कॉर्पोरेट गिफ्टिंग 
                         - राज वसईकर

raj vasaikarभेटवस्तूचं अप्रूप कोणाला नसतं? माणूस लहान असो की मोठा, स्त्री असो की पुरुष, श्रीमंत असो की गरीब, भेटवस्तू स्वीकारण्याचा आनंद सार्वत्रिक आहे. एखाद्या सणाच्या किंवा प्रसंगाच्या निमित्ताने, समोरच्या व्यक्तीची आवड लक्षात घेऊन जर ही देवाणघेवाण होत असेल तर भेट देणारा आणि घेणारा या दोघांमधलं नातं दृढ होण्यासाठी याचं महत्त्व खासच आहे.

वैयक्तिक नात्यांप्रमाणेच कॉर्पोरेट जगतात “गिफ्टिंग’ला विशेष स्थान आहे. या वेगळ्या क्षेत्रात अल्पावधीतच उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या राज वसईकर यांच्या व्यवसायाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. गेल्या 21 वर्षांपासून पार्ल्यात राज यांचा “ॐ डिझायनर्स & प्रिंटर्स’ हा प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. काही वर्षांनी याचा विस्तार करताना त्यांनी पॅकेजिंगलादेखील सुरुवात केली. गेल्या दीड वर्षांपासून मात्र त्यांनी “कोर्पोरेट गिफ्टिंग’ या नवीन पण आपल्या मूळ व्यवसायाला पूरक अशा क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केलं आहे.

अनेक कंपन्यांमधून दसरा-दिवाळी, नवीन वर्षं, सेमिनार्स, कॉन्फरन्सेस किंवा इतर काही महत्त्वाच्या इव्हेन्ट्सच्या निमित्ताने खास क्लाएंट्सना, हितचिंतकांना, कर्मचाऱ्यांना गिफ्ट्स देण्याचे प्रमाण आजकाल वाढत आहे. अशा वेळी मागणीनुसार कंपनीचे नाव, लोगो इ. घातलेल्या, आकर्षक पॅकेजिंगमधल्या नानाविध प्रकारच्या गिफ्ट्स पुरवणे हे राज यांच्या व्यवसायाचे स्वरूप आहे. नव्यानेच सुरु केलेला व्यवसाय असला तरी यात ग्राहकांच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार भरपूर वैविध्य असलेल्या पाच-सहाशेहून अधिक प्रकारच्या भेटवस्तूंचा समावेश आहे. जगभरात या क्षेत्रात होणारी प्रचंड उलाढाल, वाढती मागणी आणि तंत्रज्ञानाची झेप पाहता ही संख्या एखाददोन वर्षांतच पाच हजारावर जाऊ शकेल असा विश्वास त्यांच्या बोलण्यात दिसला.

कॉकरी, बॅग्ज, वॉलेट्स या सर्रास दिल्या जाणाऱ्या वस्तूंबरोबरच विविध प्रकारचे पेन ड्राइव्ह्ज, पॉवर बॅंक्स, तांब्याच्या भेटवस्तू, शो पिसेस यांनाही कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये भरपूर मागणी असल्याचे चित्र दिसते. एकाच वस्तूचा वापर निरनिराळ्या पद्धतीने करता येईल अशा अनेक वस्तूंना चांगली बाजारपेठ आहे. उदा. आकर्षक आणि हाताळायला सोयिस्कर असलेल्या सेल्फी स्टिकमध्ये टॉर्च आणि चार्जरची सोय आहे. छोट्या लेडिज पर्समध्ये लेदरच्या आत दडलेली पॉवरबॅंक आहे. वजनाला अतिशय हलका असा ब्लू टुथ स्पीकर+MP 3 प्लेअर+रेडिओ आहे, सिलिकॉन बॉटलमध्येच कॅम्पिंग लाईट आणि सोलार पॉवर बॅंक आहे. या व्यवसायासाठी राज यांच्याकडे असलेल्या 6-7 जणांच्या स्टाफमध्ये मुलींचा समावेश अधिक आहे. मॅनेजर, मार्केटिंग, अकाऊंट्स, अडमिनिस्ट्रेशन अशा सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या मुली अतिशय समर्थपणे सांभाळत आहेत असे त्यांनी आवर्जून सांगितले.

या क्षेत्राकडे ते कसे वळले याविषयी सांगताना राज म्हणतात, ”लहानपणापासून मला विमानांचे फोटो, पोस्टर्स, लोगो जमवण्याचा छंद होता. पुढे कंबाटा एव्हिएशन या कंपनीत नोकरी करत असताना अनेक विमानकंपन्यांची कस्टम क्लिअरन्स, कार्गो इ. कामं तिथे येत असत. त्याकाळात या कंपन्यांच्या प्रिंटिंगसंबंधी गरजांची मला चांगली माहिती झाली होती. स्वत:चा व्यवसाय सुरू करावा असंही मनात होतंच. मग मी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन प्रिंटिंग व्यवसायाची सखोल माहिती गोळा केली. त्यानंतर मी आणि माझी पत्नी राधिकाने हा व्यवसाय सुरू केला. वेगवेगळ्या विमानकंपन्यांसाठी लेबल्स, स्टिकर्स, ब्रोशर्स, व्हिझिटिंग कार्ड्स, लेटरहेड्स बनवणं चालू झालं. पुढे क्लाएंट्सही वाढत गेले. व्यवसायाचा विस्तार करताना पॅकेजिंगसुद्धा सुरू केलं.

गेल्या 21 वर्षांपासून अनेक कंपन्यांसाठी आम्ही डिझायनिंग आणि प्रिंटिंग करत आहोत. हे करत असताना एक गोष्ट लक्षात आली की आजकाल सगळ्या कंपन्यांना त्यांची जास्तीत जास्त कामं एका छताखाली करून हवी असतात. कॉर्पोरेट गिफ्टिंग हा यातलाच एक भाग. “When you move, you grow!” ह्या तत्त्वावर पूर्ण विश्वास असल्याने मी पूर्ण तयारीनिशी या क्षेत्रात उतरायचं ठरवलं. यासाठी नेटवर्किंग फार महत्त्वाचं ठरलं. मी कॉर्पोरेट गिफ्ट असोसिएशन ऑफ़ इंडिया, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सॅटर्डे क्लब, बिझनेस नेटवर्क इंडिया अशा संस्थांचा सभासद झालो. यातून वेगवेगळ्या उद्योजकांशी ओळखी वाढत गेल्या. नवीन उत्पादने कळायला लागली, उत्पादकांची थेट भेट होऊ लागली. सुरुवातीपासूनच कंपन्यांच्या लोगोसकट आकर्षक पॅकिंगमध्ये तयार करण्यात आलेल्या गिफ्ट सेट्सना चांगली मागणी यायला लागली. वर्ल्ड ट्रेड सेंटरमधून मी मागे एक्स्पोर्ट मार्केटिंगचा डिप्लोमा केला होता. तेव्हा लेदरचे प्रकार व प्रॉडक्ट्स या विषयावर मी केलेल्या प्रोजेक्टचाही मला आता खूप उपयोग होत आहे. शिवाय इतक्या वर्षांच्या चोख व्यवसायातून मी जे गुडविल कमावलं होतं त्याचाही निश्चितच फायदा होतोय. उत्तम क्वॉलिटी आणि तत्पर सेवा यात कुठलिही तडजोड करायची नाही हे मी पक्कं ठरवलेलं आहे. त्यामुळे एकदा काम मिळालं की त्या कंपन्यांकडून पुढेही नियमितपणे काम मिळतं हा माझा इतक्या वर्षांतला अनुभव इथेही खरा ठरतोय.”

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division