रद्द नोटांची मोजणी अजूनही चालू

1000 noteनोटाबंदीनंतर बॅंकांकडे जमा झालेल्या पाचशे व हजाराच्या रद्द नोटांची मोजदाद अद्याप रिझर्व्ह बॅंकेकडून सुरू आहे. रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे, की पाचशे रुपयांच्या 1 हजार 334 कोटी नोटा आणि एक हजार रुपयांच्या 524.90 कोटी नोटांची मोजदाद संपली आहे. या नोटांचे मूल्य अनुक्रमे 5.67 लाख कोटी आणि 5.24 लाख कोटी रुपये आहे. यंत्रांच्या साह्याने दोन पाळ्यांमध्ये नोटांची मोजणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नोटाबंदीनंतर जमा झालेल्या पाचशे व हजाराच्या रद्द नोटांची आकडेवारी रिझर्व्ह बॅंकेकडे माहिती अधिकारात मागविण्यात आली होती. तसेच नोटा मोजण्याच्या अंतिम मुदतीबाबत केलेल्या विचारणेवर रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे, की वितरणातून काढून घेतलेल्या नोटांची मोजणी करण्याची प्रक्रिया कायम सुरू राहणारी असते. नोटाबंदीनंतर बॅंकांकडे जमा झालेल्या रद्द नोटा मोजण्यासाठी 66 यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला सरकारने पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. या नोटा बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी नागरिकांना 50 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. बॅंकांकडे जमा झालेल्या नोटांची मोजणी आणि तपासणी रिझर्व्ह बॅंकेकडून सुरू असून, यातील बनावट नोटा वेगळ्या काढण्यात येत आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division