मात्सुशिताची कहाणी - उद्योजकतेचा वस्तुपाठ

- डॉ. नरेंद्र जोशी
E-mail :This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

ते वर्ष होतं १९२३, कोनोसुकेने ओळखले की बॅटरीवर चालवता येतील असे सायकल दिवे बनवले तर खूप खपतील. त्यावेळी सायकलला असे दिवे लावले जात पण ते दर तीन तासांनी चार्ज करावे लागत. कोनोसुकेने बुलेटच्या आकाराचे दिवे बनवले जे चाळीस तास चार्जिंगशिवाय चालत. होलसेलर्सनी नाकं मुरडल्यावर त्याने दिवे डायरेक्ट सायकल दुकानदारांनाच विकायला सुरूवात केली. या धाडसी निर्णयानंतर त्याच्याकडे मागण्यांचा पूर आला. मग होलसेलर्सनीही विनंत्या सुरू केल्या. कोनोसुके तेव्हा होता अठ्ठावीस वर्षांचा. चार वर्षांनी कोनोसुके मात्सुशिताने चौकोनी सायकलदिवे आणले व तो त्यासाठी ब्रँडनेम शोधू लागला. त्याने वृत्तपत्रात इंटरनॅशनल हा शब्द वाचला होता. त्यापेक्षा लहान म्हणून त्याने ‘नॅशनल’ हे नाव घेतले. आणि जन्माला आला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जगभर झेंडा रोवणारा नॅशनल (पॅनॅसॉनिक) ब्रँड!

वीजेवर चालणारी इस्त्री या उत्पादनाचा खप होता साधारण एक लाख प्रतिवर्षी. ‘नॅशनल’ने सुपर आयर्न आणली ती दहा हजार प्रतिमाह उत्पादने करून. अशा प्रचंड उत्पादनगतीने त्याची किंमत ३.२ येन इतकीच झाली, जी बाजारातल्या 5 येनच्या इस्त्रीपेक्षा स्वस्त होती. कोनोसुके मात्सुशिताने आपल्या मॅनेजमेंट टीमला सांगितले – ‘आपल्या व्यवसाय ही समाजाने दिलेली जबाबदारी आहे, त्यामुळे समाजविकास व लोकांचे जीवन सुकर करणे आपले कर्तव्य आहे.’ कोनोसुकेचे रेडिओ मॉडेल, टोकीयो पब्लिक ब्रॉडकास्टींग स्टेशनच्या स्पर्धेत विजयी झाले. एका शिंटो आश्रमाला भेट दिल्यावर त्याने आपल्या उद्योगातून ‘ऐहीक व पारलौकीक विकासाला चालना’ अशा विचारांना मांडले. त्याप्रमाणे वयाच्या अडतीसाव्या वर्षीच ऑटोनॉमस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच स्वयंचलित व्यवस्थापनाचा प्रयोग केला. ‘व्यवसाय म्हणजे माणसं’ या त्याच्या सिध्दान्ताप्रमाणे त्याकाळात कर्मचारी प्रशिक्षण केंद्र सुरू झालं. २०० उत्पादनं करणार्‍या या कंपनीची ३२ अस्थापनं व कार्यशाळा युद्धात बेचिराख झाल्या. त्यानंतरही त्याने कामगारांच्या संघटीत प्रयत्नातून ‘मात्सुशिता स्पिरीट’ ने काम करत पुन्हा भरारी घेतली. ‘पीस अॅण्ड हॅपिनेस थ्रू प्रॉसपॅरिट’ या संघटनेची निर्मिती केली. युद्धकाळात शिपबिल्डींग व एअरप्लेन बि‍ल्डींग केले यासाठी कोनोसुकेला कंपनीतून काढून टाकावे असा राजकीय दबाव आला तेव्हा सर्व स्तरावर, कामगार, विक्रेते व जनतेने त्याविरूद्ध मोर्चे काढले. कंपनी नुकसानीत असताना मात्सुशिताने ती बंद न करता कामगारांना विश्वासात घेऊन ‘काहीही करा पण उत्पादने विकून परत फायद्यात या’ असे सांगीतले होते. नेतृत्वाचे असे उदाहरण विरळा. साठीच्या आसपास वय असताना त्यांनी ‘फिलिप्स’ बरोबर हात मिळवले. तुम्ही आम्हाला तंत्रज्ञान द्या आम्ही तुम्हाला व्यवस्थापन शिकवू या बोलीवर!

नॅशनल खरीखुरी मल्टीनॅशनल झाली होती. अमेरिकेपासून नेदरलँडपर्यंत विस्तार, विकास व बहुमान मिळाले. टाईम व लाईफ मासिकांनी स्पेशल इश्यू काढले. सत्तराव्या वर्षीही कोनोसुके मात्सुशीता ‘डॅम मॅनजमेंट’ अशी संकल्पना मांडत राहिले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी मात्सुशिता आपणहून सर्व बाह्य जबाबदाऱ्यांतून मुक्त झाले. त्यांनी आपले तत्त्वज्ञान व त्याच्या प्रसारासाठी लेखन यात वेळ घालवला. अनेक बेस्टसेलर्स लिहिली. ‘थॉटस ऑन मॅन’ आणि ‘जपान अॅट द ब्रिंक’ ही त्यातील नावाजण्याजोगी. दुसऱ्या पुस्तकाच्या ६ लाखाहून अधिक प्रती खपल्या. युद्धानंतर युरोपियन देशांशी हात मिळवण्यात त्यांनी जशी दूरदृष्टी दाखवली तशीच उतारवयात चीनबरोबर हात मिळवण्यात दाखवली. १९८० साली वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी स्वत:चे ७ बिलियन येन खर्च करून त्यांनी ‘मात्सुशिता इन्स्टीटयूट ऑफ गव्हर्नमेंट अॅण्ड मॅनेजमेंट’ स्थापन केली.

मात्सुशिताची कहाणी ही अनेकार्थाने उद्योजकतेचा वस्तुपाठ आहे. त्यातील ठळक गोष्‍टी अशा –

१. नवनिर्मितीची निरंतर ओढ
२. प्रस्थापित पद्धतींना धाडसाने दिलेला काटशह
३. कर्मयाऱ्यांना सतत विश्वासात घेणे
४. निव्वळ उत्पादनाच्या संकल्पनेतच नव्हे तर व्यवसायाच्या पद्धतीतही क्रांतिकारी नवसंकल्पना राबवणे.
५. राष्ट्रनिर्मितीत आपला सिंहाचा वाटा उचलणे – बेचिराख होऊनही पुन्हा उभे राहणे.
६. ‘व्यवसाय म्हणजे माणसं’ असे म्हणत सर्वार्थाने मानवाभीमूख व्यवस्था निर्माण करणे व राबवणे
७. काळाची पावले ओळखत इतर दिग्गजांशी हात मिळवणे.
८. धर्म, अध्यात्म यांची व्यवसायाशी सुंदर सांगड घालत कर्मयोग जगणे.
९. आपणहून निवृत्त होणे, प्रबोधनासाठी वेळ देणे.
१०. शांतता, समाधान, व्यावसायिक उज्ज्वलता यांचे गणित जुळवणे, समजावणे व राबवणे.

असे म्हणतात की अरण्यात पहाट झाली की हरणे पळू लागतात अन्नासाठी, त्यांना मारण्यासाठी वाघ पळतात व वाघापासून जीव वाचवायला हरणे आणखी जोरात पळतात. थोड्यावेळाने एक शिकारी पळू लागतो वाघाची शिकार करण्यासाठी. या शर्यतीत जिंकतं कोण? तुम्ही का पळता हे किती जोरात पळता यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. जीव वाचवायला, पोट भरण्याला का विजयाचा उन्माद अनुभवायला तुम्ही पळताय यावर तुमच्या पळण्याचा वेग अवलंबून असतो. तसेच तुम्ही कुठल्या उद्देशाने काम करताय यावर त्या कामाचे मूल्य ठरते, मग ते काम कितीही साधे का असेना. उद्योजक उद्योग का करतो यावर ते मूल्य ठरते. तो उद्देश जितका व्यापक तितका तो उद्योग चिरस्थायी होतो हे मात्सुशिताच्या उदाहरणाने अधोरेखित होते. अशा निखळ कर्मयोगी उद्योजकाला व त्याहूनही मोठ्या माणसाला मानाचा मुजरा!

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division