बॅंक ऑफ चायना भारतात येत्ये!

"हे विश्वची माझे घरं' ही संकल्पना सातशे वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात रूजली असली तरी भारताची बाजारपेठ सन 1991 मध्ये म्हणजे 27 वर्षापूर्वी जगभरातील उद्योग, व्यवसायासाठी खुली झाली. गेल्या काही वर्षात जागितकीकरण, उदारीकरण व खासगीकरणाच्या मतलबी वाऱ्यांनी जगभरात संचार केला म्हणूनच "ग्लोबल व्हिलेज' (म्हणजेच विश्वची माझे घरं) ही नवीन संकल्पना उदयास आली.
या "ग्लोबल व्हिलेज' मधील 125 कोटी लोकसंख्या असलेली भारत ही मोठी बाजारपेठ जगातील सर्वच महाकाय उद्योग व्यवसायांना आकिर्षत करीत आहे. आजपर्यंत या बाजारपेठेत जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक उद्योग, व्यवसायांनी आपली दुकाने थाटली. कारखाने उभारले. या सर्व उद्योगांना लागणारे "एम व्हिटामिन' म्हणजे मनी, मॅन, मशीन पैकी "मनी' म्हणजेच पैसा सहज उपलब्ध करणाऱ्या देश-विदेशातील बँकांनी देशभरात आपल्या शाखा उघडल्या.
आता बँक ऑफ चायना (बीओसी) भारतात येत आहे.
देशाची मध्यवर्ती बॅंक रिझव्र्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) जगातील चौथ्या क्रमांकाच्या "बँक ऑफ चायना' ला भारतात आपला व्यवसाय करण्यासाठी बँकिंग परवाना देण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे. या मान्यतेमुळे "बँक ऑफ चायना' आपल्या शाखा देशभरात सुरू करेल. या बँकेची पिहली शाखा लवकरच मुंबईत सुरू होण्याची शक्यता आहे.
आकाश कंदिलापासून बॅटरीपर्यंत, दिव्यांच्या माळांपासून इलेक्ट्रॉनिक्स खेळण्यापर्यंत, मोबाईल पासून लॅपटॉपपर्यंतच्या असंख्य लहान मोठ्या चायनीज उत्पादकांनी भारतीय बाजारपेठ भरून गेल्या आहेत. "स्वस्तात मस्त' हे ब्रीद असणारी ही उत्पादने भारतीयांच्या घराघरात पोचली आहेत. या चायनीज उत्पादनांच्या विरोधात काही स्वदेशी भक्तगणांनी जोरदार आवाज उठविला होता. मात्र काही दिवसातच हा आवाज हवेत विरून गेला. आता तर "आरबीआय'ने हिरवा कंदिल दाखिवल्याने बॅंक ऑफ चायनाच्या शाखा देशभरात सुरू होणार आहेत. हजारो कोटी रूपयांची कर्ज बुडल्याने भारतीय बँकांचे कंबरडे मोडलेले असतानाच बॅंक ऑफ चायनाचा भारतात प्रवेश होत आहे.
भारत व चीन या दोन देशांमधील आर्थिक संबंध आणखी बळकट व्हावेत या उद्देशाने बँक ऑफ चायनाला भारतात व्यवसाय करायला परवानगी देण्यात आली आहे. ही बँक शंभर टक्के चीन सरकारच्या मालकीची असून तिच्या शाखा 31 देशांमध्ये आहेत. सन 1912 मध्ये सुरू झालेली बँक ऑफ चायना 106 वर्षे जुनी बँक असून तिचे मुख्यालय बिजिंग येथे आहे. चीनमध्ये सर्वाधिक कर्ज पुरवठा करणारी ही बँक असून या बँकेत तीन लाख दहा हजार पेक्षा जास्त कर्मचारी काम करीत आहेत. या बँकेची मालमत्ता 2991.90 बिलियन डॉलर इतकी आहे. जगातील पहिल्या दहा बँकांमधील पाहिल्या चार बँका चीनच्या असून त्यात चौथा क्रमांक बॅंक ऑफ चायनाचा लागतो. भारतातील सर्वात मोठी बँक "एसबीआय' जगात 55व्या क्रमांकावर आहे.
बँक ऑफ चायना ही व्यापारी बँक म्हणून कार्यरत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगातील 31 देशात 24x7 या तत्त्वावर ही काम करते.
अशी ही अत्याधुनिक व महाकाय बँक भारतात येत आहे याचे स्वागत करायला हवे. या बँकेच्या माध्यमातून चीनी बँका कशा काम करतात व त्यांची उत्पादने कशी आहेत याची ओळख आपल्याला होईल. बँक व्यवस्थापन, कर्ज वाटप, कर्ज वसुलीची या बँकेची पद्धत कशी आहे याचा अभ्यास भारतीय बँकांना नक्कीच करता येईल. बँक ऑफ चायनाच्या माध्यमातून येणारा चीनी पैसा आपल्या उद्योग, व्यवसायांना लाभदायक ठरतो का हे बघायचे.
- प्रसाद घारे

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division