पन्नास हजाराहून अधिक करपरतावा मिळायला विलंब

Online Kar५० हजार रुपयांपेक्षा अधिक परतावा असणाऱ्या करदात्यांना तो यावेळी उशिराने मिळणार आहे. जमा कर रकमेच्या आकडेवारीत ताळमेळ बसवण्यासाठी परतावा मिळण्यास विलंब लागू शकतो, असं कारण अर्थ मंत्रालयानं दिलं आहे.

५० हजार रुपयांपेक्षा अधिक परतावा असल्यास तो रोखण्यात यावा, असे आदेश आयकर विभागाला देण्यात आल्याचं संबंधित सूत्रांनी म्हटलं आहे. सध्या तरी ५० हजार रुपयांपेक्षा कमी परतावा असणाऱ्यांनाच तो दिला जाणार आहे. दरम्यान, २०१७-१८ या आर्थिक वर्षात करपात्र उत्पन्न मर्यादेत काही बदल करण्यात आले आहेत. सध्या अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागत नाही. तर अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना पाच टक्के, तर ५ ते १० लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्के कर द्यावा लागतो. दहा लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के कर भरावा लागतो.