'सतत नवीन अनुभवांना सामोरे जा'

– डॉ.सुनिल मांजरेकर

1क्वालिटी कंट्रोल, हेल्थ, सेफ्टी, पर्यावरण संबंधित व्यवस्थापन प्रणाली, तसेच स्ट्रक्चरल ट्रेनिंग या क्षेत्रातील Sanbook Quality Consultancy या दुबईस्थित व्यवसायाचे सर्वेसर्वा डॉ. सुनिल मांजरेकर यांच्याशी करण्यात आलेली बातचित...

आपल्या आजवरच्या उद्योजकतेच्या प्रवासाविषयी काय सांगाल?

माझा जन्म अलिबाग जवळील 'सारळ' ह्या खेड्यातला. खेड्यापाड्यात जशा दगडी शाळा असतात तशाच एका शाळेत माझे शालेय शिक्षण पूर्ण झाले. दहावीनंतर अलिबाग मधील कनिष्ठ महाविद्यालयात "विज्ञान" शाखेत प्रवेश घेतला. वडील नोकरी निमित्त मुंबईमध्ये होते त्यामुळे १२ वी साठी मुंबई येथील पाटकर महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे निश्चित केले. आयुष्यात मोठं होण्यासाठी उच्च शिक्षण हाच आपला आधारस्तंभ होऊ शकतो हे मला तेव्हाच लक्षात आलं होतं. आई शाळेत शिक्षिका असल्यामुळे असही घरातलं वातावरण हे शिक्षणासाठी अत्यंत अनुकूल होतं. एकूणच शिक्षणाप्रती घरामध्ये असलेल पोषक वातावरण हे मला कायमच प्रेरणादायी ठरलं आणि त्याच अनुषंगाने अभ्यासाला योग्य महत्व देऊन १९८७ मध्ये विज्ञान शाखेतली पदवी संपादन केली.

त्याच दरम्यान Eupharma Laboratories Ltd मधून नोकरी ची संधी चालून आली. तेथे कार्यरत असताना MSc साठी इस्माईल युसुफ कॉलेज - जोगेश्वरी येथे प्रवेश घेतला. हा अभ्यास सुरु असताना, German Remedies Ltd मध्ये Quality Control Officer या विशेष जबाबदारी असलेल्या नोकरीची संधी मिळाली. नोकरी आणि शिक्षण असा दुहेरी प्रवास करत १९९१ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.

German Remedies Ltd मध्ये कार्यरत असताना, पुढे काय करता येईल याचा विचार सुरु होताच काही सहकारी होते त्यांचा सल्ला देखील घेत होतो आणि मग सर्व सारासार विचार करून डॉक्टरेट करावी असा निश्चय मनाशी केला. त्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करून १९९५ साली मुंबई युनिवर्सिटी मधून Analytical Chemistry हा विषय घेऊन डॉक्टरेट संपादन केली.

डॉक्टरेटचा अभ्यास करताना आलेले विलक्षण असे अनुभव, एकंदरीत घेतलेली मेहनत, लिहिलेले प्रबंध हा एक life changing experience होता असं मी म्हणेन. त्यातच अभ्यासासोबत मी नोकरी देखील करत होतो. त्यामुळे नोकरी मधील जबाबदारी, जोडीला अभ्यास, प्रबंध लिहिण्यासाठी लागणारी मेहनत आणि एकूणच वेळापत्रक जुळवणं हे एक खरंच मोठं आव्हान होतं. पण जीवनात शिस्त, महत्वाकांक्षा आणि जिद्द असेल तर अशी आव्हानं नक्कीच पूर्ण करता येतात हे मी खात्रीने सांगू शकतो.

खर म्हणजे डॉक्टरेट मिळवल्यानंतर अमेरिकेला जाऊन आपलं करिअर करावं हे माझं स्वप्नं होतं. पण तशी संधी मिळण्या पूर्वीच दुबई मध्ये नोकरी चा एक प्रस्ताव आला आणि दुबई पर्व सुरु झालं. आपला देश सोडून परदेशात जाऊन आपली स्वप्नं पूर्ण करण्यामागे प्रत्येकाचा काहीतरी विशेष उद्देश असतो. तसंच काहीसं माझंही होतं. मुंबई शहरात स्वतःची एक हक्काची जागा घेण्याचं माझ स्वप्नं होतं. परदेशातील संधी ही त्या स्वप्नाच्या दिशेने जाणारा मार्ग दाखवू शकेल हा पुरेपूर विश्वास होता आणि त्याचमुळे दुबई मधील संधी घेण्याचे मी निश्चित केले.

2१९९८ मध्ये दुबईतील Uni-star International या cosmetics & perfumes बनविणाऱ्या कंपनीमध्ये Quality Assurance Manager- Audit या पदासाठी माझी निवड झाली. ही संधी हा माझ्या करिअर मधील मैलाचा दगड होता. फार्मा मधील अनुभव मागे ठेवून परफ्युम इंडस्ट्रीकडे वळणे, हे नक्कीच आव्हान होतं. पण चांगल्या पगारासाठी, आयुष्यात पुढे जाण्यासाठी आव्हानं स्वीकारावी लागतात. ते आव्हान मी स्वीकारलं. कंपनीच्या सर्व उत्पादनांच्या Quality Assurance ची जबाबदारी माझी होती. ह्याच दरम्यान अजून एक संधी चालून आली. ती म्हणजे Dubai Accreditation Center- Dubai Municipality मध्ये Accreditation Engineer म्हणून काम करण्याची. पुन्हा एकदा कार्यक्षेत्र बदलण्याची रिस्क होती आणि आव्हान देखील! पण मी ते स्वीकारले आणि त्याच बरोबर जुन्या कंपनी मध्ये part time जॉब सुरु केला. तसेच खाजगी सल्लागार म्हणून ही काम सुरु ठेवले. 

हा सर्व व्याप सांभाळत असताना construction व्यवसायातली बरीच सूत्रे आत्मसात केली आणि उत्तमरित्या आपली जबाबदारी पार पडली. माझ्या कामावर प्रभावित होऊन दोन वेळा मला Excellence Award ने गौरविण्यात आले. अशा विविध क्षेत्रांचा अनुभव घेत माझ्या अनुभवांची शिदोरी अधिक बळकट होत गेली. Driving factor म्हणायचा तर हे विविध क्षेत्रातले अनुभव सतत नवीन आव्हान घेण्यासाठी खुणावत राहिले. या दरम्यान कॅनडा मध्ये जाऊन तेथील संधी आजमावण्याचा देखील मी प्रयत्न केला. पण तिथे मन रमले नाही त्यामुळे परिवारासकट आम्ही दुबई ला परतलो. परत आल्यावर Neocare Pharma मध्ये General Manager पदासाठी डॉ बी आर शेट्टी. यांच्याकडून ऑफर मिळाली. UAE exchange, NMC Healthcare चे सर्वेसर्वा डॉ बी आर शेट्टी, हे माझे आदर्श आहेत. परंतु ही ऑफर न स्वीकारता त्या दरम्यान मी स्वतंत्ररित्या सल्लागार म्हणून काम सुरु केले. माझी पत्नी स्नेहा हिची साथ आणि या सर्व अनुभवांच्या जिद्दीच्या जोरावर २००५ मध्ये Sanbook Quality Consultancy (SQC) ची सुरुवात झाली.

आज SQC च्या सध्याच्या स्वरुपाबद्दल काय सांगाल ?

SQC प्रामुख्याने क्वालिटी कंट्रोल, हेल्थ, सेफ्टी, पर्यावरण संबंधित व्यवस्थापन प्रणाली, तसेच structured training या विविध क्षेत्रात कार्यरत आहे. ट्रेनिंग हे माझे आवडते कार्यक्षेत्र आहे. त्या साठी मी UK मधील IRCA मधील Lead Tutor चे ८ विविध अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवली आहेत. या प्रमाणपत्रांना जगभर मान्यता असल्यामुळे SQC कोणत्याही क्षेत्रात व्यावसायिक तत्वावर ट्रेनिंग देऊ शकते. ही पात्रता इतर स्पर्धकांकडे नसल्यामुळे SQC चे ह्या क्षेत्रातील दुबई मधील स्थान अग्रगण्य आहे.

SQC दुबईसह कतार, बहारीन, कुवैत येथे देखील काम करत आहे. भारतातही मुंबई आणि पुणे येथे SQC च्या कामाला सुरवात झाली आहे. आज SQC चे १००० पेक्षा अधिक clients आहेत. तसेच food & hospitality क्षेत्रा मध्ये SQC खास ठसा उमटवून आहे.

हा व्यवसायात कोणकोणत्य़ा आव्हानांना सामोरे जावे लागते?

सर्वात मोठी अडचण म्हणजे सहकाऱ्यांना टिकवून ठेवणं. प्रशिक्षित झालेला कर्मचारी काही कालावधी नंतर इतर स्पर्धकांशी हात मिळवतो आणि नंतर स्वतंत्र व्यवसाय सुरु करतो. त्यामुळे सतत तयारीत राहाव लागतं. तसंच आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना, आपली presentations, programs, इतर सहकाऱ्यांनी वापरणे ही मोठी अडचण आहे असं मला वाटतं. अशा वेळी सर्व विश्वासू कर्मचाऱ्यांवर कामाची मदार अवलंबून असते.

या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या इतर व्यावसायिकांना काय सांगाल?

कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी अंगात चिकाटी आणि दूरदृष्टी ची आवश्यकता असते. नोकरीतील अनुभव, तसेच मेहनतीची तयारी आणि शिस्त ह्याच्या बळावर मी माझ काम प्रामाणिकपणे करत आलो. एक यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी, लोकांशी संपर्क- PR networking अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. मुळात मला माणसं जोडण्याची आवड असल्यामुळे प्रत्यक्ष काम करताना फार अडचणी आल्या नाहीत आणि चांगल्या सहकाऱ्यांची साथ आजवर मिळत आली आहे. तसेच माझ्या पत्नी ने आणि कुटुंबानेही जी साथ दिली, त्याचंच हे फळ आहे.

तरुणांना माझा सल्ला आहे की, नोकरीकडे एक gestation period म्हणून पाहा आणि आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. सतत नवीन अनुभवांना सामोरे जा. हे अनुभव आपल्या पुढील करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतात. आपण घेतलेल शिक्षण आणि प्रत्यक्ष काम पूर्णपणे वेगळं असतं. त्यामुळे हे अनुभव आपल्याला अधिक सक्षम करतात. एखाद्याला डॉक्टरेट करण्याची इच्छा असेल तर त्याने थिसेस पेक्षा संशोधनाला महत्व द्यावं, कारण तेच प्रत्यक्ष काम करताना उपयोगी ठरतं.

 

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division