मल्टी कमोडिटी एक्सचेंजचे लक्षवेधी डायरेक्टर आणि सीईओ

                                                                     - मृगांक परांजपे

Lakshvedhiमल्टी कमोडिटी एक्सचेंजचे (MCX) विद्यमान मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. मृगांक परांजपे या आपल्या पार्लेकरांची लक्षवेधी ओळख आज आपण करुन घेऊया.वडील रेल्वेत लखनऊ येथे नोकरीला त्यामुळे शालेय शिक्षण व ज्युनियर कॉलेज लखनऊ येथेच झाले. पुढे आय आय टी पवई ला इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या नंतर आय आय एम अहमदाबाद येथे त्यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले व कॅम्पसमधून सिटी बँकेत रुजू झाले. त्यानंतरची सर्व करिअर फायनान्स मध्ये झाली.

आय एन जी बेअरिंग, डॉइच्च बँक , इंडिया इन्फोलाइन, रिलायन्स लॉजिस्टिक, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अशा विविध नामवंत कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषवत त्यांची प्रगती चालू राहिली. २००५ ते २०११ या काळात डॉइच्च बँकेचे साऊथ व साऊथ इस्ट एशियाचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. २०११ मध्ये डॉइच्च बँकेतच एशिया पॅसिफिकचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांना सिंगापूर येथे जबाबदारी देण्यात आली - जी त्यांनी अतिशय यशस्वीपणे पेलली. मात्र या तीन वर्षांच्या काळात सर्व कुटुंबीय मुंबईत व ते स्वतः सिंगापूर मध्ये राहत होते. पत्नी डॉ सौ शुभांगी (भूलतज्ञ ) व दोन्ही मुलगे नचिकेत व अंशुमन शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याने सर्व कुटुंबियांना मुंबई सोडणे अशक्य होते व मल्टिनॅशनल कंपनीत पुढच्या पदांवर प्रगती करण्यासाठी श्री. मृगांक परांजप्यांना देशाबाहेरील पदे स्वीकारणे भाग होते. अश्यावेळी त्यांना भारत केंद्रित आव्हानाची ओढ होती आणि त्याचवेळी त्यांना एमसीएक्सकडून बोलावणे आले.

फार पूर्वी मुंबईत कापसाचे ट्रेडिंग केले जायचे. त्यावर जगभरातील कापसाची किंमत ठरायची. पण १९५०-५५च्या सुमारास सरकारने त्यावर बंदी आणली व भारतातील कमोडिटी ट्रेडिंग संपले. जे पुन्हा २००२ मध्ये सुरू करण्यात आले. यात मधल्या दोन ते तीन पिढ्यांना याबद्दलची काहिच माहिती मिळाली नाही. कमोडिटी ट्रेडिंग सुरुवातीला फॉरवर्ड मार्केट कमिशन नियंत्रित करीत असे. पण कमोडिटी ट्रेडिंगला इतर रोखे बाजारापासून वेगळे ठेवल्याचा फटका कमोडिटी ट्रेडिंगला बसला.२०१५ मध्ये एफएमसी सेबीमध्ये विलीन झाली व त्यानंतर कमोडिटी ट्रेडिंगच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. नुकत्याच बहरु लागलेल्या नव्या वाटेवरचे श्री. मृगांक परांजपे मार्गदर्शक झाले आहेत.

शेअर मार्केटमध्ये ज्याप्रमाणे फ्युचर व ऑप्शन्स ट्रेडिंग होत त्याप्रमाणे एमसीएक्समध्ये आत्तापर्यंत फक्त फ्युचर ट्रेडिंग करता येत होतं. आता ऑप्शन ट्रेडिंग सुरू झाले आहे.पण अजूनही विदेशी भांडवलदारांना त्यात ट्रेडिंग करता येत नाही. मात्र पुढच्या तीनेक महिन्यात म्युचुअल फंडांना परवानगी मिळेल यासाठी परांजपे कार्यरत आहेत. सोन्यामध्ये आज भारतातील ज्वेलर्स हेजींग करू लागले आहेत व किमतीतल्या उलाढालींवर त्यांना विम्यासारखे संरक्षण मिळत आहे. आज आपल्या देशात शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती बद्दल बरीच चर्चा चालते. एमसीएक्सचा त्यांना काय फायदा? असे विचारताच परांजपे सर म्हणाले, की शेतकरी पुरेश्या ज्ञानाच्या अभावी ट्रेडिंग करू शकणार नाही. मात्र त्यांना प्रत्येक वस्तूच्या रोजच्या रास्त किमतीची माहिती मिळेल व त्याप्रमाणे ते आपला माल कधी बाजारात विकायचा हे ठरवू शकतील.निदान गोदामात साठवता येणाऱ्या पिकांमध्ये तरी नक्कीच त्यांना याचा फायदा मिळेल. मात्र त्यासाठी त्यांना विचारपूर्वक हालचाली कराव्या लागतील. सहकार तत्त्वावर मात्र त्यांना कमोडिटी ट्रेडिंग करूनही फायदा होऊ शकतो.

कमोडिटी ट्रेडिंग अजून फारसे लोकप्रिय नाही याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की शेअर्स प्रमाणे ही प्रत्येकाला करता येणारी गोष्ट नाही. इथे प्रत्येकला माला संबंधी ज्ञान असावे लागते. त्याचप्रमाणे एका मालाविषयी ज्ञान असलेली व्यक्ती इतर मालांमध्ये ट्रेडिंग करू शकेलच असे नाही. त्यामुळे इथे फक्त माहितगारच ट्रेडिंग करतात. जागतिक पातळीवर विचार करता भारत यामध्ये फारच मागे आहे. ट्रेडिंग व्हॉल्यूम व जीडीपीचा रेशिओ युकेमध्ये ६.५ आहे तर अमेरिकेत २.५ आहे. चायना, मलेशिया सुद्धा २ व १.७५ आहेत. तेथे भारताची स्थिती आजच्या घडीला ०.५ आहे. मात्र पुढील 20 वर्षांत यात मोठा बदल होईल अशी परांजप्यांना खात्री वाटते.

आज जगभर गाजत असलेल्या क्रिप्टो करन्सी बद्दल मात्र श्री.मृगांक परांजपेंना विश्वास वाटत नाही. कोणतेही नियंत्रण नसलेल्या या व्यवहारांच्या शुचिर्भूततेबद्दल ते साशंक दिसतात. तर ब्लॉकचेन ही केवळ एक आलेली लाट आहे. त्यात फारशी आशा ठेवण्याजोगे काही नाही असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

भविष्यातील मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी धडपडणार्या श्री परांजपेंचे वर्तमानावर ही पूर्ण लक्ष आहे. विवीध पदे व जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच आपल्या मित्रांसमवेत पार्ल्यात त्यांनी प्रबोधन मंच पार्ले ही संस्था सुरु केली. आपल्या व्यस्त दिनचर्ये बाहेर आपण ज्या समाजात वावरतो तिथे विचारांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे आणि म्हणूनच स्वतंत्र अकरा व्यावसायी मित्रांची ही संस्था. गेल्या अडीच वर्षात विविध विषयांवर अत्यंत थोर विचारवंतांचे कार्यक्रम त्यांनी आयोजिले आहेत.

कॉलेज जीवनात नाटक आणि ब्रीज या आपल्या छंदांची जोपासना केली. आय आय टीत सुप्रसिद्ध मूड इंडिगो ह्या फेस्टिवलचे ते जनरल सेक्रेटरी होते. अलीकडच्या काळात लांबवर चालायला जाणे हा त्यांचा आणि शुभांगीचा आवडता छंद आहे पण त्याबाबत आपल्याकडे आजून सोयी असत्या तर त्यांना नक्की आवडल्या असत्या .

जागतिक स्पर्धेमध्ये भारताचेही पाऊल पुढे पडावे असे वाटणार्या अनेक व्यक्तींपैकी मृगांक परांजपे हे एक आहेत.त्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्नही चालू आहेत. यात त्यांना यश नक्कीच मिळेल.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division