जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकात भारताच्या स्थितीत सुधारणा

jagtik bhrastachar

जागतिक भ्रष्टाचार आकलन निर्देशांकामध्ये (‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल) भारताचे स्थान दोन स्तराने उंचावले आहे. असे असले तरी शेजारच्या चीनच्या तुलनेत हा देश याबाबत सुमार ठरला आहे.
या निर्देशांकामध्ये भारताचे स्थान यापूर्वीच्या ७९व्या स्थानावरून ८१ वर गेले आहे. विविध १८० देशांमध्ये भ्रष्टाचाराबाबत भारताचे स्थान चीनपेक्षा सुमार तर पाकिस्तानपेक्षा बरे मानले गेले आहे.
निर्देशांकाच्या मोजमापानुसार, शून्य हे अति भ्रष्टाचाराचे तर १०० हे स्थान स्वच्छ व्यवस्थेचे मानले जाते. गुणांबाबत भारताचे स्थान मात्र ४० सह २०१६ मध्येही कायम राहिले आहे.
आशिया पॅसिफिक भागातील काही देशांमध्ये खुनासारख्या गुन्ह्य़ांमध्ये चिंताजनक स्थिती असल्याचा उल्लेख याबाबतच्या अहवालात करण्यात आला आहे. याबाबत भारताला फिलिपाइन्स, मालदीवच्या पंक्तीत बसविण्यात आले आहे.
भारतात भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्य करणारे पत्रकार, कार्यकर्ते, विरोधी पक्षनेते तसेच तपास यंत्रणांचे अधिकारी यांना जीव गमवावा लागल्याचेही नमूद करण्यात आले आहे. पत्रकारांच्या संरक्षणार्थ असलेल्या समितीच्या अहवालातही गेल्या सहा वर्षांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात लिखाण करणाऱ्या १५ पत्रकारांचा खून झाल्याचे म्हटले आहे.
१८० देशांमध्ये चीनचे स्थान ७७ तर पाकिस्तानचे स्थान ११७ वे आहे.
आशियाई देशांमध्ये भूतान देश चांगल्या स्थानावर आहे, तर बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका यांचे स्थान बिकट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूझिलॅण्ड, डेन्मार्क हे उत्तम तर सीरिया, दक्षिण सुदान, सोमालिया हे सुमार गणले गेले आहेत.