तंत्रज्ञान सहयोगासाठी मायक्रोसॉफ्टचा राज्य सरकारशी करार

Microsoft

राज्यातील डिजिटलायझेशनच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी क्लाऊड-आधारित आधुनिक तंत्रज्ञान पुरवण्याच्या दृष्टीने मायक्रोसॉफ्ट इंडियाने राज्य सरकारबरोबर सामंजस्य करार केला आहे. या करारान्वये राज्यातील व्यावसायिकतेला, विशेषत: नवोद्योगाला चालना देत नागरी सुविधांमध्ये विकास घडवून आणण्यासाठी मायक्रोसॉफ्ट राज्य सरकारला मदत करणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. विविध नागरिककेंद्री सेवांसाठी डेटा अॅकनालिटिक्स, जिनोमिक्स, डीप लर्निंग, ब्लॉकचेन, रोबोटिक्स, आयओटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आदी तंत्रज्ञानाधारित उपाययोजना विकसित करण्यासाठी महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाआयटी)ला आता मायक्रोसॉफ्टची साथ लाभणार आहे. यात नागरिक प्रतिसाद यंत्रणा, राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत तक्रार निवारण, जमिनीच्या नोंदींचे स्वयंचलितीकरण तसेच, डिजिटल शेती आणि कौशल्यविकास व शिक्षण यांसारख्या एक ना अनेक उपक्रमांचा समावेश आहे. संगम या मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड आधारित व्यासपीठावरून अझ्यूर सेवा, ऑफिस ३६५ आणि लिंक्डइन यांसारख्या सेवा पुरवल्या जात असून यामार्फत कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीसाठी राज्यभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
या कराराचा एक भाग म्हणून, वरील विभागांत तंत्रज्ञान धोरणांचा अवलंब करण्यासाठी मायक्रोसॉफ्टतर्फे सल्लागार, अनुभवी आणि सक्षम अधिकारीही दिले जाणार आहेत. तसेच महाआयटीतर्फे स्थापन करण्यात येणाऱ्या सक्षम संशोधन केंद्रांनाही कंपनीतर्फे विशेष साहाय्य पुरवले जाणार आहे.