महाराष्ट्रातील १५ उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार

maharshtratil 1बांधकाम, उत्पादन , सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात सुरक्षा विषयक उत्कृष्ट कार्य करणा-या महाराष्ट्रातील १५ उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार केंद्रीय उद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. गोदरेज, शापूरजी पालनजी, सुप्रीम पेट्रोकेम, कृष्णा यासह अनेक संस्थांचा समावेश आहे.
राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेच्या वतीने देण्यात येणा-या सुरक्षा पुरस्काराचे वितरण नवी दिल्ली येथे करण्यात आले. देशातील ७२ व्यवस्थापनांना सुरक्षा विषयक केलेल्या उल्लेखनीय कामासाठी सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेचे अध्यक्ष सतीश रेड्डी, उपाध्यक्ष अरविंद दोशी, राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेच्या वित्त विभागाचे अध्यक्ष कल्याण चक्रवर्ती, श्रम व रोजगार विभागाचे अतिरिक्त सचिव हिरालाल समरीया व राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेचे महासंचालक व्हि.बी. संत उपस्थित होते.
महाराष्ट्रातील १५ व्यवस्थापनांना पुरस्कार
उत्पादन, बांधकाम व सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यवस्थापनांना सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार, श्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार, सुरक्षा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कामगारांच्या सुरक्षा विषयक व आरोग्य विषयक बाबींसाठी उल्लेखनीय काम करणा-या व्यवस्थापनांना राष्ट्रीय सुरक्षितता परिषद विविध सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करते. यावर्षी महाराष्ट्रातील १५ व्यवस्थापनांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्पादन क्षेत्रात कार्य करणारी रायगड जिल्ह्यातील सुप्रीम पेट्रोकेम लि., पुणे जिल्ह्यातील स्पायसर इंडिया प्रा. लि. व चंद्रपूर जिल्ह्यातील जी.एम.आर. वरोरा एनर्जी या कंपनीस उत्पादन क्षेत्रातील श्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रौप्य चषक व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील आर.एम.सी. रेडीमिक्स(नवी मुंबई) व चिपळुण येथील कृष्णा अॅन्टीऑक्सीडंटस्‍ या व्यवस्थापनांना श्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालघर येथील एन.पी.सी.आय.एल. तारापूर अॅटोमिक पॉवर स्टेशन या आस्थापनेस सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांधकाम क्षेत्रातील शापुरजी पल्लोनजी अन्ड कंपनी प्रा. लि. मुंबई या व्यवस्थापनांस कास्य चषक व प्रशस्तीपत्र देऊन सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील नवी मुंबई येथील गॉजेस बार्डन प्रा. लि. , विक्रोळी येथील गोदरेज अन्ड बॉयसी कंपनी लि. व पुणे जिल्ह्यातील हेनकेल अॅडेसीव्ह टेक्नॉलॉजीस या आस्थापनांना सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले.IMG 20180427 WA0022
पाच व्यवस्थपनांना प्रशंसापत्र
महाराष्ट्रातील ५ व्यवस्थापनांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये ठाणे जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्रातील घरडा केमीकल्स लि. प्रिवी ऑरगॅनिक्स (रायगड) व राजणगांव पुणे येथील टाटा स्टील प्रोसेसिंग अन्ड ड्रिस्ट्रीब्युशन लि. तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील हडपसर पुणे येथील आर.एम.सी. रेडीमिक्स व मालाड येथील आर.एस.सी रेडीमिक्स या कंपन्यांचा समावेश आहे.