सेवा क्षेत्रातील एफडीआयमध्ये 85 टक्के वाढ
सुधारणांवर भर आणि ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस‘ अंतर्गत गतिमान प्रणालीने विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतीय बाजारपेठेबाबत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत सेवा क्षेत्रातील थेट परकी गुंतवणुकीत (एफडीआय) 85 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. यामुळे एकूण देशांतर्गत उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे.
औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन मंडळाच्या (डीआयपीपी) आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या या नऊ महिन्यांमध्ये सेवा क्षेत्रात 4.25 अब्ज डॉलरची परकी गुंतवणूक झाली आहे. यामध्ये बॅकिंग, विमा, आऊटसोर्सिंग, कुरिअर, विकास आणि संशोधनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याचे डीआयपीपीने म्हटले आहे. जीडीपीमध्ये सेवा क्षेत्राचा तब्बल 60 टक्के वाटा आहे. देशात होणाऱ्या एकूण थेट परकी गुंतवणुकीत देखील सेवा क्षेत्राचा 17 टक्के हिस्सा आहे. सेवा क्षेत्रात गुंतवणूक वाढल्याने यातून रोजगार निर्मितीलाही चालना मिळाली असल्याचे डीआयपीपीतील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.