'आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान' - महिलांचे उद्योगविश्व

aamhi udyoginiमहाराष्ट्रात उद्योजकतेची परंपरा वर्षानुवर्षे आहे. अनेक उद्योजकांचा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. जसे की, आधीच्या काळी महिला छोट्या प्रमाणात घरबसल्या उद्योग करायच्या अशाच महिलांनी घरातून सुरू केलेला छोटेखानी उद्योग नावारूपाला आला, याची अनेक उदाहरणे आपल्यासमोरच आहे. शकुंतला हेअर ऑईलच्या पुष्पाताई दुनाखे, ब्युटीकच्या मायाताई परांजपे, कॅम्लीनच्या रजनीताई दांडेकर, इंडियन मर्चंट चेंबरच्या शरयूताई दप्तरी आहेत. अशा अनेकींच्या विचारांनी आम्ही आमच्या व्यवसायाच्या व विचारांच्या कक्षा रुंदावल्या. मी जेव्हा तीस वर्षांपूर्वी उद्योग सुरू केला तेव्हा माझ्या अवतीभोवती बर्यावपैकी पोषक वातावरण होतेच असे नाही. पण जसे की, सर्व महिलांना येतात तशाच अनेक अडचणी माझ्याही प्रवासात निर्माण केल्या गेल्या. माझी आई विनता ढमढेरेसुद्धा घरबसल्या उद्योग करायची. तिच्याकडून मी खूप काही शिकले. माझ्या कुटुंबीयांनी या उद्योग प्रवासात मला प्रत्येकवेळी पाठिंबा दिला. मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातील एकमेव महिला अध्यक्ष आहे. त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यामुळे जनसंपर्कात वाढ झाली आणि महिलांना भेटून त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मदत करू लागले. त्यानंतर सर्व चेंबर ऑफ कॉमर्सची शिखर संस्था 'महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल' या संस्थेचे उपाध्यक्ष पद भूषवत आहे. महाराष्ट्रात फिरत असताना अनेक वेळा महिलांचे प्रश्न माझ्यामार्फत सोडवू जाऊ लागले. जसे की मला उद्योगिनी व्हायला अनेकींनी प्रोत्साहित केले मार्गदर्शन दिले पण प्रत्येक स्त्रीला असे पाठबळ मिळत असेल असे नाही. याच विचारातून 8 मार्च 1997 रोजी 'आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान' ही संस्था दादरच्या हिंदू कॉलनीत राजा शिवाजी विद्यालयाच्या संकुलात सुरू झाली. त्या दिवशी लोकसत्तेचे संपादक कै.माधवराव गडकरी व कॅम्लीनच्या रजनीताई दांडेकर, पुष्पा त्रिलोकेकर यांच्या शुभहस्ते 'आम्ही उद्योगिनी' हे उद्यमशील महिलांचे मुखपत्र त्रैमासिक सुरू करण्यात आले. आता आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच गोवा, बंगलोर, दुबई येथे शाखा आहेत.

1998 रोजी आठ मार्चला पहिली राज्यव्यापी उद्योगिनी महिला परिषद संपन्न झाली. परिषदेचे उद्घाटन त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सुधीरभाऊ जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण दिवसभराच्या परिषदेच्या समारोपाच्यावेळी महाराष्ट्रातील मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण (गोवा) पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सहा विभागीय भागातील उद्योगिनींना सन्मानित करण्यात येते. त्यानंतर दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या शनिवारी सातत्याने राज्यव्यापी उद्योगिनी महिला परिषद संपन्न होत आहे. परिषदेच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून 1000 उद्योगिनींची उपस्थिती असते. या परिषदेत शासकीय योजना बँकांच्या विविध योजना व उद्योगीनी यशोगाथा अशी भरपूर ज्ञानाची शिदोरी मिळतेच, त्याचप्रमाणे उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी नवीन ओळख, नवचेतना प्रेरणा मिळतेच. मौलिक मार्गदर्शनही येथे मिळते. उद्योगिनी तसेच तरुण उद्योजकांच्या माध्यमातून त्यांची मानसिकता बदलून त्यांना मदतीचा हात देण्याचे काम 'आम्ही उद्योगिनी' प्रतिष्ठान करते. महिन्यातून एकदा विनामूल्य उद्योग मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात. यामध्ये उद्योगासंबंधी प्रश्न सोडवले जातात. मार्केटिंग, फायनान्स, नेटवर्किंग हे विषय हाताळले जातात. तसेच मान्यवर, उद्योजक, शासकीय अधिकारी यांच्यामार्फत मार्गदर्शन केले जाते, उद्योगाचा पसारा वाढवताना विविध अडचणींना तोंड देऊन मार्ग काढण्याचे काम उद्योगिनी करते.

सातत्याने 22 वर्ष विनामूल्य कार्यरत असतानाच उद्योगातून महिला सक्षमीकरणाच्या कार्यास प्रोत्साहन म्हणून झी मराठीचा 'उंच माझा झोका पुरस्कार 2019' ने 'आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान' संस्थेला सन्मानित करण्यात आले. हे सर्व शक्य झाले आमच्या शाखाप्रतिनिधी व आपल्या सर्वांच्या साथीमुळेच. आधीच्या काळात महिलांना एवढी दालने उपलब्ध नव्हती. आज शासकीय योजना, स्टार्ट अप, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून अनेक विकासाची दालने महिलांना उपलब्ध झाली आहेत. आज ग्रामीण भागातील महिलासुद्धा खूप नाविन्यपूर्ण विचार करून जुन्या कलांना किंवा वस्तूंना जोपासून नव्याने बाजारात आणत आहेत. आजच्या पिढीची विचारशक्ती, कल्पना यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे आणि यातून उद्योगमय असा महाराष्ट्र घडण्यात हातभार नक्कीच लागत आहे. महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाचे महिला उद्योग धोरण व औद्योगिक धोरण यात महिलांना व्यवसाय वृद्धीस मदतच होत आहे. आजच्या पोषक वातावरणामुळे महिला आज आपल्या भागापुरती संकुचित न राहता टेक्नॉलॉजीचा वापर करून जगभरात आपल्या उद्योगाचे जाळे कसे पसरवता येईल यामध्ये सक्रिय सहभागी होत आहे. कौटुंबिक जबाबदार्याग आणि व्यापार-उद्योग ही सूत्रे नेमके जमवण्यास महिला यशस्वी होताना दिसत आहेत.

आम्ही उद्योगिनीचा झेंडा भारताच्या राजधानीत फडकविण्याची तसेच महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी आम्हाला मिळाली. सन 2014 मध्ये आमच्या संस्थेला 'ऑल इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर' प्रगती मैदान नवी दिल्ली येथे आमच्या महिला उद्योगीनींना MSSIDCD तर्फे स्टॉल्स मोफत देण्यात आले होते. आमच्या संस्थेतील महाराष्ट्रातील महिला उद्योगीनीची शॉर्टफिल्म 'रणरागिणीयोंका राष्ट्र महाराष्ट्र' या नावाने तयार करण्यात आली. त्याचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडवणीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिल्ली आयआयटीएफ मध्ये करण्यात आले.

नवनवीन संधी महिला उद्योजकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नातूनच आमच्या संस्थेतर्फे 2011 इंडिया ट्रेड अँड एक्जीबिशन सेंटर,शारजा येथे पहिले भारतीय उद्योगिनीनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर 2012 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी एमएसएमइ च्या माध्यमातून महिला उद्योगीनींना स्टॉल रेंटची काही रक्कम शासकीय योजनेच्या माध्यमातून परत करण्यात आली. महाराष्ट्रातील उद्योजकांचा व्यापाराची देवाणघेवाण या उपक्रमांतर्गत दुबई व फुजिराह ह्या आखाती देशांचा उद्योग दौरा 2016 दुबई भारतातील व्यापाराची देवाण-घेवाण करण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या मदतीने अर्ध दिवसीय b2b सेमिनार आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान श्री. मंदार भारदे व शिल्पा कुलकर्णी यांनी महिला उद्योजकांना जास्तीत जास्त व्यापार संधी उपलब्ध व्हाव्यात व प्रोत्साहन मिळावे म्हणून दुबई सोबतच फुजिराह या आखाती देशातही खूप संधी आहेत. उद्योग वाढवण्यासाठी असे सांगून तेथील मा सुलतान सैफ सुलतान यांच्याशी भेटीचा योग जुळवून आणला तोच चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीच्या वास्तूमध्ये भेट देण्याचे आमंत्रण आम्ही उद्योगिनीला मिळाले. फुजिराह चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष खलिफा यांनी त्यांच्या भाषणात महिला उद्योजकांच्या डेलीगेशनचे खूप कौतुक केले व नमूद केले की, आमच्या फुजिराहच्या इतिहासात फुजिराह चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजला भेट देणारे पहिले असे महिला उद्योजकांचे डेलिगेशन आहे. या बैठकीत मेड इन इंडिया म्हणजेच भारतीय बनावटीच्या महिला उद्योजकांनी बनवलेल्या वस्तू फुजीराह या देशात विक्री करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार करणार असे आश्वासन देऊन महिला उद्योजकांना प्रोत्साहित केले. पाच दिवसीय उद्योगदौऱ्यात महिला उद्योजकांना मोठ्या प्रमाणात आखाती देशात व्यापार देवाणघेवाण करण्याची यशस्वी संधी उपलब्ध तर झालीच पण त्यांच्या प्रॉडक्टचा दर्जा अजून कसा उत्तम करता येईल याबद्दलचे ज्ञानही त्यांना प्राप्त झाले. त्यानंतर पुढचे पाऊल म्हणजे महाराष्ट्र भारत आणि आता दुबईत शाखाविस्तार आणि मेड इन इंडिया उद्योजकीय दौरा 2017. या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या सहकाऱ्यांनी आम्ही दुबई येथे b2b आयोजित केले. आमचे उद्योजक मित्र मंदार भारदे यांच्या सहकार्याने श्री.चिन्मय यांच्याशी ओळख होऊन अजमान फ्री झोनला भेट देण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे श्री. मंदार यांच्यामुळे श्री. हेमंत सानप यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी आम्हाला दुबई b2b साठी खूप मदत केली. या दोन्ही भेटींमुळे दुबईत उद्योजकांसाठी व्यापार करण्याच्या इच्छेला उभारी मिळाली. 'आम्ही उद्योगिनी' दुबई b2b म्हणजेच Lets Spread Your Wings accross The Globe .आपला व्यवसाय आखाती देशात विस्तारण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही सलग दुसऱ्यांदा केला आणि तो प्रयत्न यशस्वीही झाला.

'आम्ही उद्योगिनी' मी गेली 22 वर्षे उद्योजकांसाठी सातत्याने कार्यरत असणारी एकमेव संस्था आहे. आणि गेली दोन वर्ष दुबईतील उद्योजकांचा सोबत सतत संपर्क साधल्यामुळेच दुबई- 'आम्ही उद्योगिनी'ची शाखा सुरू झाली आहे. या दुबई शाखेचे कार्य करण्यासाठी संजीवनी पाटील,आरती कोपरगावकर, रमा काळे यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. सन 2018 रोजी सायंकाळी ग्रँड एक्सेलसियर दुबई येथे बिझनेस टू बिझनेस मीटिंगची सुरुवात झाली. सदर b2b ला कौन्सिल जनरल ऑफ इंडिया दुबई श्री राहुल श्रीवास्तव, फुजीराहच्या चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष सुलतान सेफ, अबुधाबी मधील उद्योजक भगवान गवई, ओम.पी.के. ट्रेडिंगचे सुजय पाटील, दिशा जनरल ट्रेडिंगचे विनय चिटणवीस, आर्च ग्रुपचे अशोक कोरगावकर आणि कारेफोर, अल मदिना ग्रुपचे अधिकारी, अलअदिलच्या वंदनाताई दातार असे दिग्गज व उद्योजक सदर बिझनेस मीटिंगसाठी उपस्थित होते. यावर्षीदेखील अशाच प्रकारचे b2b आयोजित करण्यात आले होते. आपल्या भागातील विशेषतः महाराष्ट्रातील उद्योगीनींच्या कक्षा रुंदावण्यासाठी आणि उद्योगिनींच्या विचारात प्रगल्भता आणण्यासाठी अशा प्रकारचे दौरे आयोजित करण्यात येतात. या दौर्या तून परदेशात उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन आपल्या महिलांच्या उत्पादनांना आखाती देशात कसे स्थान निर्माण करून देता येऊ शकते याबद्दल आग्रही असतो. यावेळचे बिझनेस डेलिगेशन हे नव्या आणि जुन्या विचारांची सांगड घालत प्रवास करणारे होते कारण यामध्ये खूप वर्षे बिझनेस करणाऱ्या उद्योगिनी आणि स्टार्टअपच्या धर्तीवर सुरू केलेल्या नव उद्योगिनी सहभागी झाल्या होत्या.

आता आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून ऑगस्ट 2019 रोजी मालदीव येथे इंडिया एक्सपोमध्ये महिला उद्योगिनी सहभागी होत आहेत. इनोव्हेशन, क्वालिटी, रास्त किंमत व योग्य प्रेझेंटेशनसाठी व सातत्य असेल तर उद्योगाची धुरा तुम्ही यशस्वीपणे सांभाळून झिरो टू हिरो नक्कीच बनाल.

मीनल मोहाडीकर
माजी अध्यक्ष- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर
उपाध्यक्ष - महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल
अध्यक्ष - आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division