संपादकीय

DAC MUV PIC

ह्या १ मे ला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ५९ वर्ष पूर्ण होत आहेत. मराठी माणसांच्या आशा आकांक्शांचे प्रतीक असणाऱ्या आपल्या राज्याने ह्या कालखंडात किती प्रगती केली, लोकांचे जीवनमान किती उंचावले, जनता सुखी झाली का ? ह्या प्रश्नांची उत्तरे आपण सर्वांनीच शोधायचा प्रयत्न केला पाहिजे.

प्रथम पासूनच महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य समजले जात होते. मुंबईसारखे बंदर व त्याच्या आजूबाजूला विकसित झालेले सुधृढ औद्योगिक वातावरण ह्याचा राज्यातील उद्योगक्षेत्राला खूपच फायदा झाला. अनेक उद्योग ह्या राज्यात, विशेषतः मुंबई, पुणे नाशिक ह्या भागात आले. हरित क्रांतीने व सहकार चळवळीने मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात काही प्रमाणात सुबत्ता आली. मात्र कोकण, मराठवाडा व विदर्भ हे विभाग त्या मानाने दुर्लक्षितच राहिले. सरकारने ह्या विभागांसाठी विशेष योजना तयार केल्या, ह्या विभागात उद्योग सुरु करण्यासाठी खास सवलती देऊ केल्या. त्याचा परिणाम हळूहळू दिसून येत असला तरीसुद्धा पूर्वीपासून असलेला प्रादेशिक असमतोल आपण पूर्णपणे भरून काढला असे आजतरी म्हणता येणार नाही.

असे असले तरी आपले राज्य आज औद्योगिक दृष्ट्या अग्रेसर आहे हे सुद्धा कोणी नाकारू शकणार नाही. देशाने १९९१ नंतर आर्थिक उदारीकरणाचे व जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारले. त्यामुळे बाजारपेठ सरकारी लाल फितीतून मुक्त झाली, उद्योगधंदे वाढीस लागले, देशात अनेक क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणूक होऊ लागली. ह्या सर्व गोष्टींचा सर्वात जास्त फायदा महाराष्ट्रालाच झाला. आजमितीला महाराष्ट्र हेच गुंतवणुकीसाठी अतिशय योग्य व पहिल्या नंबरच्या पसंतीचे राज्य आहे ह्यात काही शंका नाही. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या पाऊलावर पाऊल टाकून इतर राज्येही प्रगतीकडे वाटचाल करू लागली आहेत. उद्योग आपल्या राज्यात खेचून आणण्यासाठी आज एक प्रकारची स्पर्धाच सुरु आहे म्हणा ना ! ह्यात काहीच गैर नाही, उलट ह्यामुळे सर्व राज्यांची व पर्यायाने देशाची प्रगतीच होणार आहे.

आजच्या ह्या स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास आपल्या राज्यानेही कंबर कसली पाहिजे. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी निरनिराळे मार्ग शोधले पाहिजेत. पायाभूत सुविधा जास्तीत जास्त अद्ययावत केल्या पाहिजेत. दळणवळणाची साधने वाढवली पाहिजेत. महाराष्ट्रात अनेक नद्या आहेत. त्यांचा वापर ह्यासाठी सुद्धा होऊ शकतो. महाराष्ट्राला विशाल समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचा फायदा घेऊन मुंबईसारखी अनेक बंदरे विकसित करण्याची गरज आहे. ही सर्व प्रक्रिया सुरु आहेच पण तिला गती देण्याची गरज नक्कीच आहे.

आपण सर्वांशी भांडून वेगळे महाराष्ट्र राज्य निर्माण केले ते फक्त अस्मितेचे झेंडे नाचवण्यासाठी नव्हे तर त्यामुळे राज्यातील जनतेला खऱ्या अर्थाने विकासाच्या संधी मिळतील, प्रगतीची गंगा सर्वदूर जाईल व जनतेचे सर्वार्थाने कल्याण होईल हा आत्मविश्वास होता म्हणून. आज समृद्धीच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी ह्याच आत्मविश्वासाची आवश्यकता आहे !

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division