बाजार तज्ञांनी वर्तवला नववर्षाचा गुंतवणूक अंदाज-

investmentभांडवली गुंतवणुकीकडे रिटेल किंवा वैयक्तिक गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. या जोरावरच २०१७ या वर्षात सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकांची कामगिरी चांगली झाली. या पार्श्वभूमीवर २०१८ हे नववर्ष भांडवली गुंतवणुकीला अधिक पोषक असेल, असा विश्वास बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
२०१९पर्यंत मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारांना कोणताही धोका दिसत नाही. हे दोन्ही भांडवल बाजार समर्थपणे वाटचाल करतील. त्यामुळे लोकांनी आपल्या एकूण गुंतवणुकीत भांडवली गुंतवणुकीचे प्रमाण वाढवायला हरकत नाही. अर्थव्यवस्थेने विकासाचा पथ पुन्हा एकदा घेतला आहे. तरीही, चालू खात्यातील वाढती तूट, कच्च्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढता दर आणि सार्वजनिक (सरकारी) बँकांची अनुत्पादक कर्जे (एनपीए) हे तीन धोके नजरेआड करून चालणार नाही. या तिन्ही धोक्यांवर सरकार कशी मात करते, याकडे नव्या वर्षात भांडवल बाजाराची वाटचाल मोजताना लक्ष ठेवावे लागणार आहे, असे बाजार तज्ञांनी म्हटले आहे.

गुजरातमधील निवडणूक निकालांनंतर सरकार खडबडून जागे झाले असून त्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागावर सरकार लक्ष केंद्रित करेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याचा परिणाम म्हणून आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद होऊ शकते. असे झाल्यास कृषी क्षेत्राशी संबंधित कंपन्या व उद्योग हे गुंतवणूकयोग्य ठरतील. बिगरबँक वित्तसंस्थांची कामगिरी नव्या वर्षात चांगली होणार आहे. त्यातही ग्रामीण वित्त पुरवठा करणाऱ्या बिगरबँक वित्तसंस्थांचा गुंतवणूकदारांनी विचार करावा. विजेची निर्मिती, वितरण, पारेषण या उद्योगांचीही भरभराट होणे अपेक्षित आहे. बँकिंग क्षेत्राला साधारणतः चांगले दिवस येणार असल्यामुळे खासगी बँकांचा विचार गुंतवणुकीसाठी करणे श्रेयस्कर ठरणार आहे. सरकारी बँकांमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याचा विचार करताना निवडक बँकांचाच विचार करावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.