GST: '१३ लाख कोटींच्या महसुलाचे सरकारसमोर लक्ष्य'

GST imageचालू आर्थिक वर्षात वस्तू व सेवाकरापोटी (जीएसटी) सरकारला सुमारे १३ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केले. जीएसटीच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जीएसटी दिवस समारोहात ते बोलत होते. जीएसटीच्या महसुलात वाढ होत असल्याने २८ टक्क्यांच्या स्तरातून काही वस्तू हटविण्यात येतील,असेही त्यांनी नमूद केले.
गेल्या वर्षी एक जुलैला जीएसटी लागू झाल्यानंतर १७ प्रकारचे अप्रत्यक्ष कर तसेच अनेक उपकर रद्द झाले. जीएसटी प्रणालीत करआकारणीसाठी पाच, १२, १८ व २८ अशा चार स्तरांत सर्व वस्तूंना विभागण्यात आले आहे. २८ टक्क्यांच्या स्तरात चैनीच्या वस्तू तसेच, सिगारेट, तंबाखू आदी वस्तूंचा समावेश आहे. गोयल म्हणाले की, चालू वर्षात दरमहा सुमारे एक लाख १० हजार कोटींचा जीएसटी महसूल गोळा होईल व वर्षभरात हा आकडा १३ लाख कोटी रुपयांवर पोहोचेल, असा मला विश्वास आहे. प्रामाणिक करदात्यांची वाढती संख्या व ई वे बिल प्रणालीचे यश (आंतरराज्य मालवाहतुकीसाठीची करप्रणाली) यांच्या माध्यमातून सरकार हे लक्ष्य पूर्ण करेल. ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची खरेदी केल्यानंतर पक्क्या बिलाची मागणी करावी व कच्चे बिल ही संकल्पनाच बाद करावी, यातून पारदर्शक व्यवहारवअधिक करसंकलन हे हेतू साध्य होतील, असेही ते म्हणाले. देशात जीएसटी लागू होण्यापूर्वी २०१७-१८ या आर्थिक वर्षात सरकारला अप्रत्यक्ष करांतून ७.४१ लाख कोटींचे उत्पन्न झाले होते.जूनमध्ये ९५,६१० कोटी जमा जीएसटीच्या महसुलाने जूनमध्ये ९५,६१० कोटी रुपयांचा आकडा गाठला. एप्रिलमध्ये तर जीएसटीने एक लाख कोटींचा आकडा पार करीत एक लाख तीन हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात जीएसटीचा एकूण महसूल १३ लाख कोटींवर पोहोचेल, असा विश्वास सरकारला वाटत आहे. जीएसटीतून समाधानकारक उत्पन्न मिळत असल्याने हा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी यातील २८ टक्के स्तरांतून काही वस्तू हटविण्यात येतील, असे गोयल यांनी सांगितले. या स्तरात सद्यस्थितीत केवळ ४९ वस्तू आहेत. तर, १४१ वस्तूंवर कोणताही कर आकारला जात नाही. २८ टक्क्यांच्या स्तरातून सिमेंट, पेण्ट आदी वस्तू कमी होण्याची शक्यता आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division