‘भारत विकास ग्रुप’ (बीव्हीजी) 
                                                  - हणमंतराव गायकवाड

Hanmant gaikvadव्यवसाय क्षेत्रात आपला खास ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींमध्ये आता मराठी उद्योजकांचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे असं म्हटलं तर ही अतिशयोक्ती ठरू नये. अशाच व्यक्तींपैकी एक ठळक नाव म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेच्या अणि कष्टाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शून्यातून विश्व साकारणारे हणमंतराव गायकवाड!

हणमंतराव गायकवाड यांच्या जन्म २१ ऑक्टोबर १९७२ साली सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे एका सामान्य कुटुंबात झाला. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील आजारी असायचे, आई शिवणकाम करून उदरनिर्वाह करायची. मात्र मुळातच हुशार असलेल्या लहानग्या हणमंतने शिक्षणात आपल्या बुद्धीची चुणूक दाखवली. चौथीत असताना त्यांना स्कॉलरशिप मिळाली आणि त्यांच्यातली हुशारी ओळखून वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी पुण्यात आणलं. त्याच सुमारास त्यांचे वडीलही त्यांना शिवाजी महाराज, विवेकानंद यांच्याविषयी असलेल्या भाषणांना घेऊन जायचे. त्यांचा गायकवाडांवर खूप प्रभाव पडला.

दहावीत ८८ टक्के मार्क्स मिळाल्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या डिप्लोमा कोर्सला ऍडमिशन घेतली. पुढे दुर्दैवाने त्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ फिलिप्स या कंपनीत नोकरी केली. पण आयएएस होण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पदवी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. त्यासाठी त्यांच्या आईने बँकेतून पंधरा हजार रुपयांचे कर्ज घेतले आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूटमध्ये गायकवाड यांनी बी.टेकसाठी प्रवेश घेतला. पुढे आईसमोर पैशासाठी हात पसरून तिच्या अडचणी वाढवण्यापेक्षा स्वकष्टाने शिक्षण घेण्याचे त्यांनी ठरवले आणि पेंटिंग करणे, आंबे विकणे, क्लासेसमध्ये शिकवणे असे लहान मोठे उद्योग करत त्यांनी जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले. दरम्यानच्या काळात त्यांनी सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी ‘भारत विकास प्रतिष्ठान’ या नावाने एका संस्थेची स्थापना केली.

सुरुवातीला गायकवाड यांनी पुण्यातील टेल्को या कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी टाटांची एक कार बाजारात आली. पण तिला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने त्या कारचे उत्पादन थांबवण्यात आले. परिणामी त्याचा उरलेला वायरिंगचा कच्चा माल निकालात काढण्याचे ठरवण्यात आले. त्यामुळे कंपनीला आठ कोटींचा फटका सोसावा लागणार होता. पण त्याचवेळी गायकवाड यांनी मोठ्या चातुर्याने तो माल दुसऱ्या गाड्यांकरिता वापरला. त्यामुळे कंपनीचे होणारे मोठे नुकसान टळले . त्यावर त्यांच्या मोठ्या साहेबांनी त्यांना हवे ते देण्याची तयारी दर्शवली. त्यावेळी गायकवाड यांनी स्वतःकरता काहीही न मागता आपल्या गावाकडच्या तरुणांसाठी नोकऱ्यांची मागणी केली. टाटा प्रशासनाने ती मान्यही केली.

त्याच सुमारास म्हणजे १९९७ साली टाटा प्रशासनाने हणमंतराव गायकवाड यांना त्यांच्या दुसऱ्या कंपनीसाठी ‘हाऊस किपिंग’साठी मुले पुरवण्यास सांगितले. यावेळी त्यांनी पूर्वी स्थापन केलेल्या ‘भारत विकास प्रतिष्ठान’मार्फत आठ मुले पुरवून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आणि इथूनच ‘उद्योजक’ या नात्याने त्यांचा नवा प्रवास सुरु झाला. त्यावेळी त्यांचे मित्र उमेश माने यांनी आपली बँकेतली नोकरी सॊडून यांच्या व्यवसायात साथ देण्याचे ठरवले. गायकवाड यांनी आपली नोकरी सांभाळून गुणवत्तापूर्ण व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. मोठे कंत्राट मिळाल्यावर हाऊस किपिंग चे काम सोपे आणि लवकर होण्यासाठी कर्ज काढून चाळीस लाखांचे मशीन विकत घेण्याचे धाडसही केले.
थोडे बस्तान बसल्यावर मात्र २००१ मध्ये टाटा सारख्या प्रतिष्ठित कंपनीतील नोकरी सोडून त्यांनी धंद्यात लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. त्यांच्या आईंनी सुरुवातीला थोडा विरोध दर्शवला पण पत्नी वैशाली यांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला. हा हा म्हणता त्यांनी हाऊस किपिंगचा मोठा उद्योग उभारला. त्यांनी सुरुवातीला बंगळुरु येथील एका कंपनीचे कंत्राट घेतले. तिथे काम चोख केल्यानंतर कंपनीला कामं मिळत गेली. सध्या ‘भारत विकास ग्रुप’ (बीव्हीजी) राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, पार्लमेंट, सुप्रीम कोर्ट, यासारख्या सरकारी इमारतींना तसेच एअर पोर्टस्, मेट्रो, रेल्वेस्थानके शिवाय तिरुपती, अक्षरधाम, शिर्डी संस्थान सिद्धिविनायक, सोमनाथ, ताजमहाल, सुवर्णमंदिर, अशा देशभरातील बऱ्याच महत्त्वाच्या संस्थांना हाऊस किपिंगची सेवा पुरवतात. बजाज, महिंद्रा, अशोक लेलॅन्ड, हुंदाई, फोक्सवॅगन फिआट, ओएनजीसी, आयटीसीसारख्या कंपन्या बीव्हीजीची सेवा घेत आहेत. तसेच बीव्हीजीमार्फत सिव्हील इंजिनीअरींग, लँडस्केप डिझायनींग ॲ्न्ड गार्डनिंग अशा क्षेत्रातदेखील क्लिनींग आणि मेंटनन्सची सेवा उपलब्ध आहे.

पुढे त्यांच्या कल्पनांना पंख फुटले आणि निरनिराळ्या क्षेत्रात त्यांनी भरारी घेतली. हाऊस किपिंग च्या जोडीने आरोग्य क्षेत्रातही बीव्हीजीने आपला असा खास ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रात अॅम्ब्युलन्स पुरवण्याचे काम हणमंत गायकवाड यांच्याच ग्रुपकडे आहे. 108 क्रमांकावर संपर्क साधल्यास मोफत अॅम्ब्युलन्स पोहोचवली जाते. गरजूंना लाभ होण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यभर अॅम्ब्युलन्सचे जाळे पसरवण्यात आले आहे. दीड हजारांहून अधिक बाळंतपणं ह्या अॅम्ब्युलन्समध्ये झाली आहेत. इतकंच नाही तर सध्या मुंबईत सुरु झालेल्या बाईक अॅम्ब्युलन्सची जबाबदारी हणमंत गायकवाड यांच्याच संस्थेकडे आहे. आपल्या देशात उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक ज्ञानाचा वापर करून मोतीबिंदू, किडनी स्टोन पासून ते कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर औषध बनवण्याचे काम बीव्हीजीमार्फत केले जात आहे. त्यातही त्यांना यश मिळत आहे.

निरनिराळे आजार होण्यामागे आपण काय खातो ते महत्त्वाचे असते. म्हणूनच हणमंतराव गायकवाड यांनी त्यांचे काम केवळ हाऊस किपिंग आणि आरोग्यसेवेपुरतेच मर्यादित न ठेवता कृषीक्षेत्रातही आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतीला आणि शेतकऱ्याला कसा फायदा होईल, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कसे होईल, याबाबत त्यांची संस्था संशोधन करुन जोमाने कार्यरत आहे. प्रायोगिक तत्वावर कमी खर्चात उत्तम गुणवत्ता राखत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करुन दाखवले आहे. त्यासाठी त्यांच्या संस्थेने बियाणांपासून ते पोषक पण रासायनिक नसलेली कृषी औषधांची निर्मिती केली आहे. शिवाय हा ग्रुप माणसाला हानी न पोहोचवणाऱ्या जंतुनाशक फवारणीचाही वापर करतात. माती परीक्षण, पाणी परीक्षण करून गरजेप्रमाणे उपाय केले जातात.

ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी त्यांनी भाकड जनावरांवरही औषध देऊन प्रयोग केले. त्यातही त्यांना जवळ जवळ सत्तर टक्के यश मिळाले आहे.
भारतीय विकासाची स्वप्नं बघताना ते म्हणतात, “आपण आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. परदेशात कामाच्या संधी आहेत, आपण त्यांचा लाभ करून घेतला आहे. तसेच परदेशात जी आपली माणसे स्थिरावली आहेत त्यांनी आपली इथल्या माणसांना मदत करून तिथे सामावून घेतले पाहिजे.”

हणमंतराव गायकवाड यांना कितीतरी मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपती भवनाचे काम करत असताना प्रतिभा ताई पाटील यांनी त्यांचे व्हिजिटिंग कार्ड घेऊन मुलाला त्यांच्याविषयी सांगण्याचा मानस बोलून दाखवला. एकदा ते एका साईटवर गेले असताना एका स्त्री कर्मचारीने ‘माझा देव मला भेटला’ अशा शब्दांत त्यांच्या विषयी आपली भावना व्यक्त केल्या. त्या स्त्रीने खूप हालअपेष्टा काढल्या होत्या. प्रसंगी किळसवाण्या नजरा झेलल्या होत्या. पण बीव्हीजीमध्ये नोकरी मिळाल्यापासून तिचे आयुष्य बदलले होते. असे प्रसंग त्यांना कृतार्थतेचे क्षण देऊन जातात.
त्यांच्या ह्या वाटचालीमध्ये घरच्यांचा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे. ‘आई, पत्नी, मुलगी ह्यांना आपण वेळ देऊ शकत नाही, मुलगी तर लहानाची कशी मोठी झाली ते आपल्याला कळलंही नाही. पण ह्यासाठी ते आपल्यावर रुसत नाहीत, आपल्याला समजून घेतात’ याची त्यांना जाणीव आहे आणि त्यासाठी ते त्यांचे ऋणी आहेत.

यशस्वी उद्योजक होण्यासाठी, आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणादायक संदेश देताना ते म्हणतात, “कधीही कोणाशी स्पर्धा करू नका, आपल्या कामाने आपली उंची वाढवा, जे कराल ते उत्तम करण्याचा ध्यास घ्या, आपल्या व्हिजन बरोबरच संपूर्ण निष्ठेनिशी काम करणारी टीम तयार करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदासाठी काम करा, झटून काम करा आणि झुंजत पुढे चला.”

अफाट बुद्धिमत्ता, प्रचंड मेहनत, जोखीम पत्करण्याची तयारी, आपल्या माणसांविषयी असलेला विश्वास, सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची जिद्द अशा गुणांवर त्यांची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू आहे. आपल्या यशाचं श्रेय ते आपल्या मेहनती आणि विश्वासू सहकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना देतात. त्यांच्या सहकार्याशिवाय आपण हे यश मिळवू शकलो नसतो असे आवर्जून सांगतात. ‘पेशन्स’आणि ‘क्रेडीबिलिटी’ यांना अनन्यसाधारण महत्त्व देत आज बीव्हीजी दोन हजार कोटींची उलाढाल करीत आहे. बावीस राज्यांमध्ये त्यांचे आठशेहूनही अधिक ग्राहक आहेत. आठ जणांना हाताशी घेऊन सुरू झालेला प्रवास आज ऐंशी हजार कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सुरू आहे. भारतातच नव्हे तर अमेरिका, लंडन, सिंगापूर येथेही त्यांच्या व्यवसायाची मुळं पसरली आहेत.

‘मराठी माणसाला उद्योग करता येत नाही’, ‘मराठी माणूस आपल्याच माणसाचे पाय खेचतो’ अशा तद्दन टुकार विचारांना संपूर्णतः काटशह देत आज हणमंतराव गायकवाड आपल्या माणसांसमवेत यशाची शिखरं सर करीत आहेत. आपल्या भारताला स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि प्रगतीच्या पथावर नेणारा त्यांचा हा संपूर्ण प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या सर्व उपक्रमांना भरभरून शुभेच्छा !!

- छाया पिंगे
9819816511

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division