भारत-अमेरिका भागीदारी जाणार ५०० अब्ज डॉलरवर

india americaभारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २०२०पर्यंत ५०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिलच्या उपाध्यक्ष एमी हरियानी यांच्या मते, भारताची क्षमता, तरुणांची असलेल्या मोठी संख्या आणि मोठ्या प्रमाणावर असलेला ग्राहकवर्ग यामुळे हे शक्य होणार आहे. भारत आजमितीला जगात एक प्रमुख गुंतवणूक स्थळ म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळेच सध्या १५० अब्ज डॉलरवर असलेला द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलरवर नेणे सहज शक्य आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून भारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ग्लोबल आंत्रप्रेनरशिप परिषदेसारख्या कार्यक्रमांनी याला आणखी गती मिळणार आहे. दहा क्षेत्रांमध्ये सर्वांगीण गुंतवणुकीची गरज आहे. एअरोस्पेस, संरक्षण, बँकिंग, वित्तसेवा, ऊर्जा, पायाभूत सुविधा, तेल व वायू यांच्यासह डिजिटायझेशन यामध्ये संधी आहेत. या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वांगीण गुंतवणूक करण्यास अमेरिकेची तयारी आहे. भारताने अनेक क्षेत्रे बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी खुली केली आहेत, सुधारणा आणल्या आहेत, थेट विदेशी गुंतवणुकीची (एफडीआय) मर्यादा वाढवली आहे तसेच व्यापार करणे सुकर व्हावे यासाठी अनेक तर्हेडचे उपाय केले आहेत.

एमी यांच्या म्हणण्यानुसार, ‘ग्लोबल बिझनेस समिट’सारख्या कार्यक्रमांनंतर उद्योजक महिलांसाठी विशेष ‘इन्क्युबेशन’ व प्रशिक्षणाची सुरुवात झाली आहे. ‘मेक इन इंडिया’ व ‘मेक इन अमेरिका’ यांत कोणता फरक आहे, असे विचारताच हे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.