'ग्रीसच्या संकटाचा भारतावर प्रत्यक्ष परिणाम नाही': राजन

rajanग्रीसमध्ये सुरू असलेल्या आर्थिक संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होणार नसला तरी, त्याची अप्रत्यक्ष झळ भारताला बसणार असल्याचे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले आहे. दिवाळखोरीचे वेशीवर असलेल्या ग्रीसशी थेट व्यापार संबंध खूपच तोकडे असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर या घटनेचे परिणाम खूपच मर्यादित असतील, अशी ग्वाही गव्हर्नर राजन यांनी दिली.

ही अद्याप एक संक्रमणावस्थेतील प्रक्रिया असून, तिचे पडसाद म्हणून बाजारात अस्वस्थता दिसून येईल. परंतु पुढे जाऊन गुंतवणूकदारांना भारताच्या अर्थवृद्धीचा विश्वास अढळ असल्याचे लक्षात येईल,' असे त्यांनी भाष्य केले. अर्थात ग्रीस संकटाचा थेट परिणाम चलन विनिमय दरावर झालेले दिसून येईल. या घडामोडींचे युरो या चलनावरील सावट आणि जागतिक गुंतवणूकदार समुदायाच्या त्या संबंधाने जोखमेच्या भावना काय असतील, हे पाहावे लागेल. तथापि भारतात अर्थविषयक धोरणे चांगली आहेत आणि आर्थिक वाढीच्या शक्यता या उर्वरित जगाच्या तुलनेत खूपच सुदृढ आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शिवाय प्रारंभिक अस्वस्थेचा धक्का पचविण्याइतकी सक्षम बनलेली देशातील विदेशी चलन गंगाजळी ही आपली उजवी बाजू असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक भारतीय अर्थव्यवस्थेच्या शाश्वत वाढीसाठी प्रयत्न करत आहे. ग्रीसमधील घडामोडींचा भारतावर प्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. परंतु परदेशी विनिमय दराच्यादृष्टीने भारतीय अर्थव्यवस्थेवर काही अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.‘‘

आर्थिक संकटाचा ग्रीसला मोठा फटका बसला असून, आठवडाभर बॅंका बंद राहणार आहेत. केवळ ज्येष्ठांना निवृत्तिवेतन देण्यासाठी बॅंकांच्या एक हजार शाखा उघडण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यान ग्रीसचे पंतप्रधान सिप्रास यांनी नवा प्रस्ताव युरोझोनमधील मंत्र्यांना पाठविला असून, याआधी ग्रीसला कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी २०१० पासून २४० अब्ज डॉलरचा निधी दिला आहे. कोणताही तोडगा निघताना ग्रीसला व्हॅटमध्ये ३० टक्के सवलत देण्याची आणि २०१२ची निवृत्तिवेतन सुधारणा ऑक्‍टोबर २०१५पर्यंत पुढे ढकलण्याची परवानगी मिळावी, असे ग्रीसचे म्हणणे आहे.

कर्जाची परतफेड करण्यासाठी ग्रीसला दोन वर्षांचे ३० अब्ज युरोचे पॅकेज हवे आहे. आयएमएफला १.५ अब्ज युरोच्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड ग्रीसने न केल्यामुळे तो युरोझोनमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. तो युरोझोनमध्ये कायम राहावा यासाठी दोन वर्षांचा नवा प्रस्ताव ग्रीसने दिला आहे. ग्रीसने आयएमएफला परतफेड न केल्यामुळे ग्रीसमधील डाव्या विचारसरणीचे सरकार आणि कर्जदार यांच्यात पाच महिने सुरू असलेली चर्चा अपयशी झाल्याचे मानले जात आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division