संपादकीय - सप्टेंबर २०१७

DAC oldबुलेट ट्रेन प्रकल्पाच्या माध्यमातून प्रचंड जपानी भांडवल भारतात येत आहे. ह्यात महाराष्ट्र, गुजराथ व केंद्र सरकारचा वाटा असला तरी जपानी भांडवल त्याच्या मानाने कितीतरी जास्त आहे, त्याचा व्याज दरही अत्यल्प आहे व परतफेडीसाठी भरपूर वर्षे आहेत. अर्थात ह्या प्रकल्पावरसुद्धा उलट सुलट चर्चा झाली व अजूनही होत आहे. अनेकांना हा प्रकल्प तोट्यात चालेल अशी भीती वाटते तर काहींना बुलेट ट्रेन ही आपली प्राथमिकता वाटत नाही. ह्या दोन्ही मुद्द्यात तथ्य असले तरी बुलेट ट्रेनच्या बाजूनेही बरेच मुद्दे आहेत.

एवढ्या वेगवान ट्रेन्स आपण नियंत्रित करू शकतो ही गोष्टच भारतीय रेल्वेला प्रचंड मानसिक बळ देणारी ठरणार आहे. फक्त मुंबई व अहमदाबादचेच नव्हे तर संपूर्ण देशातील रेल्वेचे तंत्रज्ञान सुधारण्याचे एक साधन म्हणून आपण ह्या प्रकल्पाकडे बघू शकतो. आज एका मार्गावर सुरु झालेली ही ट्रेन येत्या काही वर्षात अनेक ठिकाणी सुरु होईल ह्यात काहीच शंका नाही. ह्याच प्रकारचे मुद्दे जेव्हा कलर टीव्ही आला तेव्हा निघाले होते. मुंबई पुणे एक्सप्रेस वे लाही अनेकांचा विरोध होता. कोलकाता मेट्रोलासुद्धा सुरवातीला विरोधच झाला होता. आज देशातील बहुतेकांना आपल्या शहरात मेट्रो व्हावी असे वाटते. म्हणजेच, कालची 'चैन' ही आजची 'गरज' बनली आहे हे नाकारता येणार नाही. ISRO च्या उपक्रमांविषयीसुद्धा अशाच प्रकारच्या मुद्द्यांवरून हल्ली हल्लीपर्यंत रान उठवले जात होते हे आपण लक्षात घेतले पाहीजे. पण आता जेव्हा आपण अनेक देशांचे उपग्रह अंतराळातील कक्षेत सोडतो व बहुमोल परकीय चलन कमावतो तेव्हा आपली छाती फुलते व आपल्याला ISRO चे महत्व व उपयुक्तता समजते. मुंबई पुणे एक्सप्रेस वे कार्यान्वित झाल्याने केवळ वाहतुकीचा प्रश्न सुटला असं नाही तर पुणे परिसरातील उद्योजकतेला देखील झपाट्याने चालना मिळाल्याचे चित्र आता दिसत आहे. हीच गोष्ट बुलेट ट्रेनने जोडल्या जाणाऱ्या शहरांच्याबाबतीतही खात्रीने होऊ शकेल.

कुठलीही नाविन्यपूर्ण गोष्ट करायची म्हणजे विरोध हा होतोच मात्र ती गोष्ट आपण कशी तडीस नेतो व त्यामधून आपण काय शिकतो हे जास्त महत्त्वाचे असते, नाही का ?

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division