पवनहंसचे कर्मचारी कंपनीचे अर्धे मालक होण्याची शक्यता

pawanhansसरकारी हेलिकॉप्टर कंपनी पवनहंसचे ३०० हून अधिक कर्मचारी कंपनीचे ५१ टक्के भागभांडवल खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करत आहेत. या विक्री लिलावात बोली लावण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या संघटनेने कंपनीचा हिस्सा खरेदी केला तर ती एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे.

ऑल इंडिया सिव्हिल एव्हिएशन एम्प्लॉइज युनियन ही कर्मचारी संघटना दुबईच्या मार्टिन कन्सल्टींग या कंपनीशी या व्यवहाराबाबत सल्लामसलत करत आहे. पवनहंसमधील ५१ टक्के हिस्सा सरकारने विकायला काढला आहे. ही रक्कम ५०० कोटी रुपयांच्या घरात आहे.

ही संघटना एखाद्या खासगी इक्विटी किंवा व्हेंचर कॅपिटल फंडात गुंतवणूक करणाऱ्या कंपनीशी करार करेल, जी या कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारी समभाग खरेदी करेल. यासाठी ही कर्मचारी संघटना विविध वित्तीय संस्थांशी चर्चा करत आहे. पवनहंसमधील इतर ४९ टक्के समभाग ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचे आहेत.