बँकांच्या थकीत कर्जाच्या रकमेत २०१७ मध्ये मोठी वाढ

thumbदेशातील सार्वजनिक बँकांवरील थकीत कर्जांचे ओझे मोठ्या प्रमाणात वाढत असले, तरी त्या तुलनेत वसुली होत नसल्याचे दिसून आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार कर्जवाढीचा दर गेल्या पंधरा महिन्यात वार्षिक आधारावर दोन अंकांवर परतत आहे. २२ डिसेंबर २०१७ रोजी संपलेल्या आठवड्यात बँकांनी देऊ केलेल्या कर्जांमध्ये ९.९ टक्क्यांची वाढ होऊन ती ८१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहेत.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांच्या मते, अर्थव्यवस्थेत तेजी आली तर कर्जांची मागणी वाढणे अपेक्षित आहे. वाढत्या अर्थव्यवस्थेला बुस्टर देण्यासाठी सध्या विविध कर्जे उपलब्ध आहेत. कर्जांचे प्रमाण वाढण्यास यापूर्वीच सुरुवात झाली आहे. बँकांनी यापूर्वीच कर्जांवरूल व्याजाचे दर कमी करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेने सध्याच्या ग्राहकांसाठी किमान आधारदरांत नुकतेच बदल केले आहेत. व्याजात झालेल्या घसरणीचा फायदा नव्या तसेच, जुन्या ग्राहकांनाही दिला जाणे अपेक्षित आहे. मात्र, बँकांनी व्याजाचे दर घटवूनही कर्जांच्या मागणीत म्हणावी, तितकीशी वाढ झाली नसल्याचे वास्तव आहे. याचे सर्वांत महत्वाचे कारण म्हणजे उद्योगांवर आलेली मरगळ होय. अॅसेट क्वालिटीच्या चिंतेत असणाऱ्या बँका मोठ्या कंपन्यांना कर्जे देण्यास टाळाटाळ करीत आहेत. मात्र, बँकांकडून रिटेल कर्जवाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत.