शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या संचालकावर गुन्हा दाखल

bhosale bankशिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे रिझर्व्ह बँकने २०१८-१९चे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बँकेचे ऑडिट केले असता ७१ कोटी ७८ लाख रुपये कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये अनिल भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते आदी पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सीए योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार भारतीय दंड संहिता ४२०, ४६८, ४७१ आदी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसले यांच्यासह या अकरा जणांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या. ७१ कोटी ७१ लाखांच्या या नोंदी होत्या. मात्र ऑडिट करताना या नोंदी बनावट असल्याचं आढळून आलं आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, आर्थिक अनियमितता आणि अन्य कारणांमुळे या बँकेवर 'आरबीआय'ने या बँकेवर निर्बंध लावले होते. या बँकेची 'आरबीआय'ने २६ एप्रिल २०१९ रोजी विशेष तपासणी केली होती. त्यामध्ये कामकाजात अनियमितता आढळून आली होती. त्यानुसार 'आरबीआय'ने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून, प्रशासक नेमण्याचे आदेश सात ऑक्टोबरला दिले होते. सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबतचा आदेश देऊन नारायण आघाव यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली होती. त्यामुळे खातेदारांवर बँकेतून पैसे काढण्याची मर्यादाही लादण्यात आली होती. या बँकेच्या एकूण ठेवी ४३० कोटी आहेत. बँकेने एकूण ३१० कोटींचं कर्ज वाटप केलं आहे. बँकेवर २९४ कोटींचं अनुत्पादित कर्ज आहे. या बँकेच्या एकूण १४ शाखा असून एकूण खातेदार १६ हजार आहेत. या बँकेकडून आतापर्यंत १२ कोटींची कर्ज वसुली करण्यात आली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division