इंडियन ऑइलचे दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन

Indian oilपुढील पाच ते सात वर्षांत हरित ऊर्जा पर्यायांवर २५,००० कोटी रुपये इंडियन ऑइल खर्च करणार आहे.सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने पुढील पाच ते सात वर्षांकरिता दोन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आणि व्यवसाय विस्ताराची योजना आखली असल्याचे कंपनीचे अध्यक्ष संजीव सिंग यांनी नमूद केले आहे.
मुंबईत झालेल्या भागधारकांच्या वार्षिक सभेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना, सिंग यांनी हा गुंतवणुकीचे महानियोजन म्हणजे इंडियन ऑइलला देशातील सर्व घटकांच्या इंधनविषयक गरजांची पूर्तता करणारा उद्योगसमूह बनविण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. जैव इंधनासारखे हरित पर्याय ही काळाची गरज असून, त्या दिशेने पुढे येणाऱ्या प्रत्येक संधी मिळवण्याकडे विशेष करून लक्ष दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. कंपनीने सरलेल्या २०१८-१९ आर्थिक वर्षांत सुमारे २४,५०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च वेगवेगळ्या प्रकल्पांवर केला आहे.
पुढील पाच ते सात वर्षांत हरित ऊर्जा पर्यायांवर २५,००० कोटी रुपये इंडियन ऑइल खर्च करणार आहे. २ जी आणि ३ जी इथेनॉल, जैव इंधन, कोल गॅसिफिकेशन, हायड्रोजन-सीएनजी, हायड्रोजन फ्युएल सेल्स आणि विद्युत वाहनांसाठी बॅटरी निर्मिती अशा नवीन व्यवसायांमध्ये कंपनीचा प्रवेश होण्यासंदर्भात पाऊले उचलेली आहेत.
प्रस्थापित तेल शुद्धीकरण प्रकल्पांचे आधुनिकीकरण व विस्तार तसेच त्या अंतर्गत पेट्रोरसायने उत्पादनांचे एकात्मीकरण यावर आणखी २० ते ३० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शहरी वायू वितरण प्रकल्पांवर १० हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. नाणारमधून रायगड जिल्ह्य़ात स्थलांतरित बहुचर्चित संयुक्त भागीदारीतील पेट्रोकेमिकल संकुलासाठी नवीन प्रस्तावित ठिकाण सर्वागाने अनुकूल असल्याचे इंडियन ऑइलचे या प्रस्तावित प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया राज्य सरकारकडून पूर्ण होणे अपेक्षित असून, कंपनीच्या आगामी विस्तार कार्यक्रमातील तसेच देशाच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सिंग यांनी सांगितले.
इंडियन ऑइलसह, एचपीसीएल, बीपीसीएल या दोन सरकारी तेल कंपन्यांबरोबर, सौदी आराम्को व अॅडडनॉक यांची भागीदारी असलेला हा प्रकल्प, तसेच नागपट्टिणम येथे नवीन रिफायनरी प्रकल्प तसेच पारादीप येथे एमईजी प्रकल्प असे पूर्णपणे नवीन प्रकल्प पुढील पाच ते सात वर्षांत मूर्त रूप धारण करू शकतील, असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला.
बॅटरी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इंडियन ऑइलकडून आक्रमक स्वरूपात संशोधन व विकास उपक्रम सुरू असून, त्यातून प्रत्यक्ष व्यापारी उत्पादनाला लवकरच सुरुवातही होईल. सध्या विद्युत वाहनांसाठी वापरात येणाऱ्या लिथियम आयन बॅटरीला आयातपर्यायी व संपूर्णपणे देशांतर्गत स्रोतांवर आधारित नव्या प्रकारच्या बॅटरी विकसित करण्याच्या दृष्टीने एका तंत्रज्ञान कंपनीशी अंतिम स्वरूपावर बोलणी सुरू आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division