‘व्हीलस्ट्रीट’चे देशव्यापी विस्ताराचे लक्ष्य

wheelstreetबंगळुरूस्थित दुचाकी भाडय़ाने देण्याची संघटित सेवा जाळे व्हीलस्ट्रीटने देशस्तरावर सर्व शहरांत येत्या काळात वेगवान विस्ताराची योजना आखली आहे. पर्यटन व तीर्थस्थळे, व्यावसायिक वर्दळीची ठिकाणे, बडय़ा विस्तारलेल्या महानगरांमध्ये दैनंदिन नोकरी-पेशासाठी ये-जा करण्यासाठी भाडय़ाने दुचाकी ही संकल्पना चांगलीच रुजली असून, देशस्तरावर संघटित रूप असणारी ‘व्हीलस्ट्रीट’ ही या क्षेत्रातील एकमेव कंपनी यातून बनेल.

व्हीलस्ट्रीट सध्या २१ शहरांमध्ये ११० सहयोगी भागीदारांमार्फत कार्यरत आहे. त्यात बेंगळूरुव्यतिरिक्त, पुणे, दिल्ली, चंडिगढ, मुंबई, कोलकाता, दार्जिलिंग, जयपूर आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. बेंगळूरुमधून केवळ २०० दुचाकींपासून सुरुवात करीत व्हीलस्ट्रीटच्या ताफ्यातील दुचाकींची संख्या ४,००० वर गेली आहे. नजीकच्या काही महिन्यांत व्हीलस्ट्रीटचा विस्तार देशातील ४० शहरांमध्ये होईल, अशी माहिती व्हीलस्ट्रीट डॉट इनच्या सहसंस्थापिका मोक्षा श्रीवास्तव यांनी दिली.

स्थानिक स्तरावर ग्राहकांना व्यक्तिगत सेवा देणाऱ्या, दुचाकींचा मोठा ताफा असणाऱ्या स्वतंत्र भागीदारांची राष्ट्रीय स्वरूपाची मोट बांधून व्हीलस्ट्रीटने आपला व्यावसायिक पसारा विस्तारत आणला आहे. अत्यंत विस्कळीत आणि असंघटित स्वरूपात असलेल्या या सेवेला त्यातून एकसंध रूप मिळाले आहे. दर रचनेला प्रमाणित स्वरूप आल्याने कंपनीच्या भागीदारांचीही उत्तम कमाई होत असून, व्हीलस्ट्रीट कार्यरत असलेल्या शहरात तिच्या भागीदारांचे सरासरी मासिक उत्पन्न २ लाखांच्या घरात असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. व्हीलस्ट्रीटच्या मोबाइल अॅरपवरून कोणत्याही ठिकाणावरून केव्हाही दुचाकीची निवड करून कालावधी आरक्षित करण्याची ग्राहकांसाठीही सोय झाली आहे.

भाडय़ाने दुचाकीच्या बाजारपेठेची व्याप्ती वार्षिक ४.६ अब्ज डॉलर (साधारण ३२,००० कोटी रुपये) इतकी प्रचंड मोठी असून, पैकी सुमारे २३५० कोटी रुपयांच्या बाजारपेठेत आपल्याला लक्षणीय हिस्सा कमावता येईल, असा विश्वास श्रीवास्तव यांनी व्यक्त केला. व्हीलस्ट्रीटचे अनुकरण करीत गेल्या सहा-सात महिन्यांत आपल्या काही नवीन स्पर्धकांनी या क्षेत्रात प्रवेशाची सज्जता केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division