स्पर्धा आयोगाकडून ५ ऑनलाइन कंपन्या निर्दोष

देशातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवहारांमध्ये काहीही गैर आढळून येत नसल्याचे प्रमाणपत्र भारतीय स्पर्धा आयोगाने दिले आहे. या नवागत व्यासपीठावर ग्राहकांची फसवणूक होऊन नियमांची पायमल्ली होत असल्याची नाराजी गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे.

याबाबत आयोगाकडे आलेल्या तक्रारींचा परामर्श घेताना जारी केलेल्या १० पानी आदेशात आयोगाने आघाडीच्या पाचही ऑनलाइन कंपन्यांच्या व्यवसाय व्यवहाराबाबत काहीही आक्षेपार्ह नसल्याचे स्पष्ट केले आहे.

फ्लिपकार्ट इंडिया, स्नॅपडिल चालविणारी जॅस्पर इन्फोटेक, अमॅझॉन सेलर सर्व्हिसेस, जबॉन्ग डॉट कॉमची उपकंपनी झेरिऑन व मिन्त्राची व्हेक्टर या पाच ई-कॉमर्स कंपन्यांबाबत हा निकाल आयोगाने दिला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये उपरोक्त कंपन्यांच्या व्यवसाय व्यवहारांवर लक्ष ठेवल्यानंतर त्यात स्पर्धा आयोगाच्या नियमाप्रमाणे काहीही गैर आढळून आले नाही, असे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

ई-कॉमर्समध्ये अव्वल स्थानी राहण्याच्या हेतूने या कंपन्या व्यवसायाशी तडजोड करत असल्याचेही निदर्शनास आले नाही, असे आयोगाला लक्षात आले असल्याचे म्हटले गेले आहे. याबाबतच्या कायद्याच्या कलम ३ व कलम ४ अंतर्गत उल्लंघन झाल्याचेही दिसत नाही, असेही आयोगाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

निवडक कंपन्यांची उत्पादनेच या मंचावर विक्रीसाठी उपलब्ध होत असून खरेदीसाठी कंपन्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या सूट सवलतीबाबतही आयोगाकडे आक्षेप नोंदविले गेले होते. याबाबत कुठेही नियमांचे उल्लंघन झाले असे वाटत नाही, असे आयोगाने म्हटले आहे. नव्या कंपन्यांना या क्षेत्रात येण्यासाठी ही पद्धत प्रतिबंध करते, असेही निदर्शनास येत नाही, असे याबाबतच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ई-कॉमर्स बाजारपेठेत अनेक कंपन्या असून त्या त्यांच्या ग्राहकांसाठी जवळपास सारखीच सेवा, वस्तूची उपलब्धता देतात असे नमूद करून आयोगाने या कंपन्यांना याबाबत विचारणा करण्याची गरजही नाही, असेही म्हटले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division