बचत खात्यावर आता तीन महिन्यांनी व्याज मिळणार
रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना बचत खात्यांवरील व्याजाची रक्कम दर तिमाहीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे देशातील कोट्यवधी बचत खातेधारकांना फायदा होणार आहे. "बचत ठेवींवरील व्याज यापुढे तिमाही आधारावर किंवा कमी कालांतराने देण्यात यावे‘, असा आदेश आरबीआयने दिला आहे. सध्या बॅंकेत बचत खात्यांवर सहा महिन्याला व्याज दिले जाते. 1 एप्रिल 2010 पासून बचत खात्यावरील व्याज रोजच्या रोज मोजले जाते. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांतर्फे बचत ठेवींवर 4 टक्के, तर खासगी बॅंकांतर्फे 6 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते.
आरबीआयने प्रत्येक बॅंकेला 2011 मध्ये बचत खात्यांवरील व्याजदर निश्चित करण्याचे स्वातंत्र्य दिले होते; परंतु एक लाखापर्यंतच्या बचत ठेवींवर सारख्याच दराने व्याज देण्याचा आग्रह धरण्यात आला होता. त्यापेक्षा जास्त रकमेसाठी बॅंकांचे दर वेगवेगळे आहे. जेवढ्या कमी कालांतराने व्याज जमा होईल, तेवढा जास्त ग्राहकांना फायदा होणार आहे; परंतु बॅंकांना मात्र या निर्णयामुळे 500 कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. यापूर्वी बॅंकांकडून खात्यावरील कमीत कमी रकमेच्या 3.5 टक्के व्याज महिन्याच्या 10 तारखेपासून शेवटच्या दिवसापर्यंत ग्राहकांच्या बॅंक खात्यावर जमा केले जात होते.