सराफा बंद आंदोलन आता बेमुदत
पॅनसक्ती व उत्पादन शुल्क विरोधात २ मार्चपासून सुरू असलेले सराफा व्यापाऱ्यांचे बंद आंदोलन अजूनही सुरू आहे. याबाबत व्यापाऱ्यांच्या संघटनेची बैठक होऊन हे आंदोलन बेमुदत कालावधीसाठी करण्याचे पाऊल उचलण्यात आले.
आंदोलनकर्त्यांना ३५८ संघटनांचा पाठिंबा असून त्यात ६ लाखांहून अधिक सराफा विक्रेते, निर्माते, सुवर्णकार, कामगार, कर्मचारी सहभागी होत असल्याचे ‘ऑल इंडिया जेम्स अॅन्ड ज्वेलरी फेडरनेशन’ (जीजेएफ) चे अध्यक्ष जी. व्ही. श्रीधर यांनी सांगितले. दोन लाख रुपयांवरील दागिने खरेदी-विक्रीकरिता जानेवारीपासून करण्यात आलेली पॅनसक्ती तसेच अर्थसंकल्पात सुचविण्यात आलेली एक टक्का उत्पादन शुल्काची तरतूद या दोन्ही बाबी मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असे स्पष्ट करण्यात आले. संघटनेच्या नेत्यांनी गेल्याच आठवडय़ात पंतप्रधान व अर्थमंत्री यांचीही भेट घेतली होती.