"Sell it before you smell it!"

fig1 Oct 15नवीन उत्पादने बाजारपेठेत आणत राहणे हे टिकून राहण्याचे गमक आहे असे आपण आतापर्यंत पाहिले. पण नवीन उत्पादने निर्माण करणे, सृजन करणे हे जितके कठीण तितकेच ती वेळोवेळी लोकांपर्यंत साक्षात मूर्तरूपात पोहोचवणे हेही कठीणच आहे. यात पूर्वीच्या मॉडेलचा खप होऊन दुकानातले शेल्फस रिकामे होणे अभिप्रेत व अध्याहृत आहे. इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट अर्थात उत्पादनास कच्चा माल, उत्पादन होत असलेला माल व तयार बाजारात जाणारा माल यांची संख्या, त्यांचे योग्य व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे. या तिन्ही स्थितीत जास्त माल राहणे म्हणजे आपलेच पैसे अडकवून ठेवणे आहे. आपल्या लक्षात येईल की जोवर माल विकून ग्राहक पैसे देत नाही तोवर त्या मालाची कच्च्या, अर्धपक्क्या व पक्क्या मालाची किंमत शून्य आहे. म्हणजे समजा एखाद्या सुताराने खुर्ची बनवण्याचे काम घेतले. शंभर खुर्च्यांना लागणारे सामान व कच्चा माल पैसे देऊन विकत आणला. मग सर्व खुर्च्यांचे बस्तान व पाठ तयार करून जोडले व ग्राहकाकडे जाऊन म्हणाला, "पुढच्या कामाला पैसे लागतील, त्याशिवाय खुर्च्यांना पाय लावता येणार नाहीत. तुम्ही हे घ्या, मला पैसे द्या, मी आठवड्यात पाया लावून देतो!" त्या 'खुर्च्या' ४० टक्के किंमतीलासुद्धा कोण विकत घेईल? अगदी दोन पाय लावले तरी नाही! चारी पाय लावून पॉलिश करायचे राहिले तरी कठीण आहे!

गुंतवलेला पैसा, माल व विकून मिळालेला पैसा यांचे गणित न जुळल्याने लहानसहान सुतार सोडाच पण जगज्जेत्या कंपन्यांना लढाई हरावी लागली अशी उदाहरणे आहेत.

fig2 Oct 15कम्प्युटर जगतातील प्रसिद्ध कॉम्पेक कंपनीने टान्डेम व डिजिटल कॉम्प्यूटरसारख्या कंपन्याना गिळले व 95 च्या आसपास आयबीएमलाही मागे टाकले कारण किंमतीवर व दर्जावर त्यांनी चांगले प्रभुत्व मिळवले होते. पण आता म्हटले तसे इन्व्हेटरी मॅनेजमेंट किंवा मालाचे व्यवस्थापन यात ते कच्चे होते. इन्व्हेटरी टर्नस् म्हणजे वितरीत मशीन्सची संख्या (वार्षिक) भागिले हातात राहिलेल्या मशीन्सची संख्या याचे उत्तर चुकले. त्यांनी वार्षिक टर्न्सची संख्या मात्र सात होती जी त्यावेळचे आव्हानात्मक प्रतिस्पर्धी 'डेल' कॉम्प्यूटर्सपेक्षा फारफार मागे होती.
परिणाम? बाजारातच न विकलेली जुनी उपकरणे पडून राहिलेली, नवीन तयार होऊन थांबलेली व नवीन सृजन करायला तर वावच नाही अशी स्थिती. 'अॅपल' कॉम्प्युटर १९९२ ते १९९७ या काळात जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावरून दहाव्या स्थानावर घसरला. असे गमतीने म्हणतात की न्यूटनच्या डोक्यावर अॅपल पडले (खरे खोटे देव जाणे) त्याचे जितके दूरगामी परिणाम झाले तितकेच परिणाम कॉम्प्युटर जगतात 'अॅपल' कंपनीच्या पडण्याने झाले! ही अर्थात अतिशयोक्ती झाली पण 'अॅपलच्या' पडण्याला जबाबदार होते सदोष माल व्यवस्थापन. त्यांचे इन्व्हेन्टरी टर्न्स मात्र दहा होते. अपुरा सप्लाय व न खपलेल्या अर्ध-तयार मालांचे ढीग या राक्षसांवर मात करायला अॅपलला कष्ट करावे लागले. पण त्यांच्याबद्दल आपल्याला सुप्त आदर का वाटतो? कारण त्या कंपनीने अशा संकटावरही मात करून दाखवली. १९९९ च्या सुमारास त्यांनी आपल्या माल व्यवस्थापनात आमुलाग्र क्रांती केली. इन्व्हेन्टरी टर्न्स दहाच्या आसपास होते ते दोनशेच्या जवळपास नेऊन ठेवले आणि अशा प्रकारे या विद्येचे गुरु 'डेल' यांनाही मागे टाकले. १९९९ च्या या क्रांतीला जोडूनच नवीन आविष्कारांची मालिका अॅपलला आणता आली. iMac, iMacDV असे अनेकानेक तेव्हा आले. त्यांनी O.S. म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम अपग्रेड केली, iBook आणले. आक्रमकता आणि प्रतिस्पर्ध्यावर मात हे कॉम्प्युटर जगतात अपरिहार्य आहे. असे म्हणतात की 'Computer is like a fruit or dish, you have to sell it before you smell it!' त्यामुळे एखादी गोष्ट जुनी होणे याची व्याख्याच इथे बदलून गेली आहे. रणनीतीसुद्धा लगेच जुनी होते! Build to order आणि customization अर्थात ग्राहकाच्या पसंतीप्रमाणे आणि त्याला हवे असेल तेव्हाच उत्पादन करणे ही ह्या लढाईतली एक रणनीती ठरली. त्याविरुद्ध Build to Stock व Mass production ही जुनी रणनीती होती. थोडक्यात आम्ही भरपूर संख्येने बनवून ठेवलेल्या मालातून ग्राहकाला खरेदी करायला लावणे ही जुनी रीत आणि त्याला हवे असेल तेव्हा व तसे बनवून देणे ही नवी रीत.

आपण अगदी McDonald वा Subway सारखे मोठे फास्टफुड चेनवाले पाहू. ग्राहकांना काही ठराविक उत्पादने त्यांच्या आऊटलेट्समध्ये मिळतात. वेळोवेळी त्यात नवीन आविष्कारही येतात पण प्रत्येक ग्राहकाला जे हवे तसे वेगळे उत्पादन त्यांना देता येईल का? इन्व्हेन्टरी भरमसाठ वाढत जाईल, नवनवीन सामग्री कच्चा माल म्हणून ठेवावी लागेल पण ती आवडणारा ग्राहक येईलच अशी खात्री काय? एखादा म्हणाला मला आलू टिक्की नको त्याएवजी सुरणाची टिक्की द्या (असं कोणी म्हणेल असं वाटत नाही पण उदाहरण म्हणून!) किंवा भोपळ्याची टिक्की द्या तर MacD ला तरी ते शक्य होईल का! customization किती करता येईल याच्याही मर्यादा आहेत. आपल्याकडे 'जैन' खाद्यपदार्थांच्या बाबतीत हे शक्य झाले कारण त्या समुदायाची तेवढी खवय्यी संख्या आहे. पण आम्हाला प्रत्येकाची आवड व तंत्र सांभाळायचे असेल तर ते प्रत्येकजण त्यानुसार आणि त्या प्रमाणात उत्पादने विकत घेतील याची खात्री हवी. त्यापेक्षा न खपलेल्या मालाचा व अर्धकच्च्या मालाचा राक्षस कंपनीला बाजारातून उठवायला पुरेसा असेल. मग ती कंपनी बर्गर बनवत असो वा कॉम्प्युटर! ग्राहकाची आवड तर जोपासावी, चोखंदळपणाला पूरक अशी व्हरायटी देत राहावे व नवीन आविष्कार करावे या बरोबरच इन्व्हेन्टरीचे कोडेही सोडवावे या विरुद्धधर्मी गरजांमध्ये राहणे ही कसरत आज अपरिहार्य आहे!

fig3 Oct 15

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division