शारंगधर'च्या प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी कंपनीचे संचालक डॉ.जयंत अभ्यंकर यांच्याशी चित्रा वाघ यांनी केलेली बातचित.

१. आपल्या व्यवसायाचे स्वरूप काय आहे? आपण याकडे कसे वळलात?

खरं तर मी विज्ञानाचा विद्यार्थी. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले. मात्र घरी आई वडील आयुर्वेदिक डॉक्टर असल्याने आयुर्वेदाचे संस्कार लहानपणापासूनच खोलवर रुजलेले होते. माझे वडील "आयुर्वेद रत्नशाला’ येथे नोकरी करत होते. आपणही याच क्षेत्रात जावं असं वाटायला लागलं. 1986 मध्ये "शारंगधर फार्मा'ची मुहूर्तमेढ रोवली. पण आयुर्वेदाचं रितसर शिक्षण घेतलेलं नव्हतं. मग मी पुणे विद्यापीठातून पाच वर्षांचा आयुर्वेदाचा शास्त्रोक्त अभ्यासक्रम पूर्ण केला. आयुर्वेदाचार्य ही पदवी मिळवली. व्यवसाय यशस्वी करायचा तर त्यात काहीतरी वेगळेपण असणं गरजेचं असतं. त्यानुसार चूर्ण, चाटण, काढे अशा स्वरुपातील आयुर्वेदिक औषधांचं पारंपरिक स्वरुप बदलून त्यांना गोळ्यांच्या स्वरुपात आणायला आम्ही सर्वप्रथम सुरुवात केली. दुकानांमधून विकली जाणाऱ्या म्हणजेच "ओव्हर द काऊंटर’ या प्रकारात मोडणाऱ्या वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधींपासून बनवलेल्या 60 प्रकारच्या टॅबलेट्सचे आम्ही उत्पादन करायला लागलो. प्रोपरायटरी आयुर्वेदिक मेडिसिन्स या क्षेत्रात उतरणारी "शारंगधर’ ही पहिली कंपनी ठरली. आता आयुर्वेदाला जगभरातून मान्यता मिळत आहे, या उपचारपद्धतीवर लोकांचा विश्वास बसत आहे. मात्र 31 वर्षांपूर्वी परिस्थिती निराळी होती. आयुर्वेदाच्या प्रसारासाठी जनजागृती होणे आवश्यक होते. उत्तम आरोग्य, विविध आजार आणि त्यावरील उपलब्ध असलेल्या औषधांविषयी सर्वसामन्यांना योग्य माहिती व्हावी यादृष्टीने घरचा वैद्य, वैद्यराज यासारखी पुस्तके मी लिहिली. लोकांना ती मोफत वाटली. 

उप्तादनांमध्ये नावीन्य आणण्याच्या दृष्टीने आम्ही अनेक यशस्वी प्रयोग केले. ग्रॅन्युल्सच्या स्वरुपातले कोरडे च्यवनप्राश, गुलकंद या उप्तादनांना परदेशातदेखील चांगली मागणी आहे. आजही आमच्या रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट विभागात सतत वेगवेगळे प्रयोग केले जातात. 1991 पासून अमेरिका, जपान, जर्मनी अशा देशांमध्ये आम्ही उत्पादने निर्यात करत आहोत. आता तर जवळपास सर्व देशात आमची उत्पादने विकली जातात. गेल्या ३१ वर्षांमध्ये व्यवसायात अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे, त्यात ग्राहकांसाठी मोफत सल्ला केंद्रं, आरोग्य केंद्रं, स्वतंत्र पंचकर्म विभाग यांचा समावेश करण्यात आला आहे. 15 तज्ज्ञ डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली "शारंगधर हेल्थलाईन'ही मोफत सेवादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२. या व्यवसायाला लागणारा कच्च्या मालाची उपलब्धता आणि दर्जाविषयी आपण काय सांगाल?

आयुर्वेदिक औषधांसाठी लागणाऱ्या सुमारे ९०% वनस्पती भारतात उपलब्ध आहेत. इथली जैवविविधता ही आपल्या दृष्टीने जमेजी बाजू आहे. पूर्वी आम्ही ठेकेदारांकडून औषधी वनस्पतींची घाऊक स्तरावर खरेदी करत असू. गेल्या पाच वर्षांपासून मात्र आम्ही "कृषी आयुर्वेद संजिवनी' हा प्रकल्प यशस्वीपणे राबवत आहोत. पारंपरिक शेतकऱ्यांकडून आम्ही हमीभावाने कच्च्या मालाची थेट खरेदी करत आहोत. यामध्ये मालाच्या दर्जावर नियंत्रण ठेवणे, आवश्यक तिथे बियाणे पुरवणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे याचा समावेश होतो. सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या निमित्ताने अर्थार्जनाची एक उत्तम संधीदेखील यामुळे मिळत आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजराथ, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंधप्रदेश अशा ठिकाणांहून हा कच्चा माल मागवण्यात येतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वनौषधींच्या उत्पादनाकडे लक्ष वळवणे गरजेचे आहे. उदा. गुग्गुळ ही अत्यंत उपयुक्त वनस्पती. मात्र याचे उत्पादन अफगाणिस्तानसारख्या कोरड्या वाळवंटी प्रदेशात होते. याच्या एका टनाची किंमत तब्बल 5 लाख रुपये इतकी आहे. मराठवाड्यासारख्या ठिकाणी याचे पिक काढण्याचे प्रयत्न करायला हवेत. आमच्या स्तरावर आम्ही शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करतोच पण त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे शासनाने याबाबतीत लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 

Sharangdhar SWS 2872३. आयुर्वेदाला मिळणाऱ्या जागतिक मान्यतेचा आपल्या व्यवसायावर कसा परिणाम झाला आहे?

आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार सध्या उत्तम आहे. जगभरातून लोकमान्यता आहे मात्र अजूनही परदेशामधून राजमान्यता मिळत नाही. मागणी भरपूर असली तरी आजही औषध म्हणून हा व्यापार होऊ शकत नाही तर ती "पूरक अन्न', "पौष्टिक पदार्थ' अशा लेबलखाली विकावी लागतात. उत्तम औषधी गुण असणाऱ्या उत्पादनांची अशा पद्धतीने विक्री करणे अनेक उत्पादकांना ते पटत नाही. याबाबतीत शासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. परदेशातलं चांगलं ज्ञान आपण नेहमीच घेत आलोय. उदाहरण द्यायचं तर होमिओपॅथीचं देता येईल. जर्मनीत उगम पावलेली ही औषधोपचार पद्धती. पण तिची उपयुक्तता पाहून आपण ती सहज आपलीशी केली. ही आपली सहिष्णुता! पण हाच उदारभाव हजारो वर्षांचा वारसा असलेल्या आयुर्वेदाबाबत इतर देश दाखवत नाहीत. आयुर्वेद ही साईड इफेक्ट नसलेली व सर्वात सुरक्षित औषधोपचार पद्धती असल्याची ग्वाही ’वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेश”ने देऊनही परिस्थिती फारशी बदललेली नाही. जगातील इतर देशांमधील सरकारांची मानसिकता बदलेल तेव्हा खऱ्या अर्थाने फार्मसीची जागतिक बाजारपेठ आपल्याकडे येईल.

देशातील अंतर्गत व्यापारातही अनेक अडचणी आहेत. "ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमिडिज अॅक्ट’ नुसार सुमारे 52 ते 54 आजारांची जाहिरात करता येत नाही. काविळीसारख्या आजारावर अॅलोपथीमध्ये औषध नाही पण आयुर्वेदात आहे. पण या गोष्टी शासनाला मान्य नाहीत. औषधांमध्ये वापरलेल्या घटकांचे औषधी उपयोग लेबलवर लिहायला मान्यता नाही. अॅलोपथिक औषधांची गरज आणि परिणाम दोन्ही मान्य केले तरी त्यांची मक्तेदारी मोडून काढणे शक्य आहे. आज जगभरात बंदी घातलेली कित्येक अॅलोपथिक औषधे सर्रास खपवली जात आहेत. रासायनिक औषधांना उत्तम पर्याय ठरतील अशी औषधे आम्ही सुचवत आहोत. वरवर पाहता आयुर्वेदाचा उदो उदो होताना दिसत असला तरी शासनाकडून प्रत्यक्ष धोरणांमध्ये त्याला दुय्यम स्थान दिलं जात आहे हे अनेकदा दिसत आहे. जीएसटीचा केवळ विचार केला तरी अॅलोपथिक औषधांवर 5 % तर आयुर्वेदिक औषधांवर दुपटीहून अधिक म्हणजे 12% इतका जीएसटी आपल्याकडे आकारला जातो ही वस्तुस्थिती आहे. मात्र सध्या ट्रेंड बदलत आहे. योग, आयुर्वेदीक यांना चांगले दिवस येत आहेत. गरज आहेत ती वर्षानुवर्षांच्या मानसिक गुलामगिरीमधून बाहेर येण्याची!

४. गुणवत्ता टिकवण्याच्या दृष्टीने "शारंगधर'मध्ये कोणते प्रयत्न केले जातात?

पुण्यातील कोंढवा येथील २०,००० स्क्वे.फुट परिसरात "शारंगधर नॅचरल हेल्थकेअर'ची उभारणी करण्यात आली आहे. पारंपरिक आयुर्वेद शास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय साधून आमच्याकडे औषधनिर्मिती केली जाते. संशोधन व विकास (R & D) तसेच Quality Control असे दोन स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. आमच्याकडील अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज अशा प्रयोगशाळांमधून नवनवीन शास्त्रीय संशोधनावर भर दिला जातो. औषधांचा दर्जा टिकवण्यासाठी यात वापरण्यात येणाऱ्या वनौषधींचे काटेकोर परीक्षण केले जाते तसेच कंपनीच्या कुठल्याही उत्पादनात रासायनिक घटकांचा वापर होणार नाही याची दक्षता घेतली जाते. आयुर्वेदिक औषधांवर अनेकदा एक्स्पायरी डेट घातली जात नाही. काही औषधांचा अपवाद सोडला तर जवळपास ९९% औषधे ठराविक काळानंतर प्रभावहीन होतात. त्यांच्यापासून अपाय झाला नाही तरी फायदाही होत नाही. मात्र अगदी पहिल्या दिवसापासून "शारंगधर'च्या सर्व उत्पादनांवर एक्स्पायरी डेट नमूद करण्याचा नियम आम्ही पाळत आहोत.

५. राज्यातील उत्पादन क्षेत्रापुढे कुठली आव्हाने आहेत असे आपलाला वाटते?

आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादन क्षेत्राबाबत बोलायचे तर सध्या ती बाजारपेठ २००० कोटी इतकी आहे. मात्र एकूण औषधांची बाजारपेठ लक्षात घेतली तर त्याची आकडेवारी ३ लाख कोटी इतकी प्रचंड आहे. यामागे फार मोठे अर्थकारण आहे. जगातील अनेक मोठमोठ्या कंपन्या त्यांची रासायनिक औषधे इथे खपवण्यात यशस्वी होत आहेत. आम्ही सरकारला सुचवत आहोत की यापैकी किमान १०% वाटा हा आयुर्वेदिक औषधांचा असावा यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. या वाढीव उत्पादनासाठी कच्चा माल हा कृषीक्षेत्राकडून येत असल्याने शेतकऱ्यांनादेखील त्याचा मोठा फायदा होऊ शकेल. सर्वसाधारण उद्योगक्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर खेदाने असे म्हणावे लागेल की उद्योगांचे प्रमोशन योग्य प्रकारे होईल अशा कुठल्याच योजना आपल्याकडे यशस्वीपणे राबवल्या जात नाहीत. कुठलीही इंडस्ट्री उभी करताना अनेक कायदे आड येतात. वेगवेगळी लायसेन्स, ना हरकत प्रमाणपत्र, इन्स्पेक्शन ह्या तीन गोष्टींचा अतिरेक झाल्यामुळे उद्योग सुरू होण्यात प्रचंड विलंब होत आहे. देशभरात विखुरलेले जे ५ कोटी लघुउद्योगांचे जाळे आहे त्यावर संपूर्ण उद्योगविश्व उभारलेले आहे. पण या उद्योगांना प्रोत्साहन मिळेल अशा योजना केवळ कागदपत्रांवर राहतात असेच चित्र दिसत आहे. लघुउद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक खिडकी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे तसेच प्रातिनिधिक तक्रारींची तत्परतेने दखल घेणे जरूरी आहे. करमाफी, सबसिडी हे नसेल तरी एकवेळ चालेल पण उद्योगाचे कामकाज सुरळीतपणे होणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय उद्योगनिर्मिती हा रोजगारनिर्मितीचा त्याचप्रमाणे कर उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आहे त्यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शासनाने उद्योगक्षेत्राकडे विशेष गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

६. स्वत:चा उद्योग सुरू करणाऱ्या तरुणांना आपण काय सांगाल?

मी त्यांना सांगीन की सतत नाविन्याचा ध्यास घ्या. वर्षानुवर्षे जे उद्योग सुरु आहेत ते तशाच ठराविक पद्धतीने सुरू करणे म्हणजे हजारो लोकांबरोबर शर्यतीत धावण्याप्रमाणे आहे. ही "आंत्रप्रेन्युअरशिप’ नाही. उद्योजकता ही वृत्ती बनली पाहिजे. आपले उत्पादन किंवा त्याची उत्पादन पद्धती, मार्केटींग तंत्र यापैकी कुठे ना कुठे सृजन, नाविन्य असायलाच हवे. त्यासाठी पुरेसा अभ्यास, संशोधन करण्यासाठी मेहनत, पैसा आणि वेळ खर्च करण्याची तयारी असायला हवी. एकासारख्या अनेक शाखा काढल्या, भौगोलिक विस्तार केला म्हणजेच विकास झाला असे नाही. प्रत्येक टप्प्यावर योग्य बदल करणेदेखील महत्त्वाचे आहे. यासाठी विस्ताराच्या संकल्पनादेखील बदलण्याची गरज आहे.

डॉ.जयंत अभ्यंकर यांच्याविषयी....

• पुणे विद्यापीठाची आयुर्वेदाचार्य ही पदवी प्राप्त.
• महाराष्ट्र आयुर्वेदिक मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष
• आयुर्वेदिक औषधांसंबंधी 117 पेटंट्स
• आयुर्वेदिक फार्मोकॉलॉजी मधील द्रव्यगुण या विषयाचे लेक्चरर
• घरचा वैद आणि रोगाचा समूळ नाश या पुस्तकांचे लेखक
• महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्रलयातर्फे देण्यात येणाऱ्या बिझिनेस कॉर्पोरेट एक्सेलन्स पुरस्काराचे मानकरी

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division