व्हिडिओकॉनच्या स्पेक्ट्रमची एअरटेलकडून खरेदी
भारती एअरटेलने व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्सच्या बिहार, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश(पुर्व) व गुजरात परिमंडळातील स्पेक्ट्रमची 4,428 कोटी रुपयांना खरेदी करण्याची घोषणा केली आहे. स्पेक्ट्रम व्यवहार मार्गदर्शक तत्वांमधील अटी व इतर अटींची पुर्तता झाल्यानंतर करार पुर्ण होईल, अशी माहिती एअरटेलने सादर केलेल्या निवेदनात दिली आहे.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रम शेअरिंगची परवानगी देत ऐतिहासिक निर्णय दिला होता. त्यानंतर आयडिया व व्हिडिओकॉनतर्फे अशा प्रकारचा पहिलावहिला करार निश्चित झाला होता. परंतु दोन्ही कंपन्यांनी हा करार रद्द झाल्याचे जाहीर केले. त्याचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. काही दिवसांपुर्वी भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) भारती एअरटेलसोबत स्पेक्ट्रम शेअरिंगसाठी बोलणी सुरु असल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु ही चर्चा केवळ प्राथमिक स्वरुपात असल्याचे बीएसएनलने सांगितले होते.
या घोषणनंतर व्हिडिओकॉनचा इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेल या दोन्ही कंपन्यांचे शेअर वधारले.