'आडव्या तेल विहिरींच्या' तंत्रज्ञानाचे व 'जोशी समीकरणा'चे जनक

                                                                  - डॉ.सदानंद जोशी

Joshiतेल विहिरी मधून निघणाऱ्या तेलाचं उत्पादन वाढविण्याच्या कामी 'आडव्या विहिरींच्या' तंत्रज्ञानाची नामी कल्पना डॉ. सदानंद जोशी यांच्या सुपीक मेंदूतून निघाली. 'जोशी समीकरण' हा त्यांनी विकसित केलेला फॉर्मुला आज जगभरातील आडव्या तेलविहिरीतून निघणाऱ्या उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यासाठी उपयोगात येतो. आडव्या विहिरीद्वारे खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्पादनाचा 160 हून अधिक क्षेत्रीय प्रकल्पात जोशी महत्त्वाची भूमिका बजावतात.

1950 मध्ये मुंबईत डॉ.सदानंद जोशी यांचा जन्म झाला त्यांचे वडील दत्तात्रय जोशी हे आर्थर रोड हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी होते. सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यावर ते एमटेक या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मुंबईच्या प्रथितयश आयआयटी कॉलेजमध्ये गेले आणि 1975 मध्ये एमटेक पदवी मिळवली. मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी असलेले डॉ.जोशी आयुष्यात प्रयत्नपूर्वक केलेल्या स्वकष्टाने पुढे आले. एका खनिजतेल कंपनीत नोकरीत असताना त्यांनी त्या विषयातील ज्ञान संपादन केलं, त्या व्यवसायातल्या खाचाखोचा समजून घेण्यावरच न थांबता त्यांनी आपल्या नोकरीच्या कालखंडात काही अभिनव तंत्रज्ञानाचा शोध लावला. त्याचा फायदा आज जगभरातील सर्व तेल उत्पादक कंपन्या करून घेत आहेत.

आयआयटी मधील सुहास सुखात्मे हे त्यांचे मार्गदर्शक होते. एमटेक झाल्यानंतर जोशी यांनी एम्समधील आयोवा स्टेट विद्यापीठातून पीएचडी करण्यासाठी अमेरिकेची वाट धरली. तेव्हा त्यांच्या पदवीचा विषय होता 'नॉन न्यूटेनियन फ्लुईड' म्हणजे घट्ट व चिकट द्रवपदार्थ. इतर द्रवपदार्थांसाठीचे भौतिक शास्त्रातील नियम ह्या द्रव पदार्थांना लागू पडत नाही.

डॉ.जोशी यांना आपल्या कॉलेज जीवनापासून ऊर्जा निर्मिती व बचत तसेच ऊर्जेवर चालणारी इंजिन्स यामध्ये स्वारस्य होतं. म्हणूनच पदवी घेण्यासाठी त्यांनी आपल्या आवडीचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा विषय निवडला होता. ऊर्जा या विषयाकडे असलेला त्यांचा खास ओढा व मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील त्याचं ज्ञान व अनुभव या गोष्टींचा मेळ जमून आल्यामुळे त्यांना यशाचा मार्ग मोकळा झाला. पीएचडी झाल्यानंतर लगेचच ओक्लाहोमा मध्ये त्यांनी 'फिलिप्स' या पेट्रोलियम कंपनीत नोकरी मिळवली. ऊर्जा या त्यांच्या खास आवडीचा विषयाशी संलग्न खनिज तेल निर्मितीच्या कंपनीत त्यांना अजिबात परकेपणा वाटला नाही. या कंपनीत काम करत असताना त्यांनी तेल विहिरींचे खोदकाम, कच्या तेलास जमिनीतून बाहेर काढण्याच्या पद्धती आणि खनिजतेल व नैसर्गिक वायू यांच्या उत्पादनासंबंधीचं तंत्रज्ञान असे तेल उत्पादन उद्योगातील वेगवेगळे पैलू शिकून घेतले. आपल्या टीमसह ते तेलखाणींच्या प्रदेशांचे नमुने बनवत असत, कुठे खोदकाम करायचं, कशा प्रकारची विहीर खोदायची या सगळ्यांचा विचार करून, तेलाच्या उत्पादनाची गणितीय पद्धतीने आकडेमोड करून तेल उत्पादनाचा अंदाज वर्तवत असत. डॉ.जोशी ह्यांनी फिलिप्समध्ये नोकरी करत असताना पेट्रोलियम उद्योगाचे बारकावे तर समजून घेतलेच पण नुसतं शिकण्यापेक्षा बरंच काही अधिक त्यांनी आपल्या गाठीशी बांधून घेतलं. 1988 साली आपली पहिली तेल कंपनी (JTI) जोशी टेक्नॉलॉजीस इंटरनॅशनल ही कंपनी स्थापण्याच्या वेळेस त्यांच्या मनात त्यांचे प्रेरणास्त्रोत श्री.फिलिप यांचा आदर्श होता. पेट्रोलियम उद्योगात सधन भांडवलाची फार गरज असते. तेल विहिरींचे खोदकाम हे अतिशय खर्चिक काम असतं. सुरुवातीला थोडी वर्ष त्यांच्या जेटीआय या कंपनीने सल्लागाराच्या भूमिकेत घालवली. आडव्या विहिरींच्या तंत्रज्ञानावर डॉ.जोशी यांनी नाविन्यपूर्ण शोध लावले होते. आज् जरी जगभरातील तेलकंपन्या ते तंत्रज्ञान वापरून उत्पादनात वाढ करून घेत असल्या तरी तेव्हा हे तंत्रज्ञान नवीन होत. डॉ.जोशी ह्यांनी एक गणितीय समीकरण मांडलं. 'जोशी समीकरण' ह्या त्यांच्या समीकरणाने आडव्या विहिरींच्या लांबीनुसार त्यातून निघणारया तेल उत्पादनाची गणना करता येऊ शकते. त्यांचा पहिला तेलविहीर प्रकल्प अमेरिकेत होता आता मात्र 'जीटीआय' न्यू मेक्सिको,कॅनडा,भारत व कोलंबिया येथे तेल विहिरी खणण्याचे कंत्राटं घेते. भारतातील गुजरात राज्यात जीटीआयच्या विहिरी आहेत. कंपनीचे अध्यक्षपद भूषवताना डॉ.जोशींना आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचं आयोजन,वाटाघाटी व धोरणात्मक नियोजन या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागत. जीटीआय कंपनी सध्या भारतातील गुजरातमधील धोलका व वावेल या तेलखाणींच्या प्रदेशात कार्यरत आहे. प्रतिदिन 910 बॅरल तेलाचं उत्पादन होतं. ह्या क्षेत्रात स्पर्धेला सामोरं जावं लागतं का? यांवर उत्तर देताना ते म्हणतात, भारतात फारच थोड्या तेल उत्पादक कंपन्या अस्तित्वात आहेत. त्यांचे तेलखाणी प्रदेश वेगळे आहेत. त्यामुळे स्पर्धेचा प्रश्न उद्भवत नाही. तेलविक्रीचं म्हणालं तर जेवढं तेलउत्पादन होतं तेवढं सगळं इंडियन ऑइल कंपनी विकत घेते. भारतातील तेलाची मागणी प्रचंड आहे. रोज 4.1 दशलक्ष बॅरलचा वापर भारतात होतो. त्यातील फक्त 0.8 दशलक्ष बॅरल इतकं उत्पादन काढण्यास भारत समर्थ आहे. म्हणजेच 3.3 दशलक्ष बॅरल तेलाची आयात करावी लागते. भूरचनाशास्त्राप्रमाणे भारतीय भूखंड हा इतर भूभागातील खडकांपेक्षा त्यामानाने अलीकडचे म्हणजे दहा दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहेत. जुन्या खडकांमध्ये भरपूर तेलसाठा असतो परंतु भारतातील खडक हे मुख्यत्वे लावा खडक आहेत, जे वाळूमय खडकांसारखे सच्छिद्र नसल्यामुळे तेलाची मात्रा कमी असते. तेलाच्या बाबतीत स्वावलंबी बनणे ही भारतासाठी कठीण बाब आहे.

तेल विहिरींच्या आडव्या खोदकामाचे इंगित समजावून सांगताना डॉ.जोशी म्हणतात, तेल हाती लागण्यासाठी जमिनीखाली 2000 ते 3000 मीटर खोल खणत जावं लागतं. ज्या भागातून खनिजतेल हस्तगत करता येतं तो भूगर्भातील पट्टा मात्र फक्त दहा ते पन्नास मीटर इतक्या जाडीचा असतो. त्या क्षेत्रापर्यंत पोहोचल्यानंतर प्रत्येक वेळी उभं खणंत जाण्यापेक्षा, थोडं अंतर लांबवर आडवं खोदत गेल्यास तेलविहिरीचे तेलसाठ्याशी असलेले संपर्क क्षेत्र वाढून अधिक प्रमाणात तेल उत्पादन होऊ शकते. परंतु प्रत्यक्षात असं आडवं खोदकाम करयचं कसं ही मोठी समस्या होती. काही तज्ञांच्या टीमने ते तंत्रज्ञान विकसित केलं. त्यानंतर डॉ.सदानंद जोशी यांनी एक गणितीय समीकरण मांडले या समीकरणाने विहिरीच्या लांबीनुसार त्यातून निघणार्या. तेल उत्पादनाची गणना करता येऊ शकते. ही संकल्पना विशद करून सांगताना डॉ.जोशी पुढे म्हणतात, भूगर्भीय स्तरातील चुनखडी व वाळूच्या खडकांमध्ये तेलाचा साठा सापडतो. या सच्छिद्र खडकांमधून झिरपत झिरपत तेल विहिरीत जमा होतं. तेल साठ्याचा व विहिरीचा संपर्क एकमेकांशी जितका वाढेल तितक्या प्रमाणात अधिक तेल विहिरीमध्ये जमा होतं. काही काही वेळा अतिदाबाने तेल आपणहून उसळून जोरात बाहेर पडतं पण बहुतांशवेळा बाहेर काढण्यास पंपाची गरज असते. कधीकधी तेलाचा एक थेंबही न लागल्यामुळे सगळे कष्ट व्यर्थ जातात. आखाती देशांमध्ये एका प्रातिनिधिक विहिरीतून दिवसाला 2000 बॅरल इतकं तेल उत्पादन होतं. अमेरिकेत अशाच प्रकारच्या विहिरीतून 40 बॅरल तर भारतात ते 100 बॅरल असतं. तेल उत्पादनातील भिन्नता त्या त्या प्रदेशातील तेलसाठ्यावर अवलंबून असते.

कच्च्या खनिज तेलाच्या किमतीतील चढ-उतार यांचा त्यांच्या व्यवसायावर काही फरक पडतो का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात, किमती कमी असतात तेव्हा मी विहिरी खोदण्यास प्रमाण कमी करतो कारण त्या आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसतात उलट जेव्हा किमती चढ्या असतात तेव्हा विहीर खोदण्याचे काम फायदेशीर ठरतो परंतु या सगळ्यांचा आमच्यावर काही परिणाम होत नाही कारण त्या किमतीच्या काळात आम्हालाही सेवा देणाऱ्यांना अधिक मोबदला द्यावा लागतो.

पेट्रोलियम शतकातील सर्वात प्रभावी 100 अग्रगण्य व्यक्तींमध्ये डॉ.सदानंद जोशी यांचा समावेश होतो. ते उत्पादनातील 'आडव्या विहिरीच्या' तंत्रज्ञानाचे आणि 'जोशी समीकरण'चे ते जनक आहेत. डॉ.जोशी यांना 2012 साली आयोवा स्टेट विद्यापीठाकडून, अँसन मास्टर मेडल हा सर्वोच्च इंजीनियरिंग पुरस्कार मिळाला आहे. अगदी अलीकडे म्हणजे 2016 साली सोसायटी ऑफ पेट्रोलियम इंजिनियर्स यांच्यातर्फे त्यांना IOR (Improved oil recovery) हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division