पंजाब नॅशनल बँकेचे कर्मचारीघोटाळ्यात सहभागी

pnb ghotala sahabhagiनीरव मोदी व त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी ११,४०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती देणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी बँकेचे काही कर्मचारी या घोटाळ्यात अडकले असल्याची कबुली दिली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मेहता यांनी शेट्टी व अन्य एका कर्मचाऱ्याला निलंबित केल्याची व अन्य काही जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. कनिष्ठ असो किंवा वरिष्ठ दोषींवर कारवाई होणारच, असे त्यांनी सांगितले.

असा घोटाळा २०११ पासून सुरू असून पंजाब नॅशनल बँकेने नेहमीच घोटाळे थोपवण्यासाठी प्रयत्न केले असून हा घोटाळाही समोर आणणारे आपणच प्रथम असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भारतातल्या बँकांच्या विदेशातील शाखांच्या माध्यमातून हा एकूण घोटाळा झाला असल्याचे ते म्हणाले. नीरव मोदी व त्याच्या कंपन्यांनी बँक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक गैरव्यवहार केले आणि बँकेच्या यंत्रणेचा गैरवापर करत पैसे ट्रान्सफर केल्याचा व त्याची व्याप्ती ११,४०० कोटी रुपये इतकी असल्याचा मुख्य आरोप आहे.
हा घोटाळा नक्की कसा झाला, यात कोण कोण सहभागी आहेत, घोटाळ्याची व्याप्ती किती आहे आदी बाबींचा शोध तपास यंत्रणा घेत असल्याचे व पंजाब नॅशनल बँक पूर्ण सहकार्य करत असल्याचे मेहता म्हणाले. ज्या ज्या बँकांचा या घोटाळ्याशी संबंध आहे त्या सगळ्यांची मिळून एक समिती स्थापन करण्यात येत असल्याची व तपास यंत्रणांना सहकार्य करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोअर बँकिंग सिस्टिम किंवा सीबीएसला डावलून काही व्यवहार झाल्याचे किंवा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्याचे मेहता म्हणाले. ते आल्यावर २९ जानेवारी रोजी लगेचच तपास यंत्रणा व सेबीला कळवण्यात आल्याचे व कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंजाब नॅशनल बँक अत्यंत सक्षम बँक असून कुठल्याही परिस्थितीला सामोरी जाण्यास सज्ज असून बँकेच्या ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले होते.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division