वारसा उद्योजकतेचा
ऑटो कॅशिअर ते अलोवा

Alova 1सौंदर्य प्रसाधनांच्या दुनियेत "अलोवा ब्युटी अॅण्ड पर्सनल केअर' हा ब्रॅंड आता चांगलाच स्थिरावतो आहे. या कंपनीचे सर्वेसर्वा किरण भिडे यांना हा उद्योजकतेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. याविषयी चित्रा वाघ यांनी किरण भिडे यांच्याशी केलेली ही बातचित...
"माझे वडील प्रभाकर भिडे हे हाडाचे संशोधक होते. तसेच वृत्तीने धाडसी होते. त्यांचं लहानपण बेळगावमध्ये भिक्षुकी करणाऱ्या कुटुंबात गेलं. त्यांनी शाळा अर्धवट सोडली होती. पुढे पोर्ट ट्रस्टच्या कॅंटिनमध्ये ते कामाला लागले. नोकरी चालू असतानाच व्हिजेटिआयमध्ये वायरमन अॅण्ड इलेक्ट्रिशियनचा डिप्लोमा केला. त्यानंतर मशिन मेंटेनन्स विभागात ते दाखल झाले. विज्ञान, तंत्रज्ञान यात त्यांना विशेष गती होती. सतत कुठला ना कुठलातरी प्रयोग करत राहण्याचा छंद होता. त्यांना रसायनशास्त्रामध्ये, यंत्रनिर्मितीमध्ये विलक्षण रस होता. घरची परिस्थिती गरीबीची होती. तेव्हाच्या पारंपरिक ब्राह्मण कुटुंबांमध्ये व्यवसायाला प्रोत्साहन तर सोडाच पण हेटाळणीनेच बघितले जाई. ’कनिष्ठ नोकरी उत्तम शेती’ ह्या विचारसरणीचा पगडा होता.
१९६६ साली त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून ’ऑटो कॅशियर’ हे नाणी मोजण्याचे मशिन स्वत: तयार केले. नाण्यांचे आकार आणि वजन यानुसार हे यंत्र काम करत असे. व्यवहार झाला की कॅलक्युलेटर प्रमाणे हिशोब करून सुटे पैसे बाहेर टाकत असे. उदा. एखाद्या गिऱ्हाईकाचे ६५ पैसे किमतीचे बिल झाले आणि त्याने कॅशिअरला एक रुपयाचे नाणे दिले. तर कॅशिअर मशिनवर बिलाची रक्कम व जमा केलेले पैसे (इथे एक रुपया) ही नोंद करत असे आणि ’ऑटो कॅशियर’ ३५ पैसे नाण्यांच्या रुपात बाहेर टाकत असे. व्यवहाराच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे हे यंत्र उपहारगृहे, वाण्याची दुकाने, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी वापरण्याच्या दृष्टीने सोयीचे होते. मुंबईतील तांबे आरोग्य भुवन येथे हे वापरले जाई.
या संशोधनासाठी पेटंट मिळवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्या काळी पेटंट ऑफिस कलकत्त्याला होते. तिथे पुन्हा पुन्हा जाणे परवडण्यासारखे नव्हते मग वडिलांनी त्यासंबंधीची अनेक पुस्तके स्वत: विकत आणली, त्याचा सखोल अभ्यास केला. सगळी प्रक्रिया शिकून त्यांनी स्वत: पेटंटची कागदपत्रे तयार केली. दोन वेळा त्यांच्या पदरी निराशा आली मात्र अखेर ’ऑटो कॅशिअर’ चे पेटंट त्यांच्या नावावर लागले.
त्या काळी सरकारी कर्मचाऱ्याला खाजगी व्यवसाय करण्याची परवानगी नव्हती. मग माझ्या वडिलांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ उत्पादनक्षेत्रात उतरायचे ठरवले. या मशिनच्या गुणवत्तेबद्दल माझ्या वडिलांना इतकी खात्री होती की ते गिऱ्हाइकाला Unconditional Replacement Warranty देत. मात्र या व्यवसायाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. पुढे नाण्यांचे आकार बदलले, चलनामध्ये कागदी नोटांची मोठी वाढ झाली. आणि हे उत्पादन बंदच पडले.
कुठला ना कुठला उत्पादन व्यवसाय करायचा यावर मात्र माझे वडील ठाम होते. घरची परिस्थिती गरीबीची असूनही रिपेअरिंगची कामे करण्यास त्यांची तयारी नसे. आम्हालादेखील आपले वडील काहीतरी वेगळे आणि चांगले करत आहेत याचा अभिमानच होता. माझी आईसुद्धा कठीण परिस्थितीत खंबीरपणे कायम त्यांच्या पाठीशी उभी राहिली. नवनवीन मशीन्स बनवण्याचे त्यांचे प्रयोग चालूच होते.
त्यांना मोटरगाड्या, मोटरसायकल यांचीही अतिशय आवड होती. व्यवसाय करण्याआधी गाड्या विकणं, विकत घेणं, शर्यतीत भाग घेणं हे ते नेहमीच करत. पुढे १९७२ मध्ये त्यांनी भारतात कधीही न बनलेले 'Multi Fuel Engine' यशस्वीरित्या तयार केले. मात्र दुर्देवाने ही अभिनव कल्पना त्याकाळात योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही. माझ्या वडिलांनी कमी वजनाचे, लहान आकाराचे पण अत्यंत कार्यक्षम असे ’Fuel Pump' तयार केले होते. त्यांची माहिती देण्यासाठी मुंबईतील ऑपेरा हाऊस परिसरातील अनेक मोठ्या वाहन वितरकांना ते भेटले. या साध्या दिसणाऱ्या माणसाने इतके वैशिष्ट्यपूर्ण Fuel Pump स्वत: बनवले आहेत यावर त्यांचा विश्वासच बसेना. शेवटी गाडीमालकांना थेट गाठणे हा उपाय बाबांनी केला. मीही त्यावेळी त्यांच्या हाताखाली मदत करायचो. ’वेस्टर्न इंडियन ऑटोमोबाईल असो.’कडून आम्ही डेटाबेस मिळवला आणि त्या त्या पत्यांवर आमच्या उप्तादनाची माहिती देणारी पत्रकं पाठवली. जिथून प्रतिसाद मिळे तिथे जाऊन आम्ही प्रात्यक्षिक दाखवत असू. चार पाच वर्षे खडतर गेली पण हळूहळू आमचा जम बसू लागला.
वडिलांच्या या निरनिराळ्या व्यवसायांमुळे अनेकांशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले. यातूनच आमच्या उद्योगाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. १९८४-८५ च्या सुमाराची गोष्ट. त्यावेळी आम्ही कोल्हापूरला होतो. सुधीर तांबे हे आमचे सुहृद. बॅंकेत नोकरी करत मात्र त्यांना खरी आवड होती वनस्पतीशस्त्राची. विशेषत: आयुर्वेद आणि वनौषधी हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वनौषधींची आपण योग्य कदर करत नाही ही त्यांची खंत होती. रोजच्या जीवनात गुणकारी ठरतील अशा अनेक उत्पादनांची ते माहिती देत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीदेखील हौस म्हणून आवळा, जास्वंद, कोरफड अशा गुणकारी वनस्पतींवर काही प्रयोग सुरु केले. अर्थात माझ्याकडे याविषयीचं फारसं ज्ञान नव्हतं आणि अनुभवही नव्हता. पूर्णपणे नैसर्गिक फेअरनेस क्रीम मी तयार केले. उत्पादने वापरणाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर बारकाईने अभ्यास केला. लहान सहान त्रुटिंवर झटून काम केले. उत्तम गुणवत्ता आणि किफायतशीर किंमती हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी "अलोवा' या नावाने सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनाकडे वळलो.
आज आमच्याकडे तेलं, शॅम्पू, साबण, विविध क्रिम, लोशन्स, फेस वॉश, शेव्हिंग क्रीम अशी सर्व प्रकारची उत्पादने तयार होतात. मार्केटींगसाठी सोशल मिडियाच्या माध्यमातूनही आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचत आहोत. तसेच राज्यभरातील विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून आमची उत्पादने सर्वदूर पोहोचली आहेत. आरोग्यपूर्ण, दर्जेदार उत्पादने व वाजवी किंमती यामुळे व्यवसायाची वाढ उत्तम प्रकारे होत आहे. लहानपणापासून वडिलांना विविध उद्योगांमध्ये विलक्षण रस असलेला मी पाहातच होतो. त्यामुळे आपण कोणाच्याही हाताखाली नोकरी न करता जमेल तसा स्वत:चाच व्यवसाय करायचा हे मी पक्कं केलं होतं. आज माझे वडील हयात नाहीत परंतु त्यांचं स्वप्न मी पूर्ण करू शकलो ही माझ्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट आहे.'
- किरण भिडे
- 7720887000