DAC MUV PICरत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारायचे केंद्र सरकारने योजले आहे. ह्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग विश्वच नव्हे तर सामाजिक व राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघाले आहे.

सौदी अरेबिया कडून कच्चे तेल आयात करून त्यावर भारतात नाणार येथे प्रक्रिया करण्यात येईल. तयार झालेल्या पेट्रोल व डिझेल पैकी काही भाग भारतासाठी राखून ठेवला जाईल. प्रक्रियेमध्ये तयार झालेल्या इतर पदार्थांना सुद्धा मोठी बाजारपेठ आहे. एवढ्या मोठ्या रिफायनरीसाठी लागणाऱ्या ऊर्जेसाठी एक मोठे औष्णिक वीजकेंद्रसुद्धा ह्या प्रकल्पात समाविष्ट केले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार ह्या प्रकल्पाचे अनेक फायदे आहेत. पहिले म्हणजे हा प्रकल्प आपली तेलाची गरज बर्याच प्रमाणात भागवू शकेल. त्या क्षेत्रात असलेल्या मोनोपॉलीला काही प्रमाणात शह बसेल. एवढ्या मोठ्या प्रकल्पामध्ये अनेकांना नोकऱ्या मिळतील. रत्नागिरीमध्ये अनेक संलग्न उद्योग उभे राहतील व एक प्रकारे त्या भागात औद्योगिक क्रांतीच घडून येईल. मात्र ह्या प्रकल्पाच्या विरुद्ध सुद्धा मुद्दे मांडले जातात. एवढ्या मोठ्या प्रकल्पामुळे हवेचे व पाण्याचे खूप प्रदूषण होईल असे लोकांना वाटते. मासेमारी,आंबा काजूची कलमे ह्या सारख्या पारंपरिक उद्योगांवर अनिष्ट परिणाम होईल अशीही भीती व्यक्त होत आहे.

आजच्या युगात औद्योगिक प्रगती महत्वाची आहे. ऐहिक विकासाची गंगा ह्याच मार्गाने कोकणात पोहोचू शकते. मात्र प्रदूषण,विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन, स्थानिकांसाठी नोकर्या ह्यासारख्या महत्वाच्या प्रश्नांची लोकांना पटतील अशी उत्तरे सरकारने शोधली पाहिजेत. त्या बाबतीत (कोणत्याही) सरकारचे 'Track Record फारसे समाधानकारक नाहीये. कोकणचे कॅलिफोर्निया करायचे स्वप्न आपण बघतो पण त्याच कॅलिफोर्नियात अनेक रिफायनरी असूनसुद्धा प्रदूषण आटोक्यात आहे हे मात्र सोयीस्करपणे विसरतो.

कोकणात कुठल्याही नव्या प्रकल्पाची घोषणा झाली कि वादाचे आणि भांडणाचे फडच उभे रहातात. एनरॉन, जैतापूर ह्या प्रकल्पांच्या बाबतीत हेच झाले. 'आम्हाला वीज पाहिजे, मात्र वीजकेंद्र आमच्या जिल्ह्यात नको' ही भूमिका नेहमी कशी चालेल ? औद्योगिक प्रकल्पांमुळे कोकणातील निसर्गाची थोडी हानी होणार आहे हे मान्य पण केवळ सृष्टीसौंदर्य बघून पोट भरत नाही हे ही तेवढेच खरे आहे. त्याचबरोबर कुठलाही प्रकल्प पुढे नेताना स्थानिकांचे अनुमोदन व सहकार्य अनिर्वाय, हे तत्वसुद्धा महत्वाचे आहे.
ह्या सर्व गादारोळातूनच आपल्याला शाश्वत विकासाचा मार्ग शोधायचा आहे,नाही का !

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division