बँक ठेवींवरील व्याजदर वाढायचे संकेत

bankयेत्या काही दिवसांत बँकांतर्फे देण्यात येणाऱ्या ठेवींच्या व्याजदरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या बँकांना मोठ्या प्रमाणात रोख रकमेची चणचण भासत असून, त्याचवेळी कर्जांच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. बँकांकडून कर्ज घेणाऱ्यांची संख्या डिसेंबर २०१७ मध्ये १०.७ टक्क्यांनी वाढून ८१ लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली. गेल्या वर्षी नोटाबंदीनंतर बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण ४.७ टक्के होते.

नोटाबंदीनंतर बँकांकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा झाली होती. या पार्श्वभूमीवर बँकांकडून व्याजात कपात केली जाण्याची शक्यता होती. त्यातच बँकांनी ठेवींवरील व्याजात मोठी कपात केल्याने सर्वसामान्यांकडून बँकेत ठेवी ठेवण्याचे प्रमाण घटले आहे. गेल्या वर्षी नोटाबंदीनंतर बँकेमध्ये रक्कम जमा करणाऱ्यांच्या संख्येत चार टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. २०१६-१७ मध्ये हाच आकडा १४.७ टक्के होता.

बँकांमध्ये जमा असणाऱ्या सर्वच रकमेवर बँका कर्ज देऊ शकत नाहीत. जमा होणाऱ्या प्रत्येक १०० रुपयांपैकी चार रुपये बँका रोख स्वरुपात बँका स्वत:जवळ ठेवतात. या शिवाय १९.५० रुपये सरकारी रोख्यांमध्ये गुंतवले जातात. त्यामुळे बँका जमा होणाऱ्या ७६.५० रुपयांवरच कर्ज देऊ शकतात