कच्च्या तेलावरच्या सवलतीचा ग्राहकांना फायदा नाही

CRUDE OIL गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या प्रति लिटर खरेदीवर अडीच रुपयांच्या सवलतीची घोषणा केली होती. सरकारने प्रति लिटर दीड रुपये उत्पादनशुल्कही घटविण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय तेल कंपन्यांना मार्केटिंग मार्जिन कमी करून ग्राहकांना प्रति लिटर एक रुपयांची सवलत देण्याची सूचनाही केली होती. तेल कंपन्यांच्या या कारभाराची माहिती घेणाऱ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने कंपन्यांना आपले मार्केटिंग मार्जिन पूर्वीच्याच स्तरावर नेण्याची परवानगी मिळाल्याचे वृत्त आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ग्राहकांना प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर देण्यात येणारी एक रुपयांची सवलत बंद केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी मार्केटिंग मार्जिनमध्ये देण्यात आलेली सवलत बंद केली आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यानंतर मार्जिनमध्ये झालेली घट भरून काढली जाऊ शकते, असे संकेत केंद्राकडून मिळाले होते. आता तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या असून, कंपन्या आता मार्जिनमधील घट भरून काढण्याच्या प्रयत्नात आहेत. याचा अर्थ असा होतो की, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा पूर्ण फायदा ग्राहकांना मिळू दिला जात नाही. ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने त्यांच्या मार्जिनमध्ये घट करण्यास सांगितले होते. त्यामुळे कंपन्यांचे नफ्याचे गणित बिघडले होते. मात्र, आता आपला नफा वसूल करण्यावर कंपन्यांचा भर असल्याचे दिसून आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक ऑक्टोबरपासून ते आतापर्यंत ब्रेंट कच्चे तेल, सिंगापूर गॅसोलाइन आणि अरब गल्फ डिझेलच्या किमतीमध्ये ३७ ते ४० टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही १७ ते १८ टक्क्यांनी घसरल्या आहेत.

ज्या वेळी इंधनाच्या किमती वाढल्या होत्या त्या वेळी सरकारने आम्हाला प्रतिलिटर विक्रीमागे एक रुपया सवलत देण्याची सूचना केली होती. आता आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाची किंमत सातत्याने कमी होत असताना, आम्ही तो लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवित आहोत, असे सिंह यांनी नमूद केले. हिंदुस्थान पेट्रोलियमचे चेअरमन एम. के. सुराणा यांच्या मते तेलाच्या किरकोळ किमती आता आंतरराष्ट्रीय दरांच्या समकक्ष आल्या आहेत. त्यामुळे नुकसानभरपाईचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division