'डिजिटल इंडिया'ला उद्योगक्षेत्राची साथ!

digital indiaपंतप्रधानांनी प्रस्तुत केलेल्या ’डिजिटल इंडिया' या उपक्रमाचे उद्योगक्षेत्राकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. १८ लाख रोजगार निर्मिती करू पाहणार्‍या या उपक्रमात ४.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.

डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत सर्व सरकारी योजना तसेच कामकाज एकाच व्यासपीठाशी संलग्न होणार आहेत. याच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित अनेक उद्योजकांनी या क्षेत्रातील गुंतवणुकीचे आकडेही लगोलग जाहीर केले.

'रिलायन्स इंडस्ट्रिज'ने डिजिटल क्षेत्रात २.५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे या वेळी जाहीर केले. त्याचबरोबर या क्षेत्रात ५ लाख रोजगारनिर्मिती होईल, असेही मुकेश अंबानी या प्रसंगी म्हणाले.

'टाटा समूहा'चे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहदेखील ६०,००० तंत्रज्ञांची भरती करेल, असे जाहीर केले. डिजिटल क्षेत्रात येत्या पाच वर्षांत १,००,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, असे 'भारती एन्टरप्रायजेस'चे सुनील भारती मित्तल यांनी म्हटले आहे.

'आयडिया सेल्यूलर'द्वारे मोबाइल क्षेत्रात अस्तित्व असलेल्या आदित्य बिर्ला समूहाने दूरसंचार जाळे विस्तारण्यासाठी तसेच पायाभूत सेवांवरील खर्च म्हणून येत्या पाच वर्षांत ७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले.

अनिल अंबानी यांच्या 'रिलायन्स-एडीएजी' समूहाद्वारेही  येत्या काही वर्षांमध्ये डिजिटल, क्लाऊड, दूरसंचार आदींसाठी १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, असे घोषित करण्यात आले. डिजिटल इंडिया उपक्रमातील डिजिटल लॉकर या ऑनलाइन फाइल सुविधेसाठी या वेळी अनिल अंबानी यांनी वैयक्तिक नोंदणी करून घेतली.

तैवानच्या 'डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स'चे मुख्य कार्यकारी अधिकारी पिंग चँग यांनीही ५० कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यास रस दाखविला आहे.
देशातील २.५ लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरद्वारे जोडणार्‍या ’वेदांता’ समूहातील स्टरलाइट टेक्नॉलॉजीजचे बिगर कार्यकारी अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी या उपक्रमाच्या निमित्ताने फायबर व केबलनिर्मिती क्षमता वाढविण्यासाठी ४०० कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीची तयारी दाखविली.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division