कर्ज वाटपात दिरंगाई

karjavatapराज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पैशांची भलेही चणचण असेल. मात्र, तरीही राज्यातील राष्ट्रीयकृत, व्यापारी व जिल्हा बँका मिळून सरासरी तीस टक्के पीक कर्ज वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे. दिरंगाई करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच दिला आहे. मात्र, तरीही पीक कर्ज वाटपाची गती कासावगतीच आहे.

आतापर्यंत राष्ट्रीयकृत बँकांनी १७ टक्के, व्यापारी बँकांनी १८ टक्के तर जिल्हा मध्यवर्ती बँकांनी उद्दिष्टाच्या ५८ टक्के कर्ज वाटप केले आहे. सरासरी विचारात घेता एकूण उद्दिष्टाच्या ३० टक्के कर्ज वाटप झाले आहे. त्यातही विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळी भागात कर्ज वाटपाची टक्केवारी कमी व जेमतेम आहे. यावर्षी राज्यात ५९ हजार ७६६ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी ४३ हजार ८४४ कोटी, तर रब्बीसाठी १५ हजार ९२२ कोटी अशी विभागणी करण्यात आली आहे. मात्र, अनेक कारणे दाखवत कर्जवाटप धीम्या गतीने सुरू आहे. आतापर्यंत राज्यात १२ हजार ९२२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. गेल्यावर्षीही अवघे ५४ टक्के कर्ज वाटप झाल्याने अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिल्याची स्थिती राज्यात होती. दोन्ही हंगाम मिळून ५८ हजार ३३१ कोटी रुपये पीक कर्ज वाटप झाले होते.

कोरडवाहू भागात जिरायत कर्ज तर बागायती क्षेत्रासाठी वार्षिक पिकांसाठी अधिक रक्कम प्रती हेक्टरी दिली जाते. कमी व्याजदर आणि व्याजातील सूट यामुळे शेतकऱ्यांना या कर्जामुळे दिलासा मिळतो. मात्र, वेगवेगळ्या भागात अनेक कारणांनी कर्ज वाटपास दरवर्षी उशीर होतो, तो यावर्षीही दिसून आला आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division