भारतातील श्रीमंत आणि गरीब यांतील वाढती दरी

0Oxfam Indiaदेशातील अब्जाधीशांची संपत्ती मागील वर्षांत एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) १५ टक्के आहे, असे ‘ऑक्स्फॅम इंडिया’च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. भारतातील असमानता अहवाल २०१८’मध्ये म्हटले आहे, की देशातील श्रीमंतांकडे असलेली संपत्ती ही प्रामुख्याने भांडवलशाही अथवा वारशाने आलेली आहे. याचवेळी तळातील नागरिकांच्या संपत्तीचे विभाजन होऊन ती आणखी कमी होत आहे. भारतातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती ‘जीडीपी’च्या १५ टक्के आहे. पाच वर्षांपूर्वी ती १० टक्के होती. मागील वर्षात भारतात १०१ अब्जाधीश होते.
आर्थिक असमानता असलेल्या देशांमध्ये भारत आघाडीवर आहे. उत्पन्न, खर्च, संपत्ती आणि सरकारचे धोरण या सर्व घटकांमध्ये भारताची स्थिती अतिशय खराब आहे. सरकारचे धोरण हे कामगारांपेक्षा भांडवलशाहीला महत्त्व देते. तसेच अकुशल कामगारांपेक्षा कुशल कामगारांना महत्त्व देण्यात येते. देशातील आर्थिक असमानता १९८० मध्ये स्थिर होती.त्यानंतर १९९१ पर्यंत त्यात काही प्रमाणात वाढ होण्यास सुरवात झाली; मात्र १९९१ पासून आर्थिक असमानतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यातील वाढ २०१७ पर्यंत कायम आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.जात, धर्म, विभाग आणि लिंगभेदावर विभागणी झालेल्या भारतासारख्या देशात आर्थिक असमानता वाढत राहणे ही चिंताजनक बाब आहे. असमानता कमी करणे हा भारतीय लोकशाहीचा मुख्य उद्देश आहे.