मदर्स रेसिपीचा एलमॅक अ‍ॅग्रोवर ताबा

Mothers Recipe Logoपुणेस्थित मदर्स रेसिपीने एलमॅक अ‍ॅग्रो मॅन्युफॅक्चरिंग कंपनीवर ताबा मिळविला आहे. कोलकता येथील या कंपनीला मदर्स रेसिपीने तिच्या वार्षिक विक्रीच्या जवळपास दुप्पट रक्कम मोजून खरेदी केले आहे. हा व्यवहार ३० कोटींचा झाला असण्याचे मानले जाते.

देसाई ब्रदर्स समूहातील मदर्स रेसिपी ही नाममुद्रा तयार लोणचे, पापड, मसाल्याचे पदार्थ आदींच्या निर्मितीत देशातील आघाडीची कंपनी आहे. तर एलमॅक अ‍ॅग्रोच्या माध्यमातून मदर्स रेसिपीला तिच्या खाद्यान्न मालिकेत सॉससारख्या उत्पादनांची जोड देत देशाच्या पूर्व भागात पाय रोवण्याची संधी मिळाली आहे.

सहा महिन्यांपूर्वीच हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटर्स आदींना खाद्यवस्तू पुरविण्याच्या क्षेत्रात देसाई ब्रदर्सने शिरकाव केला. एलमॅक खरेदी व्यवहारामुळे हे क्षेत्र आणखी विस्तारण्यास कंपनीला वाव मिळणार आहे. यामुळे एलमॅकचे केवळ पूर्व भारतातील वितरण जाळे ३०० वर होणार आहे.

देसाई ब्रदर्सचे कार्यकारी संचालक संजय देसाई यांनी हा व्यवहारांतर्गत निधी उभारणीतून केल्याचे नमूद करत कंपनी निर्मितीक्षमता विस्तारण्यासाठी येत्या सहा महिन्यांत १० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असा विश्वास व्यक्त केला.

एलमॅकचे पूर्व भारतात सध्या १५० वितरक आहेत. ती नाममुद्रा कायम ठेवून कंपनीच्या उत्पादनांची विक्री, वितरण तसेच विपणन यावर भर दिला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. पूर्व भारतात अधिक अस्तित्व असलेल्या एलमॅक अ‍ॅग्रोचा २० टक्के उलाढाल हिस्सा या भागातून येतो.

एलमॅक अ‍ॅग्रोच्या खरेदीनंतर तिची वार्षिक २५ टक्के व्यवसाय वाढ अपेक्षित करतानाच देसाई यांनी या नाममुद्रेंतर्गत येत्या तीन वर्षांत ७० कोटी रुपयांची उलाढाल नोंदविण्याचा मानस व्यक्त केला. देसाई ब्रदर्सने मदर्स रेसिपीद्वारे खाद्यान्न व्यवसायात २००२ मध्ये शिरकाव केला.

मदर्स रेसिपी वार्षिक २० ते २५ टक्के दराने विकसित होत असून येत्या काही वर्षांमध्ये ती वाढ ३५ टक्क्यांपर्यंत जाईल, असा कंपनीचा दावा आहे. गेल्या आर्थिक वर्षांत २०० कोटी रुपयांची उलाढाल नोंदविणार्‍या कंपनीने चालू वित्त वर्षांत ३० टक्के व्यवसाय वाढीचे लक्ष्य राखले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division