’ब्रिक्स’ बँकेच्या अध्यक्षपदी के.व्ही. कामत

आयसीआयसीआय बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष तसेच इन्फोसिस लिमिटेडचे अध्यक्ष के व्ही कामत यांची ब्रिक्स विकास बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी (२०१४) ब्राझील येथे झालेल्या बैठकीत ब्रिक्स देशांच्या विकास बँकेचा पहिला अध्यक्ष होण्याचा मान भारतीयाला दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. १०० अब्ज अमेरिकी डॉलर भागभांडवल असणार्‍या बँकेचे अध्यक्षपद प्रारंभीच्या सहा वर्षांसाठी भारताकडे देण्याचे ठरले आहे. तसेच बँकेचे मुख्यालय चीनमधील शांघाय येथे असेल असा निर्णय फोर्टलेझा येथे झालेल्या ब्रिक्सच्या सहाव्या शिखर परिषदेत घेण्यात आला होता. गेल्या वर्षात ब्राझिल, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या पाच ‘ब्रिक्स‘ देशांच्या प्रमुखांनी आपल्या देशांतील पायाभूत सेवा-सुविधांचा विकास करण्याकरता आणि इतर सामाजिक-आर्थिक प्रकल्पांकरिता कर्जसहाय्य उपलब्ध करण्यासाठी ‘ब्रिक्स‘ बॅंकेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता.

के.व्ही. कामत यांनी यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी घेतली असून अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. ६७ वर्षीय कामत यांनी १९७१ साली आपल्या करिअरची सुरुवात केली. ते एप्रिल २००९ मध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. मात्र सध्या आयसीआयसीआय बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम बघत आहेत.

ब्रिक्स बँकेसाठी १०० अब्ज अमेरिकी डॉलर भागभांडवलाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वात जास्त योगदान चीनकडून मिळणे अपेक्षित आहे, चीन यासाठी ४१ अब्ज डॉलर, तर त्यापाठोपाठ भारत, ब्राझील आणि रशिया प्रत्येकी १८ अब्ज डॉलर देणार आहे. तर दक्षिण आफ्रिका ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. ब्रिक्सबँकेचे उद्घाटन २०१६ साली झाले पाहिजे, असे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे, गेल्या वर्षी ब्रिस्बेन येथे झालेल्या ब्रिक्स देशांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division