सरकारी रोख्यांची नवी मालिका 
दहा जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध

bondकेंद्र सरकारने नुकतीच सरकारी रोख्यांची (बाँड) नवी मालिका जारी केली असून, ती आठ टक्के दराच्या रोखे योजनेची जागा घेणार आहे. मात्र, या नव्या योजनेत जुन्या योजनेच्या तुलनेत कमी व्याज मिळणार आहे. सात वर्षे मुदतीच्या सरकारी (करपात्र) रोख्यांवर आता ७.७५ टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे. यापूर्वीच्या योजनेतून ८ टक्के दराने व्याज मिळत होते.

सात वर्षांच्या मुदतीचे हे रोखे येत्या १० जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील, असं केंद्रीय अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. ‘७.७५ टक्के दरांचे सरकारी रोखे गुंतवणूकदारांसाठी खुले करण्यात येणार आहेत. हे रोखे आठ टक्क्यांच्या रोख्यांची जागा घेतील. १० जानेवारीपासून हे रोखे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा असणार नाही. त्यामुळे जे गुंतवणूकदार आतापर्यंत उपलब्ध साधनांमध्ये गुंतवणूक करीत होते, त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. सरकारी रोख्यांमध्ये करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर बँकेच्या मुदतठेवीपेक्षा अधिक दराने व्याज मिळणार आहे. ७.७५ टक्क्यांच्या रोख्यांमधील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज दर सहा महिन्यांनी देण्यात येणार आहे. सात वर्षांनंतर रोख्यांमध्ये करण्यात येणाऱ्या एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य १७०३ रुपये होईल. या रोख्यांमध्ये अनिवासी भारतीयांसह मोठ्या गुंतवणूकदारांनाही गुंतवणूक करता येणार आहे. सेकंडरी मार्केटमध्ये या बॉँडची विक्री करता येणार नाही. हे रोखे कोणत्याही वित्तीय संस्थेकडे गहाण ठेवून कर्जही घेता येणार आहे.