भारतात गुंतवणूक वाढविण्यास स्विडिश कंपन्या उत्सुक

केंद्र सरकारच्या "मेक इन इंडिया‘ धोरणामुळे निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे स्विडिश कंपन्या भारतात गुंतवणूक वाढविण्यास आणि कामकाजाचा विस्तार करण्यास उत्सुक आहेत.

‘स्विडिश चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया’ने भारतातील कॉन्सुलेट जनरल, स्विडिश दूतावास व बिझनेस स्वीडन संघटनेच्या सहयोगाने सातवा ‘बिझनेस क्‍लायमेट सर्व्हे २०१४-१५’ सादर केला आहे. तिथल्या उद्योजकांना भारताशी व्यवसाय करताना आलेले अनुभव, त्यांचा दृष्टिकोन व भारतातील सध्याचे व्यवसायाचे वातावरण या सर्वेक्षणात प्रतिबिंबित झाले आहे. भारतात माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, वाहन, सेवा, अभियांत्रिकी उत्पादने, थेट विक्री व रिटेल आदी क्षेत्रांत स्थापन झालेल्या ११० स्विडिश कंपन्यांचा या सर्वेक्षणात समावेश आहे. हे सर्वेक्षण पुण्यात नुकतेच सादर करण्यात आले. या प्रसंगी ‘स्विडिश चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया’चे संचालक आणि ‘सॅंडविक’चे कंट्री मॅनेजर पराग सातपुते, स्विडनच्या मुंबई येथील कौन्सुलेट जनरल फ्रेड्रिका ओर्नब्रॅंट आणि स्विडिश चेंबर ऑफ कॉमर्सच्या सरव्यवस्थापिका सारा लार्सन आदी उपस्थित होते.

या संदर्भात सातपुते म्हणाले, की स्वीडन भारतात व्यवसायवाढीला चालना देत आहे, हे स्पष्ट आहे. वर्ष २०१३ चे भारतातील व्यवसायाच्या वातावरणाचे चित्र नकारात्मक असतानाही येथील चारपैकी तीन स्विडिश कंपन्यांनी २०१४ मध्ये आपल्या गुंतवणुकीत वाढ केली, हे आश्‍वासक आहे. यापुढेही स्विडिश उद्योजक भारतातील आपले स्थान अधिक मजबूत करतील. स्विडिश कंपन्या भारतात काही दशकांपासून कार्यरत असून, त्यांनी येथे जवळपास दीड लाख थेट रोजगार, तर चौपटीने जास्त अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. भारत सरकारने गेल्या सप्टेंबरमध्ये ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम सुरू केल्यानंतर व्यवसाय सहजतेने करण्यास उत्तेजन आणि आर्थिक विकासाला प्राधान्य दिले जात आहे. यामागे भारताला भविष्यातील जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division